मुंबई4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
आमचा लाॅंगमार्च चालूच राहणार आहे. आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासने मिळाली. परंतु यापूर्वीचे अनुभव पाहता सरकारचे आदेश ग्रामपातळीपर्यंत येईपर्यंत विसावा घेत आहोत. परंतु मागण्यांची अमलबजावणी न झाल्यास मुंबईच्या दिशेने कूच करू आम्ही थांबणार नाहीत असा इशारा किसान पायी आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते जे. पी. गावित यांनी दिला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
आदीवासी शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत किसान सभेच्या नेत्यांचे तसेच अन्य मोर्चेकऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर जे. पी. गावित बोलत होते. दरम्यान मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून उद्या सभागृहाच्या पटलावर त्या ठेवून माहिती देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
आश्वासन नको, अमलबजावणी हवी
जे. पी. गावित म्हणाले, सकारात्मक निर्णय झाला आहे. 2018 2019 चा अनुभव पाहता यंदा आश्वासन दिले जात आहे. ते पाळले जात नाही. प्रशासन त्यावर अंमलबजावणी होत नाही. आमच्या सतरा अठरा मागण्यांपैकी काही मागण्या विचाराधीन आहे. केंद्राच्या मागण्याबाबत आम्ही सांगणे उचित नाही. कांदा, घरकूल योजना प्रश्नावर चांगली चर्चा झाली. जूनी पेन्शन योजनेवरही चर्चा झाली. जे निर्णय झाले ते उद्या पटलावर ठेवले जाणार आहेत.
…तोपर्यंत आंदोलन स्थगित नाहीच
जे. पी. गावित म्हणाले, या निर्णयाबाबत अंमलबजावणी झाली आहे. पण आश्वासन देऊन घरी पाठवायचे असी सरकारची कृती यापूर्वी झाली आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाही ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन स्थगित होणार नाही.
आमची पाऊले चालतच राहतील
जे. पी. गावित म्हणाले, सरकारने आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले पण आम्ही म्हणतो आमच्या मागण्यांचे शासननिर्णय तयार करून ते यंत्रणेला पाठवा. तोपर्यंत आम्ही पायी चालण्याचे आंदोलन थांबवणार नाही. आमचे पाऊले चालतच राहतील. खात्री होईपर्यंत अधिकृत निर्णयाशिवाय मागे हटणार नाही. अमलबजावणीचे आदेश दोन दिवसांत जाऊ शकतात. तसे निरोप खालच्या पातळीवरून गाव पातळीवरून येतील तेव्हाच आम्ही आमचा लाॅंगमार्च थांबवू. आम्ही निर्धार करून निघालो. आमच्याजवळ शिधा सामग्री अजूनही आहे. ठेचा भाकरी स्वतःच्या घेवून आम्ही आलो आहोत. लाॅंगमार्च मुंबईत आला तर सरकारची तारांबळ उडेल. लोकांची गैरसोय होईल हे सरकारला आम्ही निक्षून सांगितले आहे.
सकारात्मक चर्चा, मागण्यांबाबत उद्या स्पष्टता – सीएम शिंदे
सीएम शिंदे म्हणाले की, आमची मोर्चेकऱ्यांशी आणि त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून उद्या सभागृहाच्या पटलावर त्या ठेवून माहिती देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.