|| आश्लेषा महाजन
उत्तम कवयित्री, मराठी-हिंदीच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून संजीवनी बोकील हे नाव सुपरिचित आहे. त्यांनी कादंबरी, एकांकिका, हिंदी कवितासंग्रह, नवसाक्षरांसाठी कथासंग्रह, बालकथा-काव्य अशी साहित्य क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केलेली आहे. त्यांचा ‘आत्मचित्र’ हा नवा ललित लेखसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या मुखपृष्ठावरचा खिडकीतून दिसणारा सूर्योदय सर्वप्रथम लक्ष वेधतो. आतील रेखाचित्रांसह उत्तम निर्मिती असलेले हे पुस्तक म्हणजे आत्मकथनपर ३० छोटेखानी ललित लेख होय. ‘मी’भोवतीच्या चित्रांचे हे कोलाज आहे. जगण्यातली असोशी, नमुनेदार माणसे, कोडी घालणारे योग, थक्क करणारे प्रसंग, कसोटी बघणाऱ्या निर्णायक घटना लेखिकेने प्रांजळपणे शब्दबद्ध केल्या आहेत. रोजच्या साध्याच सत्य घटना समोर मांडून, त्यांना वैचारिक अधिष्ठान देत त्याची केलेली सांगता असे यातल्या सर्वसाधारण लेखांचे स्वरूप आहे. शाळेतले प्रसंग आणि साहित्यविश्व यावर अधिकतर लेख आहेत. ललितगद्य हा अतिशय लवचीक वाङ्मयप्रकार आहे, असे डॉ. सिसिलिया काव्र्हालो यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. त्यानुसारचे वैविध्य ‘आत्मचित्र’मध्ये दिसते.
गोड बोलण्याचे फायदे, अमेरिकास्थित नातवाचे लडिवाळ खेळ, भुकेलेल्यांची तृप्ती, एकांत-समाधीचा आनंद, जुनी पत्रे चाळतानाचे स्मरणरंजन, सावरून घेणारी सासू.. अशा विविध विषयांबरोबरच शाळा, शाळेतल्या हसऱ्या/ रडव्या आठवणी अनेक लेखांमध्ये उमटल्या आहेत. त्यातील काही लेख म्हणजे तर शाळेतले आगळे प्रयोगच आहेत. ‘जादूच्या कांडय़ा’ या लेखात मुख्याध्यापक पु. ग. वैद्य सरांच्या अनुमतीने ‘वर्गशिक्षिकेविना’ इन्स्पेक्टरांसमोर शांत बसलेला आणि भाव खाऊन गेलेला आपटे प्रशालेतला वर्ग वर्णन केलेला आहे. उत्तरपत्रिकेवर शिक्षिकेने लिहिलेल्या सकारात्मक शेऱ्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला किती प्रेरणा मिळू शकते, हे सांगणारा ‘नाणे प्रेरणेचे’ हा लेख अतिशय हृद्य आहे. एका बुजऱ्या मुलीच्या पेपरवर ‘सर्वोत्तम पेपर’ असा शेरा मारल्यामुळे नेमकी काय जादू घडली? भावासारखे आपण हुशार नाही या न्यूनगंडातून नराश्य आलेल्या, आत्महत्येचा विचार मनात घोळणाऱ्या त्या विद्याíथनीचा आत्मविश्वास आणि जीवनेच्छा कशी पल्लवित झाली, हे चित्रित करणारे लेख मुळातून वाचावेत असे आहेत. शाळेच्या नियमांमुळे नापास झालेला/ केलेला, पण जगण्याच्या शाळेत टक्केटोणपे खाऊन ‘पास’ झालेला विद्यार्थी ‘झाले मोकळे आकाश’ या लेखात भेटतो तेव्हा वाचकाचे मनही द्रवते. ‘बाळ चाललासे रणा’ ही कवयित्री पद्मा गोळे यांची कविता शिकवताना रडू फुटल्यानंतरची अवस्था व समंजस वर्गाची संयत प्रतिक्रिया एका लेखात आहे. एका गिचमिडय़ा अक्षराचे रूपांतर मोत्यासारख्या अक्षरांत कसे होते? किंवा इंग्रजी माध्यमातल्या मुलांचे मराठी सुधारताना कसे विनोद घडले? असे अनेक विषयांवरचे आकर्षक शीर्षकांचे व वेधक बांधणीचे हृद्य लेख यात आहेत. ज्ञानेश्वर, कबीरापासून व. पु. काळे, सुधीर मोघे अशा अनेक कवी-लेखकांचे जाता जाता दिलेले संदर्भ लेखिकेचे समृद्ध भावविश्व दर्शवते.
साहित्यिक कार्यक्रमांविषयीची संदर्भबहुल वर्णने अनेक लेखांत आहेत. गायकांचे, अभिनेत्यांचे संदर्भही त्यात आहेत. कधी काव्यवाचन, सूत्रसंचालन, संहितालेखन, तर कधी प्रत्यक्ष कार्यक्रमाची बांधणी कशी केली याचेही काही लेखांत तपशील आहेत. बारामतीच्या कार्यक्रमाचे ‘हृदयी आले भरते’ हे शीर्षक कसे सुचले? वाडिया कॉलेजमध्ये काव्यमफील कशी रंगली? कविकुलगुरू कालिदासावर वृत्तबद्ध कविता कशी सुचली? हिंदी कवितासंग्रहाला हवे तसे मुखपृष्ठ कसे योगायोगाने मिळाले? सूत्रसंचालन करताना कसा हजरजबाबीपणा दाखवला? अशा अनेक सत्यकथांमधून त्या- त्या वेळचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास त्यांनी नोंदवला आहे. लेखिकेने ‘कॅलिडोस्कोप’, ‘रंगभान’, ‘हे घडय़ाळ वाळूचे’ इत्यादी अनेक साहित्यिक कार्यक्रमांची निर्मिती, संहितालेखन केले. इयत्ता नववीतल्या २२५ मुलांसाठी ‘अक्षरमत्र’ या मराठी साहित्याच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमांची मालिका त्यांनी सादर केली होती. या सर्व कार्यक्रमांच्या, प्रयोगांच्या आठवणी, त्यानिमित्ताने घडलेल्या विविध माणसांच्या, संस्थांच्या, गावांच्या आठवणी हा अनेक लेखांचा गाभा आहे. गेल्या दोनेक वर्षांत फेसबुकवर लिहिलेल्या या आत्मपर लेखांचे हे पुस्तक म्हणजे एक सुंदर माध्यमांतर आहे.
‘आत्मचित्र’- संजीवनी बोकील,
सौर प्रकाशन, पुणे, पाने- १६८ रुपये,
किंमत- २२५ रुपये.
ashlesha27mahajan@gmail.com
The post ललितबंधांतून विविध अनुभवांचे आयाम appeared first on Loksatta.