मध्ये धडक
इंडियन प्रीमिअर लीगमधील एलिमिनेटर हा सामना ज्या संघात खेळला जातो, त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. कारण, या सामन्यात जो विजय मिळवतो, त्यालाच पुढच्या क्वालिफायर सामन्याचे तिकीट मिळते. मात्र, जो हा सामना गमावतो, त्याला स्पर्धेतून थेट बाहेरचा रस्ता धरावा लागतो. आता असाच बाहेरचा रस्ता धरण्याची वेळ आयपीएल २०२२मधील नवखा संघ लखनऊ सुपर जायंट्स यावर आली आहे. आयपीएल २०२२मधील एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने लखनऊला १४ धावांनी पराभवाचा धक्का दिला आहे. या विजयासह बेंगलोरने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात एंट्री घेतली आहे. बेंगलोरच्या या विजयात रजत पाटीदार याचे मोलाचे योगदान राहिले आहे.
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लखनऊच्या कर्णधाराचा हा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. बेंगलोरने यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ विकेट्स गमावत २०७ धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला ६ विकेट्स गमावत १९३ धावाच करता आल्या.
रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजने क्विंटन डिकॉकला ६ धावांवर बाद केले. त्यानंतर मात्र केएल राहुल आणि मनन व्होराने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र जॉस हेजलवूडने मननला १९ धावांवर बाद केले. यानंतर केएल राहुलने दीपक हुड्डाच्या साथीने डाव सावरला. दरम्यान, केएल राहुलने अर्धशतक ठोकले. तर दीपक हुड्डाने देखील आपला गिअर बदलत फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचली. मात्र दीपक हुड्डाचा हसरंगाने ४५ धावांवर त्रिफळा उडवला.
केएल राहुल आणि मार्कस स्टॉयनिसने सामना जवळ आणला. सामना १८ चेंडूत ४५ धावा असा आणला. १८ वे षटक टाकणाऱ्या हर्षल पटेलने पहिल्या दोन चेंडूवर वाईट बॉल टाकत सहा धावा दिल्या. त्यामुळे सामना १८ चेंडूत ३९ धावा असा आला. मात्र याच षटकात त्याने स्टॉयनिसला ९ धावांवर बाद केले. हर्षलने १८ व्या षटकात 8 धावा देत सामना १२ चेंडूत ३३ धावा असा आणला. दरम्यान, १९ वे षटक टाकणाऱ्या जॉस हेजलवूडनेही षटकाच्या सुरूवातीलाच तीन वाईड टाकले. मात्र त्याने ५७ चेंडूत ७९ धावा करणाऱ्या केएल राहुलला बाद करत लखनौला मोठा धक्का दिला. पुढच्याच चेंडूवर हेजलवूडने क्रुणाल पांड्याला शुन्यावर बाद केले. हेजवलूडने ९ धावा देत २ विकेट घेतल्या. त्यामुळे लखनौला विजयासाठी ६ चेंडूत २४ धावा हव्या होत्या. शेवटचे षटक हर्षल पटेल टाकत होता. त्याने ३ चेंडूत ८ धावा दिल्या. तिसऱ्या चेंडूवर चमीराने षटकार मारला. त्यामुळे सामना ३ चेंडूत १६ धावा असा आणला. मात्र पटेलने चौथ्या चेंडूवर एकच धाव देत सामना आरसीबीच्या खिशात टाकला. पुढच्या दोन चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. आरसीबीने सामना १४ धावांनी जिंकला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून रजत पाटीदार याने तुफान शतक झळकावले. त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक साजरे केले. आपल्या खेळीत त्याने ५४ चेंडूंचा सामना करताना नाबाद ११२ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ७ षटकार आणि १२ चौकारांचाही पाऊस पाडला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक याने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले, तर विराट कोहली २५ धावा करून बाद झाला. तसेच, ग्लेन मॅक्सवेल १४ आणि महिपाल लोमरोर ९ धावा करून बाद झाले. कर्णधार फाफ डू प्लेसिस याला एकही धाव करता आली नाही. तो गोल्डन डक म्हणजेच शून्य धावसंख्येवर बाद झाला.
या विजयासह बेंगलोर संघ आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला अंतिम सामन्यासाठी आव्हान देणार आहे. हा सामना शुक्रवारी (दि. २७ मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे.