हिंगोली23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औंढा नागनाथ येथील वन विभागाच्या उद्यानाची दुरावस्था झाली असून या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या रोपवाटीकेतील रोपे वाळून गेली आहे तर दुसरीकडे पाणवठे गाळाने भरल्यामुळे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावाच्या दिशेने येऊ लागले आहेत.
मात्र या उद्यानासाठी आलेल्या लाखोंच्या निधीवर वन विभागानेच ताव मारल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी वन्य प्रेमी नागरीकांतून केली जात आहे.
वन विभागाने केली होती उभारणी
औंढा नागनाथ येथे वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर उद्यानाची उभारणी केली आहे. या उद्यानामध्ये जास्तीत जास्त पर्यटक येऊन त्यांना तसेच बच्चे कंपनींना वन्य प्राण्यांची माहिती व्हावी यासाठी प्राण्यांचे कृत्रीम पुतळे उभारले आहेत. या शिवाय या ठिकाणी विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच पर्यटकांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात आले आहेत. मात्र या उद्यानाची सध्याच्या स्थितीत दुरावस्था झाली आहे.
पर्यटक फिरकेना
या उद्यानामध्ये आलेल्या पर्यटकांना कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. स्वच्छतागृह कुलुप बंद असून त्या ठिकाणी असलेले वॉशबेसीन गायब आहे तर नळाच्या तोट्या देखील पळविण्यात आल्या आहेत. या उद्यानाच्या दुरावस्थेमुळे पर्यटक या उद्यानाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उद्यानासाठी आलेल्या लाखो रुपयांवर वन विभागानेच ताव मारल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.
अधिकारी बाहेरगावी
पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी वन विभागाकडून रोपवाटीका तयार करण्यात आली आहे. त्यासाठी मेनकापड खरेदी व इतर साहित्य खरेदीवर लाखोंचा खर्च झाला. मात्र त्यामधील रोपे पाण्या अभावी वाळून गेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या रोपांचा वापर कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बाहेर गावाहून ये जा करतात त्यामुळे स्थानिक अधिकारीही मुख्यालयी न राहता बाहेरगावी राहतात. तर कर्मचाऱ्यांच्या हातातच कारभार असल्याचे बोलले जात आहे.
वन्य प्राणी पाण्याच्या शोधात
सध्या उन्हाच्या झळा वाढल्या असतांना अनेक ठिकाणी पाणवठे कोरडे आहे तर काही ठिकाणी पाणपठे गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे येऊ लागले आहेत. काही दिवसांपुर्वीच औंढा तालुक्यात बिबट्या आल्याची चर्चा सुरु होती. मात्र तो बिबट्या नसून तडस असल्याचे सांगतांना अधिकाऱ्यांच्या तोंडाला चांगलाच फेस आला होता.
एकंदरीतच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वन विभागाचा अलबेल कारभार सुरु असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी वन्य प्रेमींतून केली जात आहे. या संदर्भात विभागीय वन अधिकारी कोळगे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दुरध्वनी घेतला नाही.
रोपवाटीकांच्या कामाची चौकशी करा
वन विभागाच्या रोपवाटीका शोभेच्या वस्तू बनत चालल्या आहेत. लागवडीसाठी रोपे कमी पडत असल्यामुळे आयुक्त कार्यालयाला इतर उपक्रम राबवून रोपे उपलब्ध करून घ्यावी लागत आहेत. त्यामुळे वन विभागाच्या रोपवाटीकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.