रॉयल चॅलेंजर बेंगलोरची तपस्या आली फळाला; दिल्ली कॅपिटल्सचे स्वप्न भंगले

रॉयल चॅलेंजर बेंगलोरची तपस्या आली फळाला; दिल्ली कॅपिटल्सचे स्वप्न भंगले
रॉयल चॅलेंजर बेंगलोरची तपस्या आली फळाला; दिल्ली कॅपिटल्सचे स्वप्न भंगले

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी राखून पराभव करत त्यांचे प्ले ऑफमधून पॅक अप केले. मुंबईच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा प्ले ऑफचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मुंबईने दिल्लीचे १६० धावांचे आव्हान १९.१ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४८ धावा केल्या. त्याला डेवाल्ड ब्रेविसने ३७ आणि टीम डेव्हिडने आक्रमक ३४ धावा करून साथ दिली. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर आणि नॉर्त्जेने प्रत्येकी २ विकेट घेत चांगली साथ दिली.

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १६० धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला नॉर्त्जेने पहिला धक्का दिला. १३ चेंडू खेळून अवघ्या २ धावा करण्याऱ्या रोहितला त्याने पॅव्हेलियनमध्ये धाडले. त्यानंतर इशान किशन आणि डेवाल्ड ब्रेविसने डाव सावरत मुंबईला पंचाहत्तरी पार करून दिली. मात्र अर्धशतकासाठी अवघ्या दोन धावा असताना इशान किशनला (४८) कुलदीपने बाद केले.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकून प्रथम दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीला पाचारण केले. मुंबईच्या डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहने दिल्लीला पॉवर प्लेमध्ये एका मागून एक धक्के दिले. सॅम्सने डेव्हिड वॉर्नरला ५ धावांवर बाद केले. तर जसप्रीत बुमराहने मिशेल मार्शला पहिल्याच चेंडूवर बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉला २४ धावांवर बाद केले. यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह उजवा ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सर्फराज खानसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्कंडेयने सर्फराजला १० धावांवर बाद करत हा प्रयत्न हाणून पाडला. सर्फराज बाद झाल्यानंतर आक्रमक शैलीचा रोव्हमन पॉवेल पंतला साथ देण्यासाठी आला. ऋषभ पंत आणि रोव्हमन पॉवेल यांनी दिल्लीचा डाव ४ बाद ५० धावांपासून १२५ धावांपर्यंत नेला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली.

Advertisement

मात्र रमनदीपने ही जोडी फोडली. त्याने ३९ धावांवर खेळणाऱ्या पंतला बाद केले. त्यानंतर रोव्हमन पॉवेलने अक्षर पटेलला साथ देत दिल्लीला १५० च्या जवळ पोहचवले. मात्र ४३ धावा करून अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या रोव्हमनचा बुमराहने त्रिफळा उडवला. त्यानंतर रमनदीपने शार्दुल ठाकूरला ४ धावांवर बाद केले. अखेर दिल्लीचा डाव २० षटकात ७ बाद १५९ धावांमध्ये संपुष्टात आला. मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवल्यामुळे दिल्ली संघाला प्लेऑफचे तिकीट मिळाले नाही. याउलट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

Advertisement