चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीसोबत फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा जलद फलंदाज ग्लेन मॅक्सवेल धावाबाद झाला. पाहा त्यानंतर तो काय म्हणाला… आयपीएल २०२२मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विजय मिळवला. हा लढतीनंतर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याला त्याच्या एका सहकाऱ्याने अशी गोष्ट ऐकवली ज्याची त्याने कधीच कल्पना देखील केली नसले.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विराट आणि ग्लेन मॅक्सवेल फलंदाजी करत होते. आरसीबीच्या डावातील नवव्या षटकात एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल धावबाद झाला. आयपीएलच्या या हंगामात विराट-मॅक्सवेल जोडी फलंदाजी करत असताना दोन वेळा धावबाद झाली आहे. दोन्ही वेळेला विराटला वेगाने एक सिंगल धाव घ्यायची होती आणि त्यात मॅक्सवेल बाद झाला. चेन्नईविरुद्ध देखील असेच झाले. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल फक्त ३ धावांवर बाद झाला. ही धाव घेताना मॅक्सवेलने प्रथम नकार दिला होता. पण विराटला कोणत्याही परिस्थितीत धाव घ्यायची होती.
आरसीबीने ही लढत जिंकली असली तरी सामना झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये मॅक्सवेल विराटला गंमतीने म्हणाला, मी तुझ्या सोबत फलंदाजी करू शकत नाही. तु फार वेगाने धावतोस. या घटनेचा व्हिडिओ आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलाय. टी-२० क्रिकेटमध्ये धावबाद होण्याच्या घटनेत विराट ४० वेळा होता. त्यापैकी १५ वेळा स्वत: विराट बाद झालाय.
विराट आणि मॅक्सवेल हे दोन्ही फलंदाज वेगाने धावा करतात. पण टी-२० मध्ये विराट ५४.३ तर मॅक्सवेल ६२.४ टक्के चौकार मारून धावा करतो. टी-२०मध्ये मॅक्सवेलने ५ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. चौकारांच्या माध्यमातून धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो २२व्या स्थानावर तर विराट ५८व्या स्थानावर आहे. विराट सरासरी १२० धावानंतर एकदा आणि मॅक्सवेल १३८ धावानंतर एकदा धावबाद होतो.