रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर करणार चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफच्या विक्रमात बरोबरी

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर करणार चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफच्या विक्रमात बरोबरी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर करणार चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफच्या विक्रमात बरोबरी

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) पंधरावा हंगाम संपायला आला आहे. आयपीएल २०२२चे प्लेऑफचे सामने होत आहेत. पहिला क्वालिफायर सामना आणि एलिमिनेटर सामना संपल्यानंतर आता शुक्रवारी दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हे संघ आमने सामने असतील. या सामन्यादरम्यान आरसीबी संघाकडे प्लेऑफमधील एका विक्रमात चेन्नई सुपर किंग्जची (सीएसके) बरोबरी करण्याची संधी असेल.

आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा फलकावर लावण्याच्या विक्रमात आरसीबी सीएसकेची बरोबरी करू शकते. तसेच त्यांच्याकडे मुंबई इंडियन्सलाही मागे टाकण्याची संधी असेल. आरसीबीच्या फलंदाजांनी मिळून लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध झालेल्या एलिमिनेटर सामन्यात २०७ धावा केल्या होत्या. अशात जर राजस्थानविरुद्ध पुन्हा एकदा आरसीबीचे फलंदाज चमकले तर ते मुंबई इंडियन्सला सर्वाधिकवेळा प्लेऑफमध्ये २०० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमात मागे सोडतील.

Advertisement

रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने आतापर्यंत प्लेऑफमध्ये २ वेळा २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आरसीबीनेही २ वेळा हा पराक्रम केला असून ते सध्या मुंबईसोबत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशात जर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीने २०० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या, तर ते मुंबईला मागे सोडत सीएसकेची बरोबरी करतील. सीएसकेने सर्वाधिक ३ वेळा प्लेऑफमध्ये २०० धावा केल्या आहेत.

दरम्यान गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना झाला होता. या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने राजस्थानला पराभूत करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर लखनऊ सुपरजायंट्स व आरसीबी यांच्यात एलिमिनेटर सामना झाला, ज्यामध्ये आरसीबीने १४ धावांनी विजय मिळवत लखनऊला शर्यतातून बाहेर फेकले आणि क्वालिफायर २ चे तिकीट मिळवले. आता राजस्थान विरुद्ध आरसीबी यांच्यात २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुसरा क्वालिफायर सामना होईल. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात गुजरातशी भिडेल.

Advertisement