रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएल २०२२च्या ६०व्या सामन्यात शुक्रवारी पंजाब किंग्सविरुद्ध दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबने बेंगलोरने ५४ धावांनी पराभूत केले आणि सामना आपल्या खिशात घातला. हा पंजाबचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत मोठी झेप घेतली. पंजाबच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनी मोठे योगदान दिले.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, पंजाब किंग्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना बेंगलोर संघाला ९ विकेट्स गमावत १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबने हा सामना ५४ धावांनी खिशात घातला. पंजाब गुणतालिकेत आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानी पोहोचला.
बेंगलोरकडून यावेळी फलंदाजी करताना अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने २२ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त रजत पाटीदार याने २६, विराट कोहली याने २० धावांचे योगदान दिले. इतर कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करण्यात यश आले नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस फक्त १० धावांवर तंबूत परतला. यावेळी पंजाबकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडा याने शानदार कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ऋषी धवन आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, हरप्रीत ब्रार आणि अर्शदीप सिंग यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४२ चेंडूत ७० धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. तसेच, सलामीवीर जॉनी बेअरस्टो यानेही अर्धशतकी खेळी साकारली. त्याने अवघ्या २९ चेंडूत ६६ धावा केल्या. या धावा करताना त्याने ४ चौकार आणि ७ षटकार मारले होते. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. या दोघांव्यतिरिक्त शिखर धवनने २१ धावा केल्या. इतर एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही. कर्णधार मयंक अगरवाल १९ धावांवर बाद झाला. मात्र, बेअरस्टो आणि लिविंगस्टोनच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबने समाधानकारक धावसंख्या उभारली, ज्याचा त्यांना फायदा झाला.
यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना हर्षल पटेल सर्वात उजवा ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ३४ धावा देत ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त वनिंदू हसरंगा यानेही २ विकेट्स नावावर केल्या. तसेच, ग्लेन मॅक्सवेल आणि शाहबाज अहमद यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली. या विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेला पंजाब संघ २ गुणांचा फायदा घेत १२ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला. दुसरीकडे, बेंगलोर संघ १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.