नगर24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नगर महापालिकेतील तांत्रिक पदांच्या सुमारे १७५ रिक्त कर्मचाऱ्यांच्या जागा सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे भरण्यास मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बुधवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत रिक्त जागांवर कर्मचारी नियुक्त करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त पंकज जावळे यांनी दिली. दरम्यान, ही भरती प्रक्रिया झाल्यास मनपा स्थापनेनंतरची ही पहिलीच भरती प्रक्रिया ठरणार आहे.
महापालिकेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेचा २८९० जागांचा कर्मचारी आकृतीबंध मंजूर आहे. त्यातील प्रत्यक्ष सोळाशे जागांवर कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांशी तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामात अडथळे येत आहेत. या रिक्त पदांपैकी ९ जागा प्रतिनियुक्तीने, तर १७५ जागांवर सरळ सेवाभरती प्रक्रियेद्वारे कर्मचारी नियुक्त करण्यासाठी महापालिकेने नगर विकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
आस्थापना खर्चाची अट शिथिल करून ही पदे भरण्यास मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव आयुक्त डॉ. जावळे यांनी दिला होता. यात शहर अभियंता, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), जल अभियंता, उप अभियंता (विद्युत), माहिती व जनसंपर्क अधिकारी, पर्यावरण संवर्धन अधिकारी अशा सहा पदांवर प्रत्येकी एक व सहाय्यक नगररचनाकार पदावर तीन जणांची प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. तर संगणक प्रोग्रॅमर, शाखा अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक (ड्रॉप्समन) / आर्किटेक्चरल असिस्टंट, शाखा अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), शाखा अभियंता (विद्युत), विद्युत पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (ॲटोमोबाईल), गाळणी परिचर (पाणी लॅब लॅबटेक्निशियन), रक्तसंक्रमण अधिकारी, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, बधिरीकरण तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, परिचारिका (जी.एन.एम.), सहाय्यक परिचारिका / प्रसविका, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, लघुटंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी, सॅनिटरी सब इन्स्पेक्टर, सब ऑफीसर, ड्रायव्हर, ऑपरेटर, फायरमन या जागांवर १७५ जणांची सरळ सेवेतून भरती करण्याचा प्रस्ताव होता. त्याला बैठकीत परवानगी देण्यात आल्याची माहिती आयुक्त जावळे यांनी दिली. शासनाकडून अधिकृत मान्यता आल्यानंतर केवळ तांत्रिक पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.