राष्ट्रसंघात नाचायला परवानगी हाय!


जगात चाललेल्या बदलांना सामोरे जाऊन आगेकूच करतो आहोत. आम्ही ‘हरवलेले’ नाहीत.

Advertisement

माधव गाडगीळ madhav.gadgil@gmail.com

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच झालेल्या  आमसभेत अनेक राष्ट्रप्रमुखांची आणि विविध देशांच्या वक्त्यांची भाषणे झाली असली तरी सर्वाधिक चर्चा झाली ती दक्षिण कोरियाच्या ‘बीटीएस’ बँडची. त्यांच्या भाषणाचा विषय होता- ‘तरुण पिढीचे भवितव्य’! या बँडने केवळ भाषणच केले नाही, तर तिथे ते ‘नाचायला परवानगी हाय..’ हे गाणे गात मोठय़ा जोशात नाचलेदेखील! या आक्रिताबद्दल..

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा नुकतीच (२१ सप्टेंबर रोजी) भरली होती. त्यात अनेक राष्ट्रप्रमुखांनी आणि विविध देशांच्या शिष्टमंडळांतील काही वक्त्यांनी भाषणे ठोकली. ही सगळी भाषणे राष्ट्रसंघाच्या ट्विटरच्या चॅनेलवर चढवली (अपलोड) होती. राजकारण्यांपैकी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या भाषणाला सर्वात जास्त चार हजार हिट्स मिळाल्या. तर दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळातील ‘बीटीएस’ बँडच्या भाषणाला मिळाल्या- ६४ लाख हिट्स! या बँडमध्ये सप्तसुरांसारखेच सात गायक-वादक आहेत. त्यांच्या भाषणाचा विषय होता- ‘तरुण पिढीचे भवितव्य’! ते म्हणाले, ‘‘आमच्या पिढीचा जगावर खूप चांगला प्रभाव पडणार आहे. वयस्करांना खुशाल वाटू दे, पण आमची ‘वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसांची’ पिढी नाही. प्रौढांना आमचा मार्गच उलगडलेला नाही. आम्ही आहोत नव्या मनूचे शूर शिपाई. जगात चाललेल्या बदलांना सामोरे जाऊन आगेकूच करतो आहोत. आम्ही ‘हरवलेले’ नाहीत. आम्ही ‘स्वागतोत्सुक’ आहोत. आपण सगळे मिळून हवामानबदलावर मात करू या. लस टोचून घेऊन करोना व्याधीला नेस्तनाबूत करू यात.’ या ‘बीटीएस’ बँडने राष्ट्रसंघाच्या आमसभेपुढे केवळ भाषणच केले नाही, तर तिथेच ते ‘नाचायला परवानगी हाय’ हे गाणे गात मोठय़ा जोशात नाचलेदेखील. त्याची चित्रफीतसुद्धा राष्ट्रसंघाने आपल्या ट्विटरच्या चॅनेलवर चढवली आहे. दोन दिवसांतच त्याला सव्वा कोटी हिट्स मिळाल्यात! असे हे गाणे आहे तरी काय?

‘नाचायला परवानगी हाय’

Advertisement

भर ज्वानीच्या वादळामंदी

आमच्या दिलाचं वाजतंय ढोलकं

Advertisement

वाढतोय वाढतोय आवाज वाढतोय

तशी रातीची थंडी पण वाढतेय

Advertisement

तरी लयीच्या मागं, सुराच्या मागं,

धावतोय पळतोय जोशात

Advertisement

आता सपान भरतंय डोळ्यात, डोळ्यात

मग तुतारी फुंकतो आणिक सांगतो

Advertisement

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

अन् नाचतो नाचतो बेभान बेभान

Advertisement

बनतो सोन्याचं अन् रंगतो नाचात बेदरकार बेदरकार

आम्हा ना काळजी कशाची

Advertisement

धडपडतो तरी उभे ठाकतो भक्कम पायावरी

आम्हा ना हताश कोणी करी

Advertisement

काही तरी येतं वाटेत आडवं

पण आम्ही नाही त्याला जुमानत

Advertisement

आम्ही नाही कोणाला इचारत

आमची लय कधी थांबणार नाय,

Advertisement

आम्ही कधी मागे फिरणार नाय

कुणाला काय दाखवायचं नाय आम्हाला आमची नशा पुरे

Advertisement

आता कशाला थांबायचं, आता तर आली आहे वेळ

आम्ही पुढे पुढे चालणार आणि बघत राहणार

Advertisement

पूर्वेला तांबडं फुटताना

मग चालणार चालणार, बोलत राहणार

Advertisement

आम्ही सोन्याचे बनलोय ना

कुणाला काय पण दाखवायचं नाय आम्हाला

Advertisement

आमची नशा पुरे

मग म्हनतो म्हनतो

Advertisement

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

बनतो सोन्याचं अन् गातो नाचतो स्वच्छंदी स्वच्छंदी’

Advertisement

बँडच्या या लोकप्रियतेचे रहस्य काय आहे? एकतर लोकांना भंपक पुढाऱ्यांची भंकस भाषणे ऐकायची हौस नसते. उलट, नाच-गाणे माणसाच्या रक्तातच आहे. याला साथ आहे तंत्रज्ञानाच्या करामतीतून नव्याने उपजलेल्या विश्वसंचारी सामाजिक माध्यमांची. देशांच्या सीमा न जुमानणारी ही माध्यमे भारताच्या कानाकोपऱ्यांत गावागावांपर्यंत पोहोचली आहेत. इथे माझे अनेक तरुण शेतकरी, आदिवासी, धनगर, मच्छीमार मित्र आहेत. आणि ते पुढे सरसावून उत्साहाने जी कर्तबगारी गाजवताहेत, ती मी खुशीत बघतो आहे. शेतकऱ्यांत माझे कर्नाटकाच्या तुमकुरू जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी खास घनिष्ठ संबंध आहेत. १९७३ साली बेंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये रुजू झाल्या झाल्या मी सफाईने कानडी बोलायला, लिहायला, वाचायला शिकलो आणि तिथल्या समाजात समरस झालो. तुमकुरूमधल्या एका शेतकरी कुटुंबातला शेषगिरी हा माझा विद्यार्थी होता. १९९० पासून अनेकदा त्याच्या शेतावर मी राहायला जातो आणि शेतकऱ्यांचं काय चाललंय ते समजावून घेतो. पैसे कमावण्यासाठी ते शेतीच्या जोडीलाच गायी, म्हशी, शेळ्या, मेंढय़ा पाळतात. शेतावरच्या चिंचा, जांभळे विकतात. मोकळ्या वेळात शहरात जाऊन घरे रंगवण्यासारखे उद्योग करतात. त्यांना पिकांवरची, झाडांवरची कीड, रोगराई, गुरांच्या व्याधी, वेगवेगळ्या उत्पादनांच्या बाजारपेठा, बाजारभाव, मजुरीचे दर अशी नानाविध माहिती हवी असते. शासन, शेती विभाग, कृषी विद्यापीठे असली काहीही माहिती पुरवत नाहीत. त्यांना असतो एकच गुरू.. गावाजवळचा रासायनिक खते, कीटकनाशके विकणारा दुकानदार. खरेदी-विक्रीसाठी ते मध्यस्थीतून फायदा उकळणाऱ्या व्यापाऱ्यांवर अवलंबून असतात. शासन फक्त शेतमाल विक्रीवर बंधने लादून आणि भाव चढेल तेव्हा आयात करत भाव पाडून त्यांना चेचून टाकते.

२००५ सालानंतर ग्रामीण भागांत मोबाइल फोन पोहोचल्यावर बाजारपेठा, बाजारभाव, मजुरीचे दर आदी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागली. तेव्हा मग तुमकुरूच्या तरुण शेतकऱ्यांनी तिथल्या कोरडय़ा हवेचा आणि प्रक्रियेसाठी कमी मजुरीची अपेक्षा करणाऱ्या स्थानिक महिलांचा फायदा उठवत स्वत:हून केरळातून सुपारीची आयात सुरू केली. जवळच भीमसमुद्राची बाजारपेठ आहे. तिथे सुपारी विकत काही वर्षांतच स्वबळावर ३०० कोटी रुपयांचा व्यापार उभारला. यातून केवळ सधन सुपारी मळेवाल्यांचाच फायदा झाला असे नाही, तर अंगच्या कौशल्याला मागणी वाढल्यामुळे भूमिहीन कुटुंबांतील महिलांचीही आर्थिक स्थिती आज सुधारली आहे. यासाठी त्यांना शासनाने वा शासकीय तज्ज्ञांनी काडीचीही मदत केलेली नाही. परंतु खरा क्रांतिकारक बदल झाला तो २०१५ सालापासून.. स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध झाल्यानंतर. स्मार्टफोनमुळे शेतकऱ्यांना हवी असलेली भरघोस माहिती उपलब्ध होत आहे. प्लांटिक्स’ हे याचे नामी उदाहरण होय. ‘प्लांटिक्स’ हे एका जर्मन कंपनीने विकसित केलेले, पूर्णपणे विनाशुल्क, मोबाइलद्वारा पीकपाण्याबद्दल माहिती पुरवणारे अ‍ॅप आहे. पीक कसे दिसते आहे, त्यावर कुठली कीड किंवा रोग पडला आहे याचा फोटो काढला की लगेच तुम्हाला पिकाला काही पौष्टिक द्रव्याची त्रुटी आहे का, त्यावर कुठली कीड, कुठला रोग पडला आहे आणि त्यावर काय उपचार करावेत याची माहिती सहजी उपलब्ध होते. प्लांटिक्सची शेतकरी आणि शास्त्रज्ञांची ऑनलाइन कम्युनिटी आहे. त्यात सामील होऊन कोणाही शेतकऱ्याला त्याच्या पिकासंबंधातील कुठल्याही समस्येवर माहिती विचारता येते. तसेच आसमंतातल्या हवामानाचे अंदाज त्यावर बघता येतात. जगभरातल्या शेतकऱ्यांकडून प्लांटिक्सकडे नवनवी छायाचित्रे येत असतात. या सतत वृद्धिंगत होत जाणाऱ्या माहिती भांडारातून नवनवा समज निर्माण होतो, तो जगभरातल्या कुठल्याही शेतकऱ्याला उपलब्ध असतो. गुगल लेन्स अ‍ॅपमधून शेतकऱ्यांना वनस्पतींच्या वैज्ञानिक नावांचीही माहिती मिळते. या सगळ्यातून प्लांटिक्स स्वत:चा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारा कॉम्प्युटर प्रोग्राम सुधारत राहतो. त्यांचा हा कॉम्प्युटर प्रोग्राम जणू काही एक डेटाभक्षक बकासुरच आहे. हा सज्जन बकासुर सगळा डेटा खाऊन स्वत: आणखी आणखी बलदंड होतोच, पण जो त्याला डेटा भरवतो त्यालाही बळ देतो. दुर्दैवाने भारतातील शासनाला शेतकऱ्यांना खरीखुरी माहिती पुरवावी, त्यांनी ती वापरावी अशी सुतरामदेखील इच्छा नाही. आपल्या परीने ते शेतकऱ्यांच्या शोषणातच मग्न आहेत. याउलट, प्लांटिक्स, गुगलसारख्या कंपन्यांना स्वत:च्या हितासाठी जगभरातले जितके जास्त लोक त्यांचे अ‍ॅप वापरतील तितके लोक हवेच आहेत. या मूलभूत फरकामुळे जे वेगळेच युग अवतरले आहे, त्यातून शेतकऱ्यांची आणि त्यांच्याबरोबरच भूमिहीन शेतमजुरांचीही आर्थिक स्थिती सुधारू लागली आहे. अशा भूमिहीन कुटुंबांतील अनेक महिला बकऱ्या सांभाळतात. या व्हॉट्सअ‍ॅपसारखे गट तसेच ओएलएक्स आणि क्विकरसारखी ऑनलाइन विक्रीपीठे वापरून आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा मिळवू लागल्या आहेत. बिहारमधील मागास जिल्ह्यांतील महिलासुद्धा आपल्या बकऱ्यांचे स्मार्टफोनने फोटो घेऊन ते ऑनलाइन विक्रीपीठांवर चढवून पाच-सहाशे किलोमीटर इतक्या दूरच्या बाजारांतून आपल्या बकऱ्या विकून दीडपट नफा कमावू लागल्या आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांपाशी स्वत:च्या लहान-मोठय़ा शेतजमिनी तसेच भूमिहीन मजुरांकडे शेतीतून उपलब्ध होणारा काडीकचरा, बांधावरील झाडे, पडिक भागातील वनस्पती अशी काही ना काही संसाधने आहेत. खरे दु:स्थितीत आहेत ते वननिवासी, भटकंतीवर जगणारे मेंढपाळ आणि मच्छीमार. यातल्या वननिवासी मंडळींसाठी २००६ सालीच वनाधिकार कायदा पारित झाला आहे. मात्र त्याची देशभर अंमलबजावणी व्हायला हवी होती. परंतु त्यांना निराधार ठेवण्यातच हितसंबंध गुंतलेल्या खाणवाल्या व कागद गिरणीवाल्या धनदांडग्यांनी हा कायदा अमलातच आणू दिलेला नाही. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात मात्र प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आदिवासींचे समर्थ नेतृत्व एकत्र आल्यामुळे अकराशे ग्रामसभांना लक्षावधी हेक्टर सामूहिक वनसंपत्तीवर अधिकार मिळाले आहेत. त्यातून ते बांबू, तेंदू, हिरडा अशा गौण वनोपजांवर प्रक्रिया व त्यांची विक्री करू शकतात. २००९ साली त्यांना हे हक्क मिळाल्यापासून मी शास्त्रज्ञ या नात्याने गडचिरोलीतल्या ग्रामसभांना व्यवस्थापनासाठी आवश्यक अशा संसाधनांची सुव्यवस्थित पाहणी करण्यासाठी मदत करतो आहे. या गावांतल्या युवकांमधून बळकट नेतृत्व पुढे येते आहे. अशांतलाच एक आहे गोंड सादूराम मडावी. या तरुणांचा माझाही सहभाग असलेला एक व्हॉट्सअ‍ॅप गट आहे. त्यांना आपल्या आसमंतातील वनस्पती आणि प्राण्यांबद्दल खूप कुतूहल आणि अनुभवजन्य चांगली समज आहे. त्यांची सतत चर्चा चालू असते. सुरुवातीला आम्ही वनस्पती व प्राण्यांच्या वैज्ञानिक नावांची माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु त्या पंडितांना ज्ञानावरची आपली मक्तेदारी सोडायची नव्हती. मग अचानक काही महिन्यांपूर्वी सादूराम सर्व वनस्पती व प्राण्यांची अचूक वैज्ञानिक नावे पुरवू लागला. त्यावर मी चकित होऊन त्याला विचारल्यावर कळले की त्याने आपणहून गुगल लेन्स अ‍ॅपचा वापर कसा करायचा हे समजावून घेतले आणि त्यावर छायाचित्रे चढवून त्याद्वारे तो व्यवस्थित वैज्ञानिक नावे पुरवतोय. त्यांना हे फार उपयोगाचे आहे. कारण एकदा का वैज्ञानिक नावे मिळाली की त्यांचे हक्क असलेल्या वनस्पतींच्या जगभरच्या वेगवेगळ्या उपयोगांबद्दल, त्यावरील प्रक्रियांबद्दल आणि भारतातील इतर बाजारपेठांबद्दलची माहिती त्यांच्या हाती येते. हे सगळे कर्तब करून दाखवणारा सादूराम हा आदिवासींना उपलब्ध असलेले शिक्षण कुचकामी असल्याने आणि त्याचे इंग्रजी कच्चे असल्याने दहावी नापास झालेला आहे. पण आज गडचिरोलीतील महाविद्यालयांमधील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक त्याच सादूरामची मदत घेऊ लागले आहेत. ही आहे नव्या मनूला ‘सुस्वागतम्’ म्हणणाऱ्या तरुणाईची करामत! त्यांच्या कर्तृत्वातून दिवसेंदिवस जगात खूप चांगले क्रांतिकारक बदल होत राहतील अशी मला पक्की खात्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement