मुंबई7 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्धव ठाकरे यांच्या काल खेडमध्ये झालेल्या सभेत ठाकरेंच्या टोलेबाजीला संतापलेल्या रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कडव्या शब्दात प्रत्यूत्तर दिले आहे. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ना’ असे म्हणत कदमांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
“उद्धवसाहेब तुम्ही एकदा नाही तर शंभर वेळा खेडमध्ये आलात तरी योगेश कदमला पाडू शकणार नाही. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे.” असेही ते म्हणाले. शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथे सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी जोरदार फटकेबाजी करत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावरच रामदास कदम यांनी पलटवार केला आहे.
शब्दांमध्ये तुम्ही अडकलात
काल विराट सभा झाली असे तुम्ही म्हणालात पण कालच्या सभेत खेडचे किती लोक होते? मुंबई ठाण्यातून किती लोक आणले होते. काही लोक भाषण सोडूनही जात होते असे रामदास कदम म्हणाले. चोर, गद्दार, खोटे या शब्दांमध्ये तुम्हीच अडकला आहात. ज्याला काविळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते. बाळासाहेब असले असते तर तुम्हाला मुख्यमंत्री होता आले असते का? असा सवालही त्यांनी विचारला.
मला संपवण्याचे प्रचंड प्रयत्न
रामदास कदम म्हणाले की, माझा मुलगा योगेश कदमला तुम्ही संपवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. योगेश कदम यांना संपवण्यासाठी काय कारस्थान झालं ते 19 तारखेला उदय सामंत सांगणार आहेत. मला तर तुम्ही संपवणार होताच. मीडियासमोर जाण्याची मला बंदी घातली होती.” “2009 च्या निवडणुकीत मला पाडा असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचा दावाही रामदास कदम यांनी केला.
तुम्ही गद्दारी केली
उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना तुमचे हात बरबटलेले आहेत. तुम्ही भ्रष्टाचारी आहात. तुम्ही अशोक पाटील यांचे तिकीट कापण्यासाठी किती पैसे घेतले? मुख्यमंत्री होण्यासाठी तम्ही गद्दारी केली. तुम्ही गद्दार आहात. तुमच्या भोळ्या चेहरामागे अनेक चेहरे आहेत, ते चेहरे मी ओळखतो, याचा मी साक्षीदार आहे.”