मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
राज्यात आजपासून काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.पुढील 72 तासांत विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. एकीकडे तापमानात होणारी वाढ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर हे आसमानी संकट यामुळे बळीराजी हवालदिल होताना दिसून येते आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईचा पारा 39 अंशावर वर गेला आहे. हा पारा थोडा तरी कमी होईल अशी आशा प्रत्येकाला होती. मात्र अद्याप तरी पारा कमी झाल्याचे दिसत नाही. आजही मुंबईत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
येत्या तीन दिवसांत हवामानाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत. 15 ते 17 मार्चपर्यंत देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.अशातच हवामान विभागाने पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचे हाल होत आहे. दुसरीकडे देशात H3N2 विषाणूचा वाढता कहर वाढत चालला आहे.
मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यात तुरळक आणि हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. विदर्भात 14 ते 16 मार्च दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. कापणीला आलेल्या पिकांचा फटका बसण्याची शक्यता आहे, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पुन्हा गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, नंदुरबारला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
या राज्यात पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार आज आणि उद्या म्हणजे रविवारी आणि सोमवारी जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 13 आणि 14 तारखेला हिमाचल प्रदेश आणि 13 मार्चला राजस्थानमध्ये हवामान खराब असणार आहे. 13 आणि 14 तारखेला उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीटसह पावसाची शक्यता आहे.