एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काढे ढग दाटून आले असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत.
शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी
अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. आधीच कांदा, पालेभाज्या यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळे बळीराजाची दुहेरी कोंडी झाली आहे.
पुणे हवामान विभागाने जारी केलेले आजचे उपग्रह छायाचित्र. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांवर ढग दाटून आल्याचे दिसत आहे. अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापल्याचे दिसत आहे.
विजांच्या कडकडाटासह पाऊस
नाशिक शहरासह ग्रामीण भागात मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये रात्री पावसाच्या सरी बरसल्या. शहरातही सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
बुलढाणा तसेच पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पालघरमधील विक्रमगड, जव्हाव व इतरही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बागायतदारांचे नुकसान होण्याची भीती आहे. तसेच, बुलढाण्यातील गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.
उद्या गारपीठीची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस मराठवाडा-विदर्भ भागांवर वादळी पावसाचे संकट आहे. 7 मार्चला दाेन्ही विभागांत गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात कमाल तापमान 38 अंशापुढे जात असताना 4 मार्चपासून वातावरण ढगाळ झाले आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या असलेल्या अवकाळीच्या संकटाने निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. 8 मार्चनंतर अवकाळीचे वातावरण निवळू शकते.
केळीची रोपे कोसळली
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले. वरझडीत वीज पडून दोन बैलाचा मृत्यू झाला. हिंगोणीत केळीच्या बागेतील रोपे कोसळली. दहिवदला गारपिटीने पिकांचे नुकसान झाले.
सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ
काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. प्रत्येक कुटुंबात सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळत आहेत. घरातील एकाला हा आजार झाल्यानंतर सर्वच जण आजारी पडत आहेत. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठांना त्याचा अधिक फटका बसत आहे. रुग्णांना दवाखान्यात भरती करण्याची गरज पडत नाही. मात्र, खोकल्याचे प्रमाण वाढत असून किमान दहा ते पंधरा दिवस तो कायम राहत आहे.छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात सर्वत्र सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. घाटीत चाळीस ते पन्नास टक्के रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याचे आहेत. जिल्हा रुग्णालय आणि खासगी दवाखान्यांतही रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
कोरोना काळात जी काळजी घेतली, तशी पुन्हा घ्यावी
घाटीच्या मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, हा सामान्य फ्लू आहे. हवामान बदलामुळे या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना आजार बळावतोय. खोकला, शिंकेतून होणारा हा आजार आहे. त्यामुळे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हात स्वच्छ धुणे, कोरोनाकाळात आपण जी काळजी घेत होतो, ती पुन्हा घेणे गरजेचे असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले.
संबंधित वृत्त
अवकाळी पावसामुळे बळीराजा हवालदील:विक्रीसाठी शेतात, बाजारपेठेत काढून ठेवलेला कांदा भिजला; हरभरा, गहू, द्राक्ष पिकांचेही नुकसान
नाशिकमधील लासलगाव व परिसरात सोमवारी पहाटे 4 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विक्रीसाठी आणलेला शेतकऱ्यांचा कांदा भिजला आहे. बळीराजाला एकीकडे कांदा व द्राक्ष यांची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत असताना दुसरीकडे अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाचा सविस्तर