विजयाचं पारड कधी इकडे तर कधी तिकडे अशा पद्धतीने झुकणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ३ धावांनी सामना खिशात टाकला. इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील २०वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झाला. राजस्थानच्या विजयाचे शिल्पकार कुलदीप सेन आणि युझवेंद्र चहल ठरले. या सामन्यातील विजयासह राजस्थानने हंगामातील आपला तिसरा सामना खिशात घातला. दुसरीकडे लखनऊ संघाला दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पर्पल कॅप चहलला सामनावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सामन्यात लखनऊ संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, राजस्थानला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी राजस्थानने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या आणि लखनऊला १६६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला २० षटकात ८ विकेट्स गमावत १६२ धावाच करता आल्या.
लखनऊची झुंज अपयशी
लखनऊ संघाकडून फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. डी कॉकने ३२ चेंडूत १ षटकार आणि २ चौकार मारत ३९ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्कस स्टॉयनिसने १७ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. तसेच, दीपक हुड्डाने २५, कृणाल पंड्याने २२ धावा केल्या. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही.
यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना युझवेंद्र चहलने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्टने २ विकेट्स घेतल्या. तसेच, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या खिशात घातली. विशेष म्हणजे, कुलदीप सेनचे हे आयपीएल पदार्पण होते.
राजस्थान संघाचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाकडून शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. या धावा करताना १ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कलने २९, आर अश्विनने २८, तर कर्णधार संजू सॅमसन आणि जॉस बटलरने प्रत्येकी १३ धावा केल्या. या खेळाडूंव्यतिरिक्त कुणालाही २ आकडी धावसंख्या पार करता आली नाही.
यावेळी गोलंदाजी करताना लखनऊ संघाकडून जेसन होल्डर आणि कृष्णाप्पा गौतमने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. होल्डरने ४ षटके गोलंदाजी करताना ५० धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर गौतमने ४ षटकात ३० धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त आवेश खानने ४ षटके गोलंदाजी करताना ३१ धावा देत १ विकेट आपल्या नावावर केली. या सामन्यातील विजयासह राजस्थान संघाने गुणतालिकेत अव्वल क्रमांक पटकावला आहे. दुसरीकडे लखनऊ संघ पाचव्या क्रमांकावर घसरला आहे.