राजवाड्यांनी दाखवून दिले की आम्हीच खरे रॉयल्स; आता फायनलमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार

राजवाड्यांनी दाखवून दिले की आम्हीच खरे रॉयल्स; आता फायनलमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार
राजवाड्यांनी दाखवून दिले की आम्हीच खरे रॉयल्स; आता फायनलमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार

राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलरने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचे १५८ धावांचे आव्हान पार करताना हंगामातील आपले चौथे शतक ठोकत राजस्थानला फायनलमध्ये पोहचवले. राजस्थानने बेंगलोरचे १५८ धावांचे आव्हान १८.१ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने ६० चेंडूत १०६ धावा ठोकल्या. राजस्थानने सामना ७ विकेट राखून जिंकत आयपीएल २०२२ ची फायनल गाठली. आता राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रविवारी फायनल सामना होईल.

या विजयासह राजस्थान संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता त्यांना पहिल्या क्वालिफायर सामन्यात ज्या संघाने मात दिली होती, त्या गुजरात टायटन्स संघाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. क्वालिफायर २ सामन्यात जोस बटलर याने राजस्थानच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बटलरला त्याच्या शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. दरम्यान, सामना जिंकण्यासाठी ४ धावांची गरज होती आणि बटलर ९९ धावांवर होता. त्याने एक धाव घेत आयपीएलच्या एका हंगामातील चौथे शतक ठोकले. याचबरोबर त्याने विराट कोहलीच्या एका हंगामात चार शतके ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीने हा विक्रम २०१६ ला केला होता. या विक्रमानंतर बटलरने षटकार मारत सामना संपवला. राजस्थानने सामना ७ विकेट राखून जिंकत आयपीएल २०२२ ची फायनल गाठली.

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा ठरवण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या खेळाडूंना अपयश आले. बेंगलोर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्स गमावत १५७ धावा चोपल्या. या धावांचे आव्हान राजस्थानने १८.१ षटकात ७ विकेट्स शिल्लक ठेवत पूर्ण केले.

राजस्थानकडून फलंदाजी करताना जोस बटलर चांगलाच चमकला. त्याने ६० चेंडूत नाबाद १०६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि १० चौकारांचाही पाऊस पाडला. याव्यतिरिक्त कर्णधार संजू सॅमसन यानेही चांगली खेळी केली. त्याने २३ धावांचे योगदान दिले, तर सलामीवीर यशस्वी जयसवाल यानेही २१ धावा चोपल्या. यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूड याने २ विकेट्स घेतल्या. तसेच, वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली.

Advertisement

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून धावा करताना रजत पाटीदार अव्वलस्थानी राहिला. त्याने ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्याच्या या अर्धशतकी खेळीत ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त फक्त फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला. फाफने २५ धावा, तर मॅक्सवेल याने २४ धावांचे योगदान दिले. माजी कर्णधार विराट कोहली याला फक्त ७ धावांवर समाधान मानावे लागले.

यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. कृष्णाने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच, मॅकॉय यानेही ४ षटकात २३ धावा देत ३ विकेट्स घेण्याची किमया केली. या दोघांव्यतिरिक्त आर अश्विन आणि ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. आता या विजयानंतर राजस्थान संघ रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आयपीएल २०२२मधील अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडेल.

Advertisement