अमरावती4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
येत्या काळात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी अलिकडेच जाहीर झाली. या यादीची अंतिम घोषणा येत्या 25 ऑगस्टला होईल. दरम्यान सध्या ही यादी नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आली असून त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार सदर यादीवर 25 जणांनी आक्षेप नोंदविले असून त्यावरील सुनावणी सुरु आहे.
मतदार नोंदणीचा अर्ज दाखल केला परंतु यादीत नाव उमटले नाही, नावात किरकोळ चुका झाल्या, पत्याचे ठिकाण, वय, लिंग याचा नेमका उल्लेख झाला नाही, अशाप्रकारचे हे आक्षेप आहेत. तालुका पातळीवरील एसडीओंनी हे आक्षेप ऐकूण घेतले असून त्यावर योग्य तो निकाल देण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करुन आगामी २५ ऑगस्टला अंतिम मतदार यादी घोषित केली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक विभागाच्या मते मतदार यादीची घोषणा होताच कदाचित राज्य निवडणूक आयोग या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करेल.
निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मोर्शी तालुक्यातील रिध्दपुर ही सर्वात मोठी १७ सदस्यीय ग्रामपंचायत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने या गावांतील मतदारसंघांचे (प्रभाग) आरक्षण यापूर्वीच घोषित केले असून मतदार यादीचे प्रारुपही 10 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आले. या प्रारुपावर 21 ऑगस्टपर्यंत आक्षेप मागवण्यात आले असून सुनावणीअंती 25 ऑगस्टला अंतिम मतदार यादी घोषित केली जात आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार सर्व ग्रामपंचायतींच्या याद्या ऑनलाइन घोषित केल्या जाणार होत्या. त्यावरील आक्षेप व सूचनांसाठीही ऑनलाईन वेळापत्रकच ठरविण्यात आले होते. परंतु नंतर त्यात बदल करुन परंपरागत पद्धत वापरण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आपल्या सूचना व हरकती कागदावर लिहून संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करता आल्या.