मुंबई8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिंदे गटाकडे मी पक्ष म्हणून पाहत नाही, शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेल्या कोंबड्याचा खुराडा आहे. तो रोजकीय पक्ष नाही, या कोंबड्या कधीही कापल्या जातील, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय विचारधारा आहे. निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. शिंदे गटातील लोक कोंबड्यासारखे कोक-कोक करत असतात, असा टोलाही त्यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाला लगावला आहे.
दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, फडफड करणाऱ्या कोंबड्यांच्या मानेवर भाजप एकदाच सुरी फिरवेल. त्यांना लोकसभेच्या 22 नाही तर 5 जागा जरी भेटल्या तरी खूप आहे. आम्ही मागच्या वेळी 19 जागांवर विजयी झालो होतो आताही 19 जागांवर विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, नंतर आता महाराष्ट्राच्या सत्ता नाट्यावर ‘डायरी ऑफ महाराष्ट्र खोका’ असा चित्रपट काढणार असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींना निमंत्रण नाही हा मुद्दा
संजय राऊत म्हणाले की, नव्या संसद भवनाचे 28 मे रोजी उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, 20 प्रमुख पक्षांचा विरोध नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास नाही. उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच! असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना दूर का ठेवले
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आले आहे. मात्र, उपराष्ट्रपती यांचेही नाव यावर टाकण्यात आले नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, आणि मग पंतप्रधान असा क्रम असतो तो कुठे आहे. असा सवाल संजय राऊत् यांनी उपस्थित केला आहे. मुळ प्रश्न हाच आहे की राष्ट्रपतींना दूर का ठेवले? उपराष्ट्रपतींना दूर का ठेवले असे काही प्रश्न ही त्यांनी उपस्थित केले आहे.