मुंबई14 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे, तर काँग्रेस दोन नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे अजित पवारांनी तसे विधान करणे काहीही चुकीचे नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
अजित पवार यांनी महाविकास आघाडीत आम्ही मोठे भाऊ असे वक्तव्य केले. त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीतून टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
काय म्हणाले दादा?
महाविकास आघाडीमध्ये सध्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले होते की, तुमची ताकद जास्त असेल, तरच तुम्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिले जाईल. पूर्वी जागावाटपात काँग्रेसला जास्त जागा मिळायच्या. आम्हाला लहान भाऊ ही भूमिका घ्यावी लागायची. मात्र, आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत, असे म्हणत सध्याच्या विधानसभेतले चित्रही स्पष्ट केले होते. सध्या काँग्रेसकडे 44, राष्ट्रवादीच्या 54, तर उद्धव ठाकरेंकडे 56 आमदार होते.
काय म्हणाले चव्हाण?
अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपल्या पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक वक्तव्य करतात. आजच्या महाविकास आघाडीत विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे. नंतर उद्धव ठाकरे गट तीन नंबरचा आहे. त्यामुळे त्यात विधान करणे काही चुकीचे नसल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडीत धुसफूस सुरू
लोकसभेच्या जागावाटपावरून सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. संजय राऊत यांनी ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 19 जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे. तर नाना पटोले यांनी जागा वाटपाबाबत प्रत्येक पक्षाने चाचपणी करावी. मात्र, जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होईल. मविआतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल त्याप्रमाणे तिथे निर्णय घेतले जातील. पारंपरिक मतदार संघाबाबत म्हणायचे तर वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही समित्या तयार केल्या आहेत. त्यातही मेरिटच्या आधारावर चर्चा होणार असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा चुरशीची
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची 17 मे रोजी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. त्यात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार क्रमांक दोनवर होते, त्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्यात. याचा मोठा फटका शिवसेनेच्या ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे. कारण 2019 मध्ये राज्यातल्या 288 विधासनसभा मतदारसंघात 48 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली. विशेष म्हणजे यातल्या 18 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची थेट शिवसेनेसोबत लढत झाली. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मग पुढे काय?
शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभेच्या जागावाटपाचीही प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार भाजपकडील 105 जागांपैकी 45% जागा उद्धवसेनेने, 30% राष्ट्रवादीने व 15 टक्के काँग्रेसने लढवाव्यात असे ठरले. वंचित, सपा, कम्युनिस्ट पक्ष, शेकाप या छोट्या पक्षांना 10 जागा मिळू शकतात. एकीकडे जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतले नेते असे काही ठरले नसल्याचे सांगत आहेत. तर एकमेकांना खिंडीत गाठण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या काळात जागावाटपावरचा सुप्त संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तर आघाडीचे काय होणार, हा प्रश्न कायम असेल.
इतर बातम्याः
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा चुकीची, अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण; दानवे म्हणाले – नो नो!