रहाटगावचे देशी दारू दुकान महिनाभरासाठी बंद: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; महिलांनी केले होते आंदोलन

रहाटगावचे देशी दारू दुकान महिनाभरासाठी बंद: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; महिलांनी केले होते आंदोलन


अमरावती2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महिलांनी एकत्र येऊन केलेल्या आंदोलनानंतर नजिकच्या रहाटगाव येथील देशी दारू दुकान महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज, गुरुवारी दुपारी दिले. या आंदोलनामुळे जिल्हाकचेरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Advertisement

भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. गावच्या मध्यभागी असलेल्या या देशी दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. किमान यापुढे तरी समाजाची हानी होऊ देऊ नका, असा आर्त स्वर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना महिलांनी ऐकविला. काहींनी आपली आपबिती कथन करीत कुटुंबांची कशी हानी झाली, हेही सांगितले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सदर देशी दारु दुकान महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय या महिनाभराच्या काळात संबंधित यंत्रणेने ते दुकान कायमस्वरुपी बंद करुन नागरिकांच्या मागणीची पुर्तता कशी करता येईल, याबाबत विचार करावा, हेही स्पष्ट केले.

भीम ब्रिगेडच्या निवेदनानुसार सदर दुकान मध्यवस्तीत असल्याने तर अडचण आहेच. शिवाय ते नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरु राहत असल्याने आणखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पहाटे 4 ते रात्री 1 वाजेपर्यंत ते सुरू राहात असल्याने गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील मद्यपी तेथे येऊन दारू पितात. त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून तेथून मोठ्या प्रमाणात इतरत्र दारुची वाहतूक केली जाते, हेही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह दारुबंदी विभागाचे अधिकारी व पोलिसांच्या लक्षात आणून दिले.

Advertisement

ही संपूर्ण वस्तुस्थिती ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करुन दुकान महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले. शिवाय दुकान कायमस्वरुपी बंद करण्याच्या मागणीबाबत योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. एसीपी पूनम पाटील आणि गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलकांना नियंत्रीत करीत यशस्वी तो़डगा काढण्यास प्रशासनाला मदत केली.

आंदोलनात राजेश वानखडे यांच्यासह विक्रम तसरे, प्रवीण मोहोड, नितीन काळे, शरद वाकोडे, अंकुश आठवले, संगीता डोंगरे, उषा वानखडे, पूनम भालेराव, ज्योत्सना इंगळे, दयाबाई इंगळे, इंदूबाई राऊत, अनिता वानखडे, पद्मा बनसोड, सुनंदा वानखडे, आम्रपाली फुलमेटे, सुनीता राऊत, ममता पाटील, संगमा धाकडे, अंजली निरगुडे, वंदना मनोहरे, कमलाबाई राऊत ललिता तायडे, राजकन्या डांगे, सुमित्रा वानखडे, प्रतीभा उके, दुर्गा राऊत आदींनी सहभाग नोंदविला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement