पुणे | प्रतिनिधी35 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी आज रवींद्र धंगेकरांनी त्यांची भेट घेतली.
कसबा विधानसभाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, कसबा पोटनिवडणुकीत लोकांचा आवाज यावेळी महाविकास आघाडीसोबत होता. महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केले, याचा विजय हा परिणाम आहे. आगामी निवडणुकीत सर्व पक्ष एकत्रित येऊन सामोरे गेले आणि काम केले तर चांगला परिणाम दिसून येईल. महाराष्ट्रातही लोकांना बदल हवा आहे.
गिरीश बापट यांना डावलून भाजपचे निर्णय
शरद पवार म्हणाले, भाजपचा गड असलेला कसबा मतदारसंघाचे अनेक वर्षे खासदार गिरीश बापट यांनी प्रतिनिधित्व केले. ते केवळ भाजप पुरते मर्यादित नव्हते. तर गिरीश बापट यांनी अन्य पक्षांसोबतही चांगले संबंध ठेवले होते. बापट यांना डावलून भाजपने निर्णय घेतले. त्याचा फायदा होईल असे आम्हाला वाटले होते. मात्र, तसे झाले नाही.
शरद पवार, रवींद्र धंगेकर यांच्यासह पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते.
कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकर सक्षम
शरद पवार म्हणाले, माझी आणि रवींद्र धंगेकर यांची जुनी ओळख नाही. परंतु एक कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकर सक्षम होते. रवींद्र धंगेकरांनी अनेक वर्षे सामाजिक काम केले. त्यामुळे त्याचा परिणाम जाणवला. पोट निवडणुकीत पैसे वाटपाबाबत मला लोकांनी फोटो दाखवले ते राजकीय कार्यकर्ते नव्हते. अनेक वर्षांपासून मतदारांनी वेगळा विचारसरणीस मते दिली. पण, यंदा आम्ही गैरप्रकारांना मत देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लोकांना आता बदल हवा
खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकत्रित आगामी निवडणूक लढल्यास लोकसभेला 40 तर विधानसभेला 200 जागा मिळतील, असे मत व्यक्त केले होते. याबाबत शरद पवार म्हणाले, संजय राऊत हे पत्रकार असून त्यांनी अभ्यास केला असेल. मात्र, याबाबत मला अधिक माहिती नाही. लोकांना आता बदल पाहिजे, असे राज्यातील दौऱ्यात मला दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आहे. जे त्यात सहभागी नाही त्याबाबत मी बोलणार नाही, असा टोला यावेळी शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला.
आघाडीत काँग्रेस असणे महत्त्वाचे
शरद पवार म्हणाले, खासदार राहुल गांधी हे देशातील एक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहे. देशातील लोकशाही संदर्भात चिंता करण्याबाबत त्यांनी परदेशात मत व्यक्त केले तर त्याबाबत आक्षेपार्ह काही नाही. महाविकास आघाडी मधील पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून त्यात काँग्रेस असणे महत्वाचे आहे. देशातील गावागावात काँग्रेस विचार आणि कार्यकर्ता आहे. त्यांचे यश-अपयश सोडून द्यावे. पण, त्यांचे महत्व कमी नाही.
भाजपमध्ये गेलेल्यांची चौकशी नाही
अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यात केलेले भरीव काम पाहण्यास देशभरातून लोक येत आहेत. परंतु हे काम करणाऱ्यांना केंद्र सरकारने अटक केली. काही लोक भाजपमध्ये गेले की त्यांची चौकशी होत नाही. राज्यात असे अनेक उदाहरणं आहेत. ठाणे, अकोलामध्ये यापूर्वी कोणाची चौकशी झाली, कोणाला अटक होणार होती, हे सरकारने सांगावे. महविकास आघाडी काळातील कामांबाबत आक्षेप असेल तर त्या कामांचीही चौकशी करा, असे शरद पवार म्हणाले.