रविवार विशेष : आत्मपरीक्षणाची गरज!ऋषिकेश बामणे

Advertisement

‘‘खांबाला साक्ष मानून पुढील वर्षांपर्यंत राष्ट्रीय विजेतेपद जिंकण्याची आपल्यातील धग कायम ठेवू आणि गेल्या दोन वर्षांतील पराभवाचा वचपा काढू!’’ महाराष्ट्राच्या पुरुष खो-खो संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू प्रतीक वाईकरने रेल्वेविरुद्धच्या अंतिम सामना गमावल्यानंतर सहकाऱ्यांना उद्देशून हे भाष्य केले.

जबलपूर (मध्य प्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या ५४व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने विजयी झेंडा फडकावला. परंतु पुरुष गटात सलग दुसऱ्यांदा जेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंची खालावलेली देहबोली दुर्लक्ष न करता येण्यासारखी होती. त्यामुळे महाराष्ट्राविरुद्ध वाढणारी स्पर्धा, अवकाळी पावसामुळे कोलमडलेले स्पर्धेचे नियोजन, मॅटवरील सामन्यांमुळे खेळाडूंना होणाऱ्या दुखापती आणि खेळाला प्रेक्षकांचा लाभणारा प्रतिसाद यामुळे खो-खोच्या वास्तववादी आत्मपरीक्षणाची गरज निर्माण झाली आहे. छत्तीसगड येथे २०१९ मध्ये झालेल्या यापूर्वीच्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात भारतीय विमानतळ प्राधिकरणाने, तर पुरुषांमध्ये रेल्वेने महाराष्ट्राच्याच संघांना नमूवन त्यांची मक्तेदारी संपुष्टात आणली होती. २०२० मध्ये करोनामुळे चाहत्यांना राष्ट्रीय स्पर्धेचा आनंद लुटता आला नाही. यंदा मात्र अपेक्षेप्रमाणे दोन्ही गटांत या बलाढय़ संघांमध्येच अंतिम सामना रंगला.

Advertisement

महेश पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या महिलांनी प्राधिकरणावर सरशी साधून २०१९ मध्ये झालेल्या अखेरच्या राष्ट्रीय स्पर्धेतील पराभवाची परतफेड केली. स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वीच पालांडे यांनी संघ वेगळय़ा रणनीतीसह खेळेल, असे म्हटले होते. त्यांच्या डाव्या आक्रमणाची चाल यशस्वी ठरली आणि महिलांनी २३व्यांदा अजिंक्यपद मिळवले. प्रियंका इंगळे, रेश्मा राठोड, रुपाली बडे, पूजा फरगडे, स्नेहल जाधव आणि अपेक्षा सुतार या सहा जणींनी प्रामुख्याने छाप पाडली. प्रतिस्पर्धी प्राधिकरण संघात सात खेळाडू महाराष्ट्रातीलच होते. त्यापैकी काही जण पालांडे यांच्याच शिष्य. याशिवाय दर तीन वर्षांनी प्रशिक्षक बदलण्याची परंपरा असल्याने अनुक्रमे २०१८, २०२१ मध्ये महाराष्ट्राला यशस्वी मार्गदर्शन करणाऱ्या पालांडे यांच्या भवितव्याबाबत राज्य खो-खो संघटना कोणता निर्णय घेते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून आहे.

पुरुषांच्या गटात रेल्वेच्या खेळाडूंची गती, तंत्र आणि दुहेरी भूमिका बजावण्याचे कौशल्य यापुढे महाराष्ट्र कमी पडला. उपांत्यपूर्व फेरीत प्रतीकच्या हाताला आणि उपांत्य लढतीत प्रमुख आक्रमक मिलिंद कुरपेच्या गुडघ्याला झालेली दुखापत महाराष्ट्राच्या पुरुष संघाला महागात पडली. प्रतीक हाताला पट्टी बांधून अंतिम सामन्यात खेळला, तर गजानन शेंगाळ आणि अक्षय भांगरे यांनाही अनुक्रमे गुडघ्याला आलेली सूज आणि खांद्याच्या दुखापतीसह खेळावे लागले. मूळात प्रतीक, मिलिंद हे दोन्ही खेळाडू पावसामुळे पाय घसरून नव्हे, तर मॅटवर हात आणि पाय अडकल्याने जखमी झाले. त्यामुळे एकीकडे महासंघ मॅटवर विश्वचषक आणि अल्टिमेट लीग यांसारख्या स्पर्धाचे आयोजन करण्याच्या विचारात असताना खेळाडूंच्या दुखापतीचा मुद्दाही ऐरणीवर असेल.

Advertisement

वेळेअभावी रद्द करण्यात आलेली उपउपांत्यपूर्व फेरी हा स्पर्धेतील वादग्रस्त मुद्दा ठरला. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे मातीच्या मैदानांची दैना झाली. मॅटवरही पावसाची तिरपी झर आल्याने खांबाजवळ अनेक खेळाडू पाय घसरून पडले, तर काहींना दुखापतीही झाल्या. त्यामुळे आठ साखळी सामने बुधवारवर ढकलण्यात आले. बुधवारीही पावसाची संततधार कायम राहिल्याने फक्त बंदिस्त भागात असलेल्या मॅटवर आठ साखळी, १६ उपउपांत्यपूर्व आणि आठ उपांत्यपूर्व असे एकूण ३२ सामने १६ तासांच्या कालावधीत खेळवणे अशक्यच होते. त्याशिवाय करोना साथीच्या पार्श्वभूमीवर रात्री १० नंतर जबलपूरमध्ये संचारबंदी लागू होती. अशा स्थितीत आयोजकांनी उपउपांत्यपूर्व फेरी पूर्णपणे रद्द करून थेट आठ गटविजेत्यांमध्ये उपांत्यपूर्व फेरी खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे गटात दुसरे स्थान मिळवणाऱ्या संघांना नाइलाजास्तव स्पर्धेबाहेर जावे लागले. काहींनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यामुळे भविष्यात वाद उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र अथवा रेल्वेसारख्या नामांकित संघांवर अशी वेळ ओढावल्यास, संघटना अथवा महासंघ कोणता निर्णय घेणार, हे पाहणे रंजक ठरेल.

येत्या काही वर्षांत लीग, एशियाड आणि विश्वचषकाचे स्वप्न पाहणाऱ्या खो-खोच्या लोकप्रियतेसाठी प्रेक्षक मोलाची भूमिका बजावतील.  या स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणासाठीही क्रीडावाहिन्या किंवा अ‍ॅपच्या माध्यमांतून प्रयत्न व्हायला हवे होते. खो-खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी महासंघाने या सर्व मुद्दय़ांचा गांभीर्याने विचार करायला हवा.

Advertisement

[email protected]

The post रविवार विशेष : आत्मपरीक्षणाची गरज! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement