अहमदनगर9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
राज्यातील 7 छावणी विभागासह देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अहमदनगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड छावणी परिषदेच्या निवडणुकीला केंद्रीय मंत्रालयाने स्थगिती दिल्याची माहिती भाजपचे अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी शुक्रवारी (17 मार्च) ला दिली.
दरम्यान, 21 मार्च सोमवारपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती.
अहमदनगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली होती. 21 मार्चपासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. या निवडणुकीसाठी 30 एप्रिलला मतदान घेण्यात येणार होते. मात्र केंद्रीय मंत्रालयाने देशातील 60 व महाराष्ट्रातील 7 कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे.
निवडणुका लांबणीवर
अहमदनगर शहरातील भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची 7 जागांसाठी निवडणूक होणार होती. भिंगार छावणी परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून 7 उमेदवार देण्यात येणार होते. त्यासाठी भिंगार मध्ये पक्षाच्या बैठका देखील घेण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली युती करून ही भिंगार परिषदेची निवडणूक लढवली जाणार होती. या भिंगार परिषदेच्या सर्व जागेवर भाजप विजयी होणार होती, असे भिंगार छावणी परिषदेचे भाजपचे प्रभारी व शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, देवळाली, भिंगार, संभाजीनगर व कामठी या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका होणार होत्या. स्थगिती दिल्यामुळे या निवडणुका आता लांबणीवर पडलेल्या आहेत.