रंगभूमीचा मौलिक परिभाषा संग्रहअविनाश सप्रे

Advertisement

मराठीमध्ये रंगभूमी आणि नाटकांची चर्चा करताना, बोलताना आणि लिहिताना अनेक संज्ञा आणि संकल्पनांचा वापर केला जातो. या संज्ञा आणि संकल्पना काही प्रमाणात भारतीय नाटय़शास्त्रातून आणि मोठय़ा प्रमाणात पाश्चात्त्य नाटय़शास्त्रातून घेतलेल्या असतात. पण त्यांचा वापर खूप वेळा काटेकोरपणे, नेमकेपणाने आणि त्यांचा मूळार्थ समजून न घेता ढिसाळपणे केला जातो. परिणामी अशी समीक्षा गोंधळच निर्माण करते. सांप्रतच्या काळात तर याचा प्रत्यय वारंवार येताना दिसतो. त्याचबरोबर ज्यांना गांभीर्यपूरक नाटय़समीक्षा करायची आहे त्यांना संज्ञा आणि संकल्पना यांचा परिभाषासंग्रह ग्रंथरूपात आणि एकत्रितपणे संदर्भासाठी मराठीमध्ये उपलब्ध नसणे ही मोठीच उणीव आहे हेही लक्षात येते. सुदैवाने ही उणीव आता डॉ. विलास खोले यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’ या बृहद्ग्रंथा च्या रूपाने भरून निघते आहे. ८२६ पृष्ठसंख्या असलेला हा या प्रकारचा मराठीतला पहिला ग्रंथ असून डॉ. खोले यांनी तो एकहाती लिहिला आहे. हा संदर्भग्रंथ  डॉ. खोले यांनी कठोर परिश्रम आणि सखोल अभ्यास करून सिद्ध केला आहे. भारतीय नाटय़शास्त्राच्या संदर्भात संस्कृतमधली मूळ अवतरणे आणि पाश्चात्त्य नाटय़शास्त्रातील परिभाषेच्या संदर्भात इंग्रजी भाषेतील मूळ व्याख्या व स्वरूपसूचक मजकूर दिला आहे. हा ग्रंथ भारतीय नाटय़शास्त्र, पाश्चात्त्य नाटय़शास्त्र आणि मराठी नाटय़रूपे अशा तीन विभागांत विभागलेला असून, एकूण २४४ नोंदींचा समावेश या ग्रंथात आहे. भारतीय रंगभूमीच्या संदर्भात भरतमुनींचे नाटय़शास्त्र आणि पाश्चात्त्य रंगभूमीच्या संदर्भात अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (पोएटिक्स) हे मुळारंभ मानले जातात. या दोन्ही ग्रंथांत नाटकासंबंधी ज्या संकल्पना आल्या आहेत त्या डॉ. खोले यांनी या ग्रंथात विचारात घेतल्या असून, त्यांच्या व्याख्या, स्पष्टीकरण आणि विवेचन केले आहे. भारतीय नाटय़शास्त्रामध्ये नाटय़लक्षण, नाटकाचे प्रयोजन, नाटय़प्रयोग, नाटय़गृह, अभिनय, कथानक, भाषा, नाटय़संवाद, सिद्धांत, नाटकातील पात्रे, नाटय़रचना इ. मुद्दय़ांचा विचार करण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने इतर अनेक उपमुद्देही आले आहेत. त्यासंबंधी डॉ. खोलेंनी सहज समजेल असे विवेचन केले आहे. उदा. अभिनयाचे चार प्रकार- १) आंगिक- शारीर प्रतिक्रियांच्या अनुषंगाने वेगवेगळ्या हालचाली, २) वाचिक- नाटकातील पाठय़ म्हणण्याची पद्धती, शब्दांचे शुद्ध उच्चारण, स्वरांचे यथोचित नियमन, ३) सात्त्विक- मानस शारीर रूपातून व्यक्त होणे, ४) आहार्याभिनय – म्हणजे नेपथ्यकर्म. यात रंगभूषा, वेशभूषा, अलंकार, इ.चा समावेश. नाटय़गृह- तीन प्रकार- १) विकृष्ट- आयताकार, २) चतुरस्र- चौकोनी आकार, ३) व्यस्त्र- त्रिकोनी आकार (डॉ. खोले यांनी या तिन्ही नाटय़गृहांच्या आकृत्या दिल्या आहेत). नाटय़रस- शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत. प्रेक्षकगुणविशेष- १) नाटकाचा नेमका हेतू जाणण्याची कुवत, २) विषयाशी एकरूप होणे, ३) नाटकाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने न पाहता स्वच्छ दृष्टीने पाहणे, ४) संगीत योजना आणि वाद्ये यांच्या उपयोगाची चांगली माहिती असलेला, ५) सुसंस्कृत आणि सभ्य लोकांचे वर्तनप्रकार माहीत असलेला. रसांचा स्थायीभाव संबंध- १) विभाव- ज्याच्यामुळे स्थायीभाव उद्धृत होतो, २) अनुभाव- म्हणजे उद्धोथनानंतर प्रकट होणारे शारीरिक विकार, ३) व्यभिचारीभाव म्हणजे मानसिक विकार. भरताने नाटय़शास्त्राचा इतका सूक्ष्म व सविस्तर विचार केला आहे की त्यामुळे डॉ. खोले ‘भरताचे नाटय़शास्त्र हा जगातला अद्वितीय ग्रंथ आहे. नाटकाच्या उत्पत्तीपासून तपशीलवार चिकित्सा जगातल्या कुठल्या एका ग्रंथात झालेली आढळत नाही,’ असा अभिप्राय देतात. भारतीय नाटकात शोकांतिकेचा अभाव असून, त्याची पाळेमुळे आपल्या जीवनविषयक आणि कलाविषयक तत्त्वज्ञानात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

भरताच्या नाटय़शास्त्राला अनुसरून अर्वाचीन काळातल्या आधुनिक रंगभूमीची वाटचाल झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याऐवजी अ‍ॅरिस्टॉटलपासून सुरू झालेल्या आणि पुढे अनेक अंगांनी सातत्याने विकसित होत राहिलेल्या पाश्चात्त्य नाटय़शास्त्राचा प्रभाव भारतीय रंगभूमीवर होत राहिला. त्यामुळे या ग्रंथात त्यासंबंधीच्या नोंदी अधिक प्रमाणात देण्यात आल्या आहेत. अ‍ॅरिस्टॉटलचा शोकांतिका आणि सुखांतिका सिद्धांत, अनुकृतीचा सिद्धांत आणि विरेचनाचा सिद्धांत जगप्रसिद्ध आहेत. डॉ. खोलेंनी यासंबंधी संविधानक (प्लॉट), व्यक्तिरेखा, भाषा, कृती, काळ आणि अवकाश या घटकांसंबंधी त्याचबरोबर १) प्रॉसेनियम (कमानी), २) एरिना (मंडलाकार), ३) खुला रंगमंच, ४)  काळी पेटी (ब्लॅक बॉक्स) आणि ५) पर्यावरणीय रंगमंच- या पाच प्रकारच्या रंगमंचासंबंधी विवेचन केले आहे. नाटक आणि नाटकाचे घटक, नट आणि अभिनयाचे प्रकार आणि शैली, संवाद, मुखवटा, मुद्राभिनय, हावभाव, रंगभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्याचे प्रकार, नाटककार, संहिता, दिग्दर्शक, रंगमंच, समीक्षक, नाटककाराचा दृष्टिकोन, चिन्हविज्ञान इ.संबंधी मान्यवर नाटय़-अभ्यासकांची मते दिली आहेत. पाश्चात्त्य नाटकातील नायक ते न-नायक हा प्रवासही सांगितला आहे. पर्यावरणीय रंगभूमी, क्रौर्यनाटय़, प्रायोगिक रंगभूमी, अवंतगार्द (बंडखोर) रंगभूमी, एपिक थिएटर, महाकाव्यात्मक रंगभूमी, अ‍ॅब्सर्ड रंगभूमी आणि असंगत नाटक, काबुकी, सडक रंगमंच (स्ट्रीट प्ले), क्लॉझेट ड्रामा, सुरचित नाटक, कौटुंबिक नाटक अशा विविध प्रकारच्या रंगभूमी आणि त्यावर सादर होणाऱ्या नाटकांची वैशिष्टय़े डॉ. खोलेंनी विशद केली आहेत. या प्रकारच्या रंगभूमीचे उद्गाते, स्वरूप, विचार, नाटय़-अभ्यासकांची मतमतांतरे आणि उद्दिष्टे यांचे विवेचन केले आहे. शोकांतिका, सुखांतिका, मेलोड्रामा, प्रहसन, फार्स आणि उपहासिका या नाटय़प्रकारांच्या स्वरूपवैशिष्टय़ांची चर्चा केली आहे. शेक्सपिअरचे मराठी नाटककारांना (खाडिलकर, गडकरी, शिरवाडकर) झालेले आकलन समग्र व वास्तव नव्हते, असा स्पष्ट अभिप्रायही डॉ. खोले यांनी नोंदवला आहे. अ‍ॅरिस्टॉटलच्या रंगभूमीच्या सिद्धांताला छेद देणारी रंगभूमीची नवी संकल्पना थिएटर ऑफ अ‍ॅब्सर्डच्या रूपात ब्रेख्तने मांडली. प्रायोगिक रंगभूमीवर नाटकांचे नवनवीन प्रयोग होत राहिले. नव्या अवंतगार्द रंगभूमीने मूर्तिभंजक, धक्का देणारी भूमिका घेतली. सडक रंगमंच रस्त्यावर उतरले आणि जग हेच रंगमंचाने भरलेले आहे, ते काही केवळ नाटय़गृहात नाही, असा उद्घोष केला. ‘क्लॉझेट ड्रामा’ने संहिता वाचण्याचे प्रयोग केले. या साऱ्यामुळे पाश्चात्त्य रंगभूमी सदैव चैतन्यशील आणि अद्ययावत राहिली आणि त्यातून नव्या संकल्पना, नवी तंत्रे यांचा प्रातिभ व बौद्धिक शोध घेतला गेला. डॉ. विलास खोलेंच्या या संदर्भातील नोंदी रंगभूमीचे जिवंतपण आणि प्रवाहीपण दाखवून देणाऱ्या आणि उद्बोधक आहेत.

Advertisement

ग्रंथाचा तिसरा भाग ‘मराठी नाटय़रूपे’ हा असून त्यामध्ये पोवाडा, लावणी, फटका, लोकनाटय़/ तमाशा या लोकरंगभूमीशी संबंधित प्रकार आणि बुकीश नाटक, संगीत नाटक, नाटय़छटा, एकांकिका, बालरंगभूमी, दूरदर्शन मालिका या नागर रंगभूमीशी आणि रेडिओ/ दूरदर्शनशी संबंधित कलाप्रकारांचा समावेश आहे. नट, नाटककार, दिग्दर्शक, प्रेक्षक आणि नाटय़-अभ्यासक या सर्वानाच अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. मराठीतल्या कोश-वाङ्मयाच्या समृद्ध परंपरेमध्ये डॉ. विलास खोले यांनी ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’च्या रूपाने मौलिक भर घातली आहे.                                                                

* ‘नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह’, डॉ. विलास खोले, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पाने- ८२६ , किंमत- २६३ रुपये

Advertisement

The post रंगभूमीचा मौलिक परिभाषा संग्रह appeared first on Loksatta.Source link

Advertisement