अमरावती3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या पूर्वायुष्यातील शैक्षणिक उणीवांवर बोट ठेऊन ते प्राचार्य आणि त्यापुढच्या बढतींसाठी अपात्र होते, अशी पुराव्यासह माहिती नागपुर युनिव्हर्सिटी टिचर्स असोसीएशनचे (नुटा) उपाध्यक्ष प्रा. डॉ. विवेक देशमुख यांनी आज, सोमवारी माध्यम प्रतिनिधींसमोर मांडली.
त्यामुळे डॉ. येवले यांनी एकप्रकारे शासनाची फसवणूक करुन अलिकडच्या काळातील लाभ मिळवले, असा ‘नुटा’चा निष्कर्ष आहे. या निष्कर्षाला अनुसरुन त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून येत्या काळात विद्यार्थी, शिक्षकांचे आंदोलन उभे करण्यासोबतच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठात याचिकाही दाखल केली जाणार आहे. ‘नुटा’ने याबाबत गेल्या महिन्यातही एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सिनेट बैठकीच्या आयोजनाबाबत कुलगुरुंनी राज्यपाल व न्यायालयात कशी चुकीची माहिती पुरविली, हे स्पष्ट केले होते. शिवाय या प्रमादाबद्दल ‘नुटा’ त्यांना न्यायालयात खेचेल, हेही स्पष्ट केले होते. आजच्या वार्तालापादरम्यान डॉ. देशमुख यांनी पुन्हा त्या मुद्द्याला उजाळा देत उन्हाळी सुट्या संपल्यानंतर ५ जूनपासून न्यायालय सुरु होत आहे, त्यावेळी पहिली याचिका आमची असेल, याचा पुनरुच्चार केला.
काय आहेत वादाचे मुद्दे ?
- डॉ. प्रमोद येवले हे १ सप्टेंबर १९९३ साली अधिव्याख्याता म्हणून नियुक्त झाले. पुढे ते ३० जून १९९६ पर्यंत त्या पदावर होते. दरम्यान २५ जून १९९६ च्या नियुक्ती आदेशान्वये सहायक प्राध्यापक पदावर नेमले गेले. येथे ते २ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होते. अशाप्रकारे या पदावर ते ३ वर्ष ४ महिने होते. मात्र असे असतानाही दहा वर्षाचा सहायक प्राध्यापकाचा अनुभव आवश्यक असणाऱ्या प्राचार्य पदावर त्यांची नेमणूक केली गेली. अर्थात ही नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोग व एआयसीटीईच्या निकषानुसार नाही.
- सहायक प्राध्यापक म्हणून निवड करताना ज्या समितीने त्यांची निवड केली, त्या समितीत शासकीय प्रतिनिधी नव्हता. शिवाय ही निवड होत असताना सदर संस्थेकडे विद्यापीठ व मागासवर्ग कक्षाने लागू केलेली बिंदू नामावलीही उपलब्ध नव्हती. त्यांची निवड फक्त १९९३-९४ करिताच असताना डॉ. येवले यांनी विद्यापीठाकडून मात्र १९९३-९४ व पुढे अशी मिळवून घेतली. अर्थात येथेही खोटेपणाचा आधार घेतला गेला. ही बाब तत्कालीन शिक्षण सहसंचालक यांनी केलेल्या तपासणीत आढळून आली आहे.
- अशाप्रकारे सहायक प्राध्यापक, त्याआधारे प्राचार्य आणि पुढे नागपुर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु आणि आता त्यासोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु अशी पदे मिळविणारे डॉ. प्रमोद येवले यांची शैक्षणिक कारकीर्द उणीवांनी भरलेली आहे.