भाजपचं मिशन १५०
कर्नाटकमध्ये पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं मिशन १५० निश्चित केलं आहे. कर्नाटक विधानसभेचं संख्याबळ २२४ इतकं आहे. त्यामध्ये १५० जागांवर विजय मिळवण्याचा निश्चय भाजपनं केला आहे. कर्नाटकमध्ये १९८९ मध्ये कोणताही पक्ष दुसऱ्यांदा सत्तेत आलेला नाही. त्यामुळं कर्नाटक काँग्रेसकडे जाणार का अशा देखील चर्चा आहेत. दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी त्यांच्या पक्षाशिवाय कोणत्याही पक्षाला सरकार बनवता येणार नाही, असं म्हटलं आहे. त्यामुळं भाजपचं मिशन १५० यशस्वी होणार का हे १३ मे रोजी निश्चित होईल.
येडियुरप्पा काय म्हणाले?
पत्रकारांनी येडियुरप्पा यांना या निवडणुकीसाठी भाजप सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देईल का असा प्रश्न विचारला. यावर येडियुरप्पा यांनी काही जणांना सोडून इतरांना उमेदवारी मिळेल असं म्हटलं. त्यामुळं कर्नाटकमधील विद्यमान भाजप आमदारांचा पत्ता कट होणार हे निश्चित झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार समर्थकांकडून आंदोलन होण्याची शक्यता असल्यानं भाजप कार्यालयाला कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाकडून संरक्षण देण्यात आलं आहे. भाजपनं गुजरात विधानसभा निवडणुकीत बऱ्याच विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली नव्हती त्याची धास्ती कर्नाटकमधील भाजप आमदारांना आहे.
उमेदवारी जाहीर करण्यात काँग्रेसची आघाडी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्याबाबत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. काँग्रेसनं निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ११० उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर, दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसकडून ४२ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. दुसरीकडे जेडीएसनं ९३ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.