नागपूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
मोदक म्हटले की उकडीचे आणि तळलेले आठवतात. विदर्भात खासकरून तळलेले मोदक केले जातात. पण, आता गणेशाला मोहापासून तयार केलेले मोदक तयार करण्यात आले आहेl. मोहापासून फक्त दारूच तयार होते असा सार्वत्रिक समज आहे. पण, मोहात पडावे असे हे मोदक गडचिरोलील आदीवासी लक्ष्मी महिला बचत गटाने खास गणेशोत्सवासाठी मोहाच्या फुलापासून मोदक तयार केले आहेत. उद्या मंगळवार 19 रोजी गणेश चतुर्थीपासून ते विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती वैभव मडावी यांनी दिली. या बचत गटाने यापूर्वीपासून मोहाच्या फुलांपासून पेढे आणि लाडू तयार केलेत. लोकांकडून मोदकासाठी खूप विचारणा झाल्याने मोदक तयार केल्याचे मडावी यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. याच भागात मोहाची झाडेही अधिक आढळत असल्याने आदिवासी समाजाच्या उपजीविकांच्या साधनांमध्ये मोहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोहाच्या झाडाची फांदी, पाने, फळे, फुले, साली आणि लाकूड या साऱ्यांचाच उपयोग केला जातो. मोहाची फळे आणि फुले विकून दोन वेळेचे अन्न मिळविण्यासाठी पुरेसे पैसे मिळतात. सध्या गडचिरोली जिल्ह्यात आदिवासीबहुल भागात प्रत्येक कुटुंब साधारण 80 ते 100 किलो मोहफुले गोळा करतात.
मोहाची फुले एप्रिलमध्ये ऊन न लागण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिरव्या नेटमध्ये गोळा केली जातात. ही फुले आधी वाळवली जातात. वाळवलेली मोहाची फुले ग्राइण्डरमधून काढून त्याचे पावडर केले जाते. यामध्ये नाचणी पावडर मिसळण्यात येते. काळा गुळ, ड्रायफूट टाकून पेढे व लाडू तयार केले जातात. मोदक गणपतीसाठी लाँच केले आहे, असे मडावी यांनी सांगितले.
हा बचत गट वंदना गावडे यांचा आहे. या उत्पादनाचे मार्केटींग वैभव मडावी करतात. सुपर मार्केटमध्ये लाडू व पेढा उपलब्ध आहे. लाडू 3 महिने व पेढा महिनाभर चालतो. मोदक 20 दिवस चांगला राहातो. 300 ग्रॅम लाडू 200 रूपयांना, पेढा 200 ग्रॅम 200 रूपयांना, मोदक 250 ग्रॅम 200 रूपयांना आहे. बाहेरगावच्या ग्राहकांना www.mavelii.com या वेबसाईटवर ऑर्डर करता येईल.