नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
शेतीच्या वादात मोठ्या भावाने सावत्र आईला मदत केल्याने लहान भावाने सख्ख्या भावाचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे खुन केल्यानंतर दुचाकीसह कॅनल मध्ये फेकून देत अपघाताचा बनाव केला केला होता. म्हसरुळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर साहेबराव कराड (वय ४०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दिपक साहेबराव कराड वय ३५ असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि वंदना ज्ञानेश्वर कराड (रा. मखमलाबाद नाका) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मखमलाबाद गावात राहणारे साहेबराव कराड यांना दोन पत्नी आहेत. दुसऱ्या पत्नीचे ज्ञानेश्वर आणि दिपक दोन मुले आहेत तर पहिल्या पत्नीला मुलगी आहे. मखमलाबाद गावात १०२ गुंठे जमीन आहे. पहिल्या पत्नीच्या नावे ही जमीन खरेदी आहे. ६ गुंठे जमीन विक्री करुन दिपक कराड यास फ्लॅट घेऊन दिला.
४० गुंठे जमीन दुसऱ्या पत्नीच्या नावे असून ५२ गुंठे जमीन पहिल्या पत्नीच्या नावे ठेवली. दिपक याने सावत्र आईच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत ५२ गुंठे जमीन नावे करुन घेतली होती. हा वाद न्यायालयात दावा दाखल होता. मयत ज्ञानेश्वर याने सावत्र आईला मदत केल्याने मोक्याची जमीन हातातून गेल्याने संशयित दिपकच्या डोक्यात राग होता.
संशयित दिपक याने मोठा भाऊ ज्ञानेश्वरच्या डोक्यात वार करुन त्याचा खुन केला. मृतदेह दुचाकीसह कॅनलमध्ये फेकून दिला होता. पोलिसांनी अक्समात मृत्यूची नोंद केली होती. नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी सर्व तपास केल्यानंतर लहान भावाने मोठ्या भावाचा खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. वरिष्ठ निरिक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
कॅनलमध्ये आढळला होता मृतदेह
मखमलाबाद शिवारातील गंगापुर कॅनलमध्ये दुचाकी आणि एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना प्रथमदर्शनी हा अपघात वाटत होता. मात्र मयताच्या डोक्यावरील जखम बघता हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगीतले होते. नातेवाईकांनी देखील हा घातपात असल्याचा संशय व्यक्त होता.