मोठी बातमी : राहुल द्रविड भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता, पण…भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडवर भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे. भारतामध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल द्रविडने तात्पुरत्या स्वरुपात भारतीय संघाचं प्रशिक्षक पद संभाळावं यासाठी बीसीसीआय प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक प्रशिक्षक टी २० विश्वचषकानंतर आपली पदं सोडणार आहेत. त्यामुळेच राहुल द्रविड सारख्या विश्वासू व्यक्तीवर संघाची जबाबदारी सोपवण्यासाठी बीसीसीआयने पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.

Advertisement

ऑस्ट्रेलियातील काही प्रशिक्षकांनी भारतीय प्रशिक्षक होण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली आहे. मात्र बीसीसीआयकडून भारतीय प्रशिक्षकाला प्राधान्य क्रम दिला जाणार आहे. भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात सकारात्मक काही घडलं नाही तर परदेशी प्रशिक्षकांचा विचार केला जाणार आहे. द्रविडने पूर्णवेळ प्रशिक्षक व्हावं अशी बीसीसीआयची इच्छा आहे. यासाठी बीसीसीआयने द्रविडला प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आलीय. मात्र द्रविडने ही विनंती नाकारलीय. आपल्याला एवढा प्रवास करण्याची इच्छा नसल्याचं द्रविडने स्पष्ट केलं आहे.
“आम्हाला असा उमेदवार हवा आहे की जो या कामासाठी अगदी योग्य असेल. आम्हाला अशी परिस्थिती नकोय की अनेक अर्ज आलेत पण कोणीही योग्य नाही असं व्हायला नको. अनेक उमेदवार असले आणि असं झाल्यास ते आमच्यासाठी लज्जास्पद ठरेल. त्यामुळे योग्य उमेदवार शोधण्यास आमचं प्राधान्य राहील. तोपर्यंत द्रविडलाच आम्ही तात्पुरता प्रशिक्षक म्हणून पाहत आहोत,” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात करण्यात आलेली विनंती द्रविडने नाकारलीय. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असणारे रवी शास्त्री यांनी टी २० विश्वचषक स्पर्धा ही आपली प्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा असेल असं जाहीर केल्यानंतर बीसीसीआयकडून द्रविडला या पदासाठी विचारणा करण्यात आलेली. १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.

Advertisement

शास्त्री यांच्यासोबतच भारतीय संघाच्या सपोर्टींग स्टाफमधील अनेकजण आपलं पद सोडणार आहे. यामध्ये गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण शिकवणारे आर. श्रीधर यांचाही समावेश आहे. तसेच प्रशिक्षकांपैकी एक असणाऱ्या निक वेब यांनीही टी २० विश्वचषकानंतर पद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता पर्याय म्हणून आता पासूनच नवीन प्रशिक्षकांचा शोध बीसीसीआयने सुरु केलाय. त्याचाच भाग म्हणून बीसीसीआयकडून राहुल द्रविडला या पदासाठी अर्ज करण्याची विनंती करण्यात आलेली. मात्र द्रविडने ही विनंती फेटाळून लावली आहे.

४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केलंय. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहण्याचा प्राधान्य दिलं आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती. आपण जे काम करतोय त्यामध्ये आपल्याला अधिक रस असल्याचं सांगत द्रविडने मुख्य संघाला प्रशिक्षण देण्याऐवजीन तरुण खेळाडूंना तयार करण्यासाठी क्रिकेट अकदामीमध्येच काम करण्याला प्राधान्य दिलं होतं. आजही द्रविडची तीच भूमिका कायम आहे. त्यामुळे आता बीसीसीआय द्रविडला यासाठी कसं राजी करते हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल.

Advertisement

मागील अनेक वर्षांपासून द्रविडच्या नेतृत्वाखाली तरुण खेळाडू तयार होत आहे. भारतीय संघाला सातत्याने नवीन नवीन खेळाडू उपलब्ध करुन देण्यासाठी कमी वयातील क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचं काम द्रविड करत आहे.

The post मोठी बातमी : राहुल द्रविड भारताच्या मुख्य संघाचा प्रशिक्षक होण्याची शक्यता, पण… appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here