नागपूर33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लक्ष्मीनगर झोनमधील ७२ वर्षीय रुग्णाचा झालेला मृत्यू हा इन्फ्लुएंझा एच३एन२ ने झालेला नाही, असा अहवाल इन्फ्लुएंझा एच३एन२ मृत्यू अन्वेषण समितीने सादर केला आहे. मृत्यू विश्लेषण समितीची बैठक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हाशल्य चिकित्सक मेयो रुग्णालय डॉ. दीपक सेलोकर, सूक्ष्मजीव शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. रविन्द्र खडसे, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण सलामे, नोडल वैद्यकीय अधिकारी साथरोग विभाग डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. शबनम खान आदी उपस्थित होते.
२ मार्च २०२३ रोजी ७२ वर्षीय श्वास घेण्यास त्रास, ताप व खोकला होत असल्यामुळे या रुग्णावर दुपारी ४ वाजता रामदासपेठ येथील खाजगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले. या उपचाराने रुग्णाची प्रकृती सामान्य झाल्यामुळे त्यांना सामान्य कक्षात हलविण्यात आले. मात्र ६ मार्च २०२३ रोजी रुग्णाला श्वास घेण्यास परत त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा अतिदक्षता कक्षात हलविण्यात आले. यासोबतच त्यांचा प्रयोगशाळा नमुना घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. यामध्ये अनेक जिवाणु व विषाणुचा संसर्ग फुफ्फुसात झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये काही जिवाणु हे प्रतिजैविकास प्रतिसाद न देणारे होते. या सर्वांचा परिणाम वाढत जाऊन ९ मार्च २०२३ रोजी रुग्णाचा मृत्यू झाला.
रूग्णाचा एक्सरे रिपोर्ट, सहव्याधी व अनेक प्रकारचे संसर्ग लक्षात घेता या रुग्णाचा मृत्यू हा एच३एन२ या संसर्गामुळे झाल्याचे दिसून नाही, असा अभिप्राय मृत्यू विश्लेषण समितीने एकमताने दिला.
मृत्यू विश्लेषण समितीने एच३एन२ नियंत्रण व उपाययोजना करीता मार्गदर्शन दिले आहे. यामध्ये सर्व खासगी तसेच शासकीय रुग्णालयामधे भरती होणाऱ्या संशयीत रुग्णाचे एच१एन१ सोबत एच३एन२ तपासणी करणे, खासगी तसेच शासकीय प्रयोगशाळामध्ये एच१एन१ व एच३एन२ ची तपासणी सोय उपलब्ध करणे, शासकीय व खासगी रूग्णालयात संशयीत रुग्णाकरिता विलगीकरण कक्ष तयार ठेवणे, सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांनी एच१एन१ व एच३एन२ रुग्णांची माहिती आरोग्य विभागास नियमितपणे देण्याचे निर्देश दिले.
अशी घ्या काळजी
- हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
- गर्दीमध्ये जाणे टाळा
- रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा
- खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा
- भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी
- पौष्टीक आहार घ्या
हे टाळा
- हस्तांदोलन अथवा आलिंगन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे