रॉयल चॅलेंजरने दिल्ली कॅपिटल्सचा १६ धावांनी पराभव करत गुणतालिकेत मोठी उडी मारली. बेंगलोरने ८ गुण मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली. बेंगलोरकडून हेजलवूडने ३ तर मोहम्मद सिराजने २ विकेट घेतल्या. बॅटिंगमध्ये दिनेश कार्तिकने ६६ धावांची तर ग्लेन मॅक्सवेलने ५५ धावांची खेळी केली. इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २७व्या सामन्यात शनिवारी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने-सामने होते. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात बेंगलोर संघाने १६ धावांनी विजय मिळवला. यासह बेंगलोर संघाने हंगामातील चौथा विजय खिशात घातला. बेंगलोरच्या या विजयाचे शिल्पकार ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक ठरले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि बेंगलोर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी बेंगलोरने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १८९ धावा कुटल्या होत्या. बेंगलोरच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ निर्धारित २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७३ धावाच करू शकला. संघाला त्यावेळी गरज असताना तो धावून आला तो म्हणजे डीके दिनेश कार्तिक त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दिल्लीकडून फलंदाजी करताना विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३८ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि ५ षटकार झळकावत ६६ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रिषभ पंतने ३४ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने १७ धावांचे योगदान दिले. तसेच, मागच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा पृथ्वी शॉ या सामन्यात केवळ १६ धावाच करू शकला. त्याच्यासोबत मिचेल मार्शनेही १४ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. रोवमन पॉवेल तर शून्य धावेवर तंबूत परतला. यावेळी बेंगलोरकडून गोलंदाजी करताना जोश हेजलवूडने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद सिराजने २ विकेट्स आपल्या नावावर केल्या. याव्यतिरिक्त वनिंदू हसरंगा १ विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून दिनेश कार्तिकने शानदार फटकेबाजी करत सर्वाधिक धावा केल्या. कार्तिकने ३४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ५ षटकार मारत नाबाद ६६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त ग्लेन मॅक्सवेलचीही बॅट तळपली. त्याने ३४ चेंडूत ५५ धावा कुटल्या. यामध्ये २ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. या दोघांशिवाय शाहबाज अहमदने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. इतर कोणत्याही खेळाडूला १० धावांचा आकडाही पार करता आला नाही. मात्र, इतर फलंदाजांच्या अर्धशतकांमुळे संघावर त्याचा परिणाम झाला नाही.
यावेळी दिल्लीकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. यावेळी खलीलने बेंगलोरचा कर्णधार डू प्लेसिसची महत्त्वाची विकेट घेत त्याला ८ धावांवर तंबूत धाडले होते. या विजयासह बेंगलोर संघाने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले, तर दिल्ली संघ आठव्या स्थानी कायम राहिला.