मोकळे आकाश.. : संजय उवाच..


कोविड पॅन्डॅमिक हे युद्धच होते. तेथे कौरव शत्रू होते, इथे कोव्हिड- १९! काटेरी मुकुटाच्या सार्वभौमत्वासाठी ही दोन्ही युद्धे लढली गेली.

Advertisement

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

वर्ष सरत आले आहे आणि आकाश हळूहळू का होईना, पण मोकळं व्हायला लागलं आहे याचे समाधान वाटते आहे. अर्थात ‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!’ हे शाळेपासून शिकलेले वाक्य प्रत्यक्षात समाजात भिनवणे किती अवघड आहे याचा प्रत्यय येतो आहे. लॉकडाऊन संपला याचा अर्थ बेधुंद, बेजबाबदार वर्तणुकीला मुभा असा होत नाही. गेल्या दोन वर्षांत मजा करता आली नाही म्हणून आता उट्टे काढायचे अशी वर्तणूक, बाजारात होणारी गर्दी या सगळ्या गोष्टी मला दिग्मूढ करतात. कालच दुपारी जर्मनीत स्थायिक झालेल्या माझ्या भावाचा फोन आला आणि तो म्हणाला, ‘‘अरे, इथे रोज जवळपास ६५,००० रुग्णसंख्या, दोनशेच्या पुढे मृत्यू आणि बुस्टर डोसची मोहीम.. रुग्णालयात बेडस् नाहीत.’’

Advertisement

ही दोन्ही वास्तवं एकाच काळात अनुभवावयास आल्यावर मी एवढेच म्हणू इच्छितो, ‘‘मी संजय आहेच; पण समाजाने धृतराष्ट्र होऊ  नये.’’

महाभारत मला फार आवडते. कारण ते अनादि, अनंत आणि द्वापार युगातून कलियुगात स्थित्यंतरीत होत असतानाही आपली अक्षयी तत्त्वे बरोबर घेऊन येते.

Advertisement

कुरुक्षेत्राच्या रणांगणाचे दृश्य आठवा. अठरा अक्षौहणी सैन्य. आपलेच भाऊबंद आणि गुरुजन. २०२० च्या मे-जूनमध्ये आम्हा डॉक्टरांची अवस्था अर्जुनासारखीच तर झाली होती. आमची रुग्णालये ओसंडून वाहत होती. कॉरिडॉर्स, गॅलऱ्या, लॉबीज्, बेडस्, स्ट्रेचर्स, लाकडाचे बेंचेस, खुर्च्या.. सगळीकडे फक्त पेशंटस् होते. त्यातल्या अनेकांशी आमचे रक्ताचे नाते होते.. ऋणानुबंध होते. यांना ट्रीटमेंट द्यायची.. व्हेंटिलेटर लावायचा?

‘सीदन्ति मम गात्राणि, मुखं च परिशुष्यति’  असा आमचा अर्जुन झाला होता. अशा वेळेला श्रीकृष्णाने शिकवलेल्या ‘स्वधर्मा’ची आठवण झाली.

Advertisement

‘ अथ चैत्त्वमिमं धर्म्य संग्रामं न करिष्यसि।

तत: स्वर्धम कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि।।’

Advertisement

तुम्ही कोणत्या विद्याशाखेचे डॉक्टर आहात, सर्जन आहात की अस्थिशल्यविशारद हे महत्त्वाचे उरले नाही. एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी.. ‘डॉक्टर’ असणे हा तुमचा स्वधर्म बनला. प्राण वाचविण्यासाठी काय करावयाचे हे एकदा ठरल्यावर त्या तत्त्वांची उजळणी आणि अनुभूती घडवून आणणे हे वैद्यकाचे ‘स्वधर्म’ ठरले आणि अर्जुनाला गांडीव उचलण्याचे सामर्थ्य देते झाले. पर्जन्यास्त्र, अग्नेयास्त्र, वायु:अस्त्र, ब्रह्मास्त्र.. भात्यात बाणांची कमतरता नव्हती. पण कालांतराने प्रत्येक अस्त्र शक्तिहीन होत गेल्याचा अनुभव करोनाच्या काळात रेमिडीसव्हीर, टोसिलीझुमॅब आणि प्लाझ्माच्या बाबतीत आला.

‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

Advertisement

मा कर्मफलहेतुर्भू: मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।’

कोणता रुग्ण बरा होईल; काय फळ मिळेल, यश येईल की अपयश याचा विचार बाजूला पडला आणि protocolized management सुरू झाली. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या आदेशाप्रमाणे..‘योगस्थ: कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्ज्य।’ अर्थात भावभावनांचा त्याग करून, यशापयशामध्ये अविचल राहून औषधयोजना करणे हेच धनंजयरूपी धन्वंतरींकडून अपेक्षित होते.

Advertisement

कोविड पॅन्डॅमिक हे युद्धच होते. तेथे कौरव शत्रू होते, इथे कोव्हिड- १९! काटेरी मुकुटाच्या सार्वभौमत्वासाठी ही दोन्ही युद्धे लढली गेली. कुरुक्षेत्रामध्ये बलवान, सशक्त योद्धे बळी गेले, तर करोनामध्ये आबालवृद्ध Vulnerbale या सदरात मोडणारे निष्पाप नागरिक.

वैद्यकशास्त्रात काम करणाऱ्या करोनायोद्धय़ांची अवस्था ‘हतो वा प्राप्स्यसि स्र्वग जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।

Advertisement

तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:।।’ झालेली. सोडायचे नाही, लढायचे. कधी औषधे, तर कुठे व्हॅक्सिन. कोणत्याही परिस्थितीत अंतिम यश आपलेच हे लक्षात घेऊन हजारो डॉक्टर, नर्सेस, टेक्निशिअन्स जणू ‘काँटिनेन्टल कौन्तेय’ झाले.

विषादयोगामध्ये गुरफटून न पडता कर्मयोगाची कास धरणे आणि आपण करत असलेल्या कामावर असीम श्रद्धा ठेवल्यावर परमेश्वर रक्षण करणारच.. आपण एवढीच प्रार्थना करायची.. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’!

Advertisement

..२०२२ साल उजाडेल. नवनव्या व्हॅक्सिन्स येतील. नवे प्रोटोकॉल्स लिहिले जातील. करोना जाईल. पण म्हणून विषाणुशास्त्र थांबणार नाही. नवा serotype नवा व्हेरिअंट, नवा विषाणू.. आपण गीतेवर विश्वास ठेवायचा. काम करत राहायचे आणि म्हणायचे,

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।

Advertisement

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।’

माझी सर्वाना कळकळीची एवढीच विनंती आहे की, प्रतिबंधनाच्या उपायांचा सन्मान आणि सतत स्वीकार करा. आपण जर चक्रव्यूहातल्या अभिमन्यूची अखेर अपेक्षित नसाल तर कमीत कमी धृतराष्ट्र होऊ  नका. बाकी संजय मी आहेच!

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement