मोकळे आकाश.. : मूषकसत्ताडॉ. संजय ओक
करोनाच्या काळामध्ये ‘करोना वॉरिअर्स’ अर्थात ‘करोना योद्धे’ म्हणून सन्मानित होऊन घेण्याची जणू अहमहमिका लागली आहे. वर्तमानपत्रांतून त्यांचे फोटो झळकत असतात. या पार्श्वभूमीवर रशियाच्या नोव्होसीबस्र्कयेथील The Institute of cytology and Genetics ने प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांना एक आगळी मानवंदना दिली आहे. करोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम, डीएनएमधील फेरफार, लसीची निर्मिती या साऱ्या सोपस्कारांमधून पार पडण्यासाठी हजारो उंदीर, हॅमस्टर्स, ससे आणि माकडांनी बलिदान दिले आहे. या सर्व प्राणिमात्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इन्स्टिटय़ूृटच्या प्रांगणात प्रयोगशाळेतील उंदराचा आठ फूट उंचीचा लोभस पुतळा उभा करण्यात आला आहे. मागच्या दोन पायावर बसून गोलाकार चष्मा घातलेले हे उंदीर महाशय पुढच्या दोन हातांनी (पायांनी) विणकामाच्या सुया हातात घेऊन डीएनए स्टॅ्रंड विणण्यात मग्न आहेत. कल्पकता आणि कृतज्ञता यांचा हा अनुपम संगम आहे. पुढच्याच आठवडय़ात लाडक्या गणरायांबरोबर त्यांचे पारंपरिक वाहनही आपल्या घरोघरी येईल. गणोबाचेही मला कौतुक वाटते. हत्तीचे डोके, तुंदिलतनु पोट.. मनात  आणता तर गणोबा पक्षीराज गरुड, बाबांचा नंदोबा, शारदेचा मोर यांपैकी कोणालाही वाहन म्हणून निवडू शकला असता. पण त्याला हवी होती कणखर (robust), कोठेही जाऊ शकेल (go anywhere altitude) आणि राजासम स्वच्छंदी विहरणारी (Live life kingsize) अशी राखाडी रंगाची फोर व्हील ड्राइव्ह एसयूव्ही! आणि म्हणूनच त्याने उंदराची निवड केली. देवाधिदेव गणेशाशी आम्ही गणोबा म्हणून आपुलकीचे नाते जोडल्यावर त्याचा वाहक आमचा मामा होणे स्वाभाविकच होते.

Advertisement

उंदराने माणसाची शतकानुशतके साथ केली आहे. जेथे जेथे माणसाने वस्ती केली, तेथे तेथे उंदीर हजर. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात न्यूयॉर्क, वॉशिंग्टनही याला अपवाद नाहीत. आणि शिकागोची गणना तर rattiest city म्हणूनच झाली आहे. अंटाक्र्टिका खंडाचाच काय तो अपवाद!

Rodent या प्राणिवर्गात मोडणारे हे प्राणिमात्र आकाराने लहान असले तर Mice आणि थोर असले तर Rat म्हणून ओळखले जातात. ब्राऊन रॅट्स (राखाडी) आणि अल्बिनो (पांढुरके) या प्रजाती प्रयोगशाळेच्या कामासाठी अतिशय महत्त्वाच्या. माझ्या एका हौशी मित्राने पाळीव प्राणी म्हणून ते पाळले होते. त्यांच्या खाण्याच्या वेळा कामामुळे चुकल्या तर याचाच जीव कासावीस होई. कुरतडणाऱ्या प्राण्यांसाठी माणसाचे मन कुरतडलेले पाहण्याचा शाळेतला तो माझा पहिला अनुभव होता. पण पुढे लक्षात आले की, ज्याला आपण टाळतो, तो हा उंदीर बराचसा आपल्याचसारखा आहे. मूषक आणि मानवाच्या डीएनएच्या उतरंडीमध्ये खूप साम्य आहे. बौद्धिक विचारक्षमता, निर्णय घेण्याची प्रगल्भता, समूहात राहून सगळ्यांचा विचार करण्याची प्रौढता, संकटप्रसंगी आहे त्या शक्तीनिशी प्रतिकार करण्याची क्षमता, प्रसंगी हासू, तर संकटात आसू या सगळ्या देणग्या विधात्याने या मामांना बहाल केल्या आहेत. मामांनी आपली अगदी बालपणापासून सोबत केलेली आहे. पायपरच्या कवितेपासून ते जाळीत अडकलेल्या सिंहाला सोडवण्याच्या गोष्टीपर्यंत त्यांनी आपल्याला एकोपा, शिस्तबद्धता, स्वक्षमतेवर विश्वास आणि उपकाराची परतफेड करण्याचे धडे दिले आहेत. माणसासारखी बुद्धिमत्ता व विचारक्षमता त्यांना लाभली आहे.

Advertisement

वैद्यकीय प्रयोगशाळेत त्यांनी कधी स्वत:ची वाढ खुरटवून घेतली आहे, तर कधी लशी, नवे drug molecules टोचून घेऊन त्यांची उपयुक्तता आणि सहपरिणाम यांची प्रचीती दिली आहे. त्याचे हृदय आणि महारोहिणीची कमान (Arch of Aorta) यांची रचना पुष्कळशी माणसासारखी. त्यामुळे हृदय आणि रोहिणी शस्त्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी उंदीर उत्कृष्ट ‘मॉडेल’ ठरला आहे. शेतकऱ्यांचा शत्रू आणि शास्त्रज्ञांचा मित्र अशी त्याची संमिश्र प्रतिमा बनली आहे. प्रयोगशाळेत कामाला येतील अशा मूषकसत्तेचे प्रजनन करून नवनव्या प्रजाती निर्माण करणे हा एक औद्योगिक प्रकल्पच आहे.

महानगरपालिकेत काम करत असताना मला त्यांच्या विध्वंसक प्रवृत्तीचाही पुरेसा अनुभव आलेला आहे. बिळात दडणारे, गटारात लडबडणारे, ड्रेनेजच्या पाइपातून प्रवाहाविरुद्ध पोहून नको तिथे अवतरणारे हे इवलेसे जीव नतद्रष्टतेच्या बाबतीतही थोर. गोदामातील धान्याचा फडशा पाडणे, रुग्णाच्या बेडवर जाऊन साइड टेबल आणि कपाटावरील बिस्किटे खाणे, प्रसंगी शवागारातील मृतदेहाच्या बोटांचे लचके तोडणे अशा यांच्या क्लेशकारक अनुभवांनाही मी सामोरा गेलेलो आहे. Bubonic plague विसरता येत नाही म्हणता म्हणता त्याने लेप्टोस्पायरोसिसचे नवे संकट गेल्या १५ वर्षांत आपल्यासमोर आणले आहे. Zoonotic diseases अर्थात संसर्गजन्य रोगांची महत्त्वाची उपशाखा ठरली आहे.

Advertisement

मूषकसत्ता ही अशी महासागरासारखी विस्तारली आहे. गणरायाचे आगमन केवळ चार दिवसांवर आले आहे. त्याच्या प्रतिष्ठापनेची जागा साफ करताना त्याच्या लाडक्या एसयूव्हीलाही पार्किंग लॉट द्यावा म्हणून हा लेखांक.

पहाटे पहाटे लेख संपवून जरा डोळा लागतो- न लागतो तर स्वप्न पडले. स्वप्नात मामा आले. लंबवर्तुळाकार डोके, फेंदारलेल्या मिशा, लुकलुकते बारीकसे बुद्धिमान डोळे, लखलखते दात.. मामा हसले आणि म्हणाले, ‘संजोबा, लेखावर काय समाधान मानता? खरे तर आमच्यावर तुम्ही एक पुस्तकच लिहायला हवे. बरं, तूर्तास एवढंच सांगा, तुमच्या घराजवळ एखादे पार्लर आहे का? ‘फेशियल’ करून घ्यावे म्हणतो!’

Advertisement

[email protected]

The post मोकळे आकाश.. : मूषकसत्ता appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here