मोकळे आकाश.. : आहे मनोहर तरी..डॉ. संजय ओक [email protected]

Advertisement

गोष्ट आहे दोन आठवडय़ापूर्वीच्या रविवारची. ‘लोकरंग’ वाचून झाला की अनेक वाचक प्रतिक्रिया कळवतात. काही कौतुक करतात, तर काही टीका. मी दोन्ही टोकांचा सविनय स्वीकार करतो आणि दोन अक्षरांची का होईना, पोच देण्याचा प्रयत्न करतो. अशीच एक पोच देणारा तो फोन होता. गेली १६ वर्षे वैद्यकीय व्यवस्थापन आणि प्रशासनात काम केल्यामुळे जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांतील विविध नेत्यांशी संबंध निर्माण झाले आहेत. ते राजकीय नाहीत, तर वैयक्तिक स्नेहाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येण्याचे माझे स्वातंत्र्य मी अबाधित ठेवले आहे. फोनवरचे नेते प्रमुख राष्ट्रीय पक्षातील अतिशय ज्येष्ठ होते. त्यांचा वाङ्मयीन व्यासंग दांडगा होता. आणि अनेक वेळा फोन करून ते मला प्रतिक्रिया देत आणि मौलिक सूचनाही करत. आज ते म्हणाले, ‘‘डॉक्टर, कालच तुमच्या लिखाणाबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल बोलत होतो तर ती समोरची व्यक्ती म्हणाली, ‘ ते सर्व खरे, पण डॉक्टर  ओक अतिशय हट्टी आणि हेकेखोर आहेत.’ ’’  फोनवरचे हे वाक्य माझ्या मनात चार-पाच दिवस घोळत राहिले. या स्पष्टवक्तेपणाबद्दल मी माझ्या राजकीय स्नेह्यंचे आभारच मानले.

माझी अवस्था सर्वार्थाने ‘आहे मनोहर तरी..’ या सदरात मोडण्यासारखी झाली होती. मी अंतर्मुख झालो. आपले खरेच काही चुकते आहे का? प्रशासनात आपल्यावर एकाधिकारशाही वृत्तीचा स्टॅम्प का बसतो आहे? आपण मीटिंग्जमध्ये चांगला ‘टीम लीडर’ का होऊ शकत नाही? पूर्वग्रहदूषित वृत्तीने तर आपण कारभार हाकत नाही ना?.. या विचारांची आवर्तने माझ्या मनात सुरू झाली. १६ वर्षांच्या संसारानंतर प्रशासकीय पद्धत बदलणे सोपे नाही.  प्रशासनाचे धडे कॉलेजमध्ये गिरवताना ‘लीडर’ आणि ‘मॅनेजर’ यांमधल्या फरकावर मी पानेच्या पाने लिहिली होती. पण लिहिणे आणि अंगीकारणे यांत फरक असतोच. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे, त्याचा मथितार्थ समजून घेणे, प्रसंगी स्वत:चीच री न ओढणे आणि सर्वसहमतीने निर्णय घेणे ही उत्तम लीडरची लक्षणे आहेत. उत्तम लीडरला लोक आपल्या बरोबर चालावेत, आपल्या मागून नव्हेत असे वाटते. अनुयायी अनुकरण करतात. हमसफर सफर सुस करतात. इथेच लीडरला काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. आपलेच म्हणणे दामटले तर हट्टी आणि हेकटपणाचा शिक्का बसतो आणि गुळमुळीत धोरण स्वीकारले तर निर्नायकी धरसोडपणाचा आळ माथी येतो.  A Leader must learn the art of deciphering the meaning of unspoken word. केवळ उच्चारित शब्दांनाच नाही, तर अनुच्चारित वाक्यांनाही एक खोलवर अर्थ असतो, गर्भित हेतू असतो. मीटिंग्जमध्ये व्यक्त होणारी वाक्ये आणि मते ही केवळ मखलाशी असू शकते, आणि अंतस्थ उद्देश हे वेगळे आणि प्रसंगी स्वार्थी असू शकतात. ते नाकारले की तुम्ही हेकट ठरता.

Advertisement

ज्याचे तुम्ही काम करता त्याच्या दृष्टीने तुम्ही ‘दाता’ ठरता. ज्याच्याशी गोड बोलता त्याच्यासाठी तुम्ही मधुरतेचे ‘मधुघट’ ठरता. आणि ज्याच्यावर तुम्ही डाफरता किंवा त्याला नाकारता त्याच्यासाठी तुम्ही ‘हट्टी’ आणि ‘हेकट’ ठरता.

प्रशासनात अनेक गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष काम करताना शिकता. खुर्ची खूप काही शिकवून जाते. You must learn to say ‘NO’!  समर्थनीय नकार हा खुशमस्करी होकारापेक्षा अधिक स्तुत्य ठरतो. दूरगामी परिणाम हे प्रजेसाठी कल्याणकारक ठरतात. तुसडे म्हणून तुमची संभावना झाली तरी निदान निर्णयक्षमतेतील तारतम्य राखल्याचे आत्मिक समाधान तुम्हाला लाभते. तुमच्याबद्दल सदासर्वदा सर्वत्र चांगलेच बोलले जाईल ही भूमिकाच भ्रामक ठरावी. चार आंधळे आणि हत्ती ही गोष्ट ऐकत आपण मोठे झालो. प्रशासक आणि त्याच्याबद्दल व्यक्त होणारी मते ही या गोष्टीतल्या अभिप्रायांसारखी असतात. कोणाला शेपटीत दोरखंड दिसतो, तर कोणाला साप. प्रशासकाने सुपासारख्या कानाने गोष्टी ऐकायच्या, बारीक पण बुद्धिमान नजरेने मते टिपायची, आणि मोठय़ा पोटात दडवून ठेवायची. गेली १६ वर्षे मी हेच करीत आलो आहे. (पक्षी : उगीच नाही आमचे पोट सुटत. घरातील टीकाकारांनी विशेष नोंद घ्यावी.)

Advertisement

तस्मात उदयोन्मुख अधिकाऱ्यांना, आरोग्य आणि रुग्णालय व्यवस्थापकांना एकच प्रेमाचा सल्ला : कोणी ‘आहे मनोहर तरी..’ म्हटले तरी नाराज, निराश होऊ नका. निर्णय शक्य तितक्या सहमतीने आणि समाजाच्या कल्याणाचे घ्या. टीका ही पाठीवरची उत्तम कामाबद्दल पडणारी थाप समजा. या लेखाची अखेर करताना मला साहिर लुधियानवी यांनी लिहिलेला अजरामर ‘किता’ आठवतोय..

‘न मुँह छुपा के जिए हम न सर झुका के जिए

Advertisement

सितमगरों की नजम्र से नजम्र मिला के जिए

अब एक रात अगर कम जिए तो कम ही सही

Advertisement

यही बहुत है कि हम मिशअलें जला के जिए’

 

Advertisement

The post मोकळे आकाश.. : आहे मनोहर तरी.. appeared first on Loksatta.Source link

Advertisement