मुलांनी मजेत वाचायला शिकावं म्हणून.. | Children should learn to read with pleasure Storyviewer Reading Editing setm amy 95संध्या टाकसाळे

Advertisement

वाचायला नुकतीच सुरुवात करणाऱ्या लहान मुलांसाठी ‘प्रथम बुक्स’नं ३० मराठी चित्रपुस्तकांचा एक संच निर्माण केला आहे. चित्रं, गोष्टी आणि वाचनशास्त्र यांचा मेळ घालून माधुरी पुरंदरे आणि संध्या टाकसाळे यांनी या संचाचं संपादन केलं आहे. याशिवाय माधुरी पुरंदरे यांनी स्वत: यासाठी काही गोष्टी लिहून त्यांचं चित्रांकन केलं आहे. ही सर्व गोष्टींची पुस्तके प्रथम बुक्स च्या ‘स्टोरीविव्हर’ या डिजिटल व्यासपीठावर विनामूल्य वाचायला मिळतील. १९ जून या राष्ट्रीय वाचन दिनाच्या निमित्ताने..

वाचनकौशल्य ही आयुष्यभर पुरणारी आनंदाची शिदोरी असते. अक्षरओळख असली तरी मुलं वाचायला मात्र विसरली आहेत अशी परिस्थिती आज दिसते. अगदी लहान मुलं तर सोडाच; पण कोविडकाळात शाळा बंद असल्यानं तिसरी-चौथीतल्या मुलांनाही वाचता येईनासं झालं आहे. या मुलांना वाचनाकडे कसं वळवता येईल?

Advertisement

आकर्षक चित्रं असलेलं, उत्सुकता वाढवणारं, हातात घेतल्यावर आनंद होईल आणि वाचताना मन रमून जाईल असं गोष्टीचं पुस्तक मिळालं तर मुलं ते पटकन् वाचण्याची शक्यता असते. पाठय़पुस्तकं ही नाही म्हटलं तरी मुलांना थोडा कंटाळा आणणारीच गोष्ट. म्हणूनच सुरुवातीला मातृभाषेत असलेली सुंदर गोष्टींची पुस्तकं मुलांच्या हाती द्यावीत असं शिक्षण, भाषा आणि बालमानस क्षेत्रातले तज्ज्ञ एकमुखानं सांगतात. त्यामुळे होतं काय, तर मूल वाचायला तर शिकतंच; पण त्याचा भाषाविकास होतो, शब्दसंपत्ती, आकलनशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. पुढील शिक्षणासाठी मुलं तयार होतात. वाचनानंदाची आयुष्यभराची शिदोरी मिळते आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मजा येते. निखळ आनंद ही कोणत्याही वाचनाची पहिली अट हवी. मुलं व वाचनाचा आनंद ही जोडी सतत टिकली पाहिजे.

मुलं जेव्हा वाचायला शिकत असतात, तेव्हा त्यांच्यासाठी विचारपूर्वक तयार केलेली गोष्टीची पुस्तकं मराठीमध्ये कमी आहेत. पालकांनी मुलांना मोठय़ानं वाचून दाखवावी अशी पुस्तकं आहेत; पण मुलाला स्वत:ला वाचायला येतील अशी पुस्तकं कमी आहेत. मराठीतच काय, एकंदरीतच भारतीय भाषांमध्ये ‘चित्रपुस्तक’ (पिक्चरबुक) ही कल्पना अलीकडेच रुळायला लागली आहे. या पुस्तकात केवळ सजावट म्हणून चित्रं नसतात, तर ती गोष्ट समजायला मदत करतात, गोष्टीला पुढे नेतात. मजकुरात नसलेल्या अनेक गमती, बारकावे आणि तपशील चित्रांत सापडतात. या चित्रांचंही ‘वाचन’ मजकुराच्या बरोबरीनं करायला लागतं. शब्दांमधून तर मुलांची भाषा विकसित होतेच, पण ती चित्रांमधूनही होते. आपल्याला चित्रांत सापडलेल्या गोष्टी सांगताना, त्याचं वर्णन करतानाही मुलांची भाषा घडत जाते. दृश्यकलांची जाणीव हा आणखी एक फायदा!अशी चित्रपुस्तकं लहान मुलांना आवडतात. त्यांना प्रसन्न करतात.

Advertisement

मुलांना स्वत:चे स्वत: वाचता यावे यासाठी आणखी एक पुढचं पाऊल म्हणजे चित्रपुस्तकाच्या मूळ कल्पनेशी इमान राखून पायाभूत साक्षरता शिकवणाऱ्या तत्त्वांचा त्यात समावेश करणं. म्हणजे वाचन शिकवण्याच्या ज्या पद्धती शिक्षणक्षेत्रात वापरल्या जातात, त्यानुसार गोष्टींची वाचनपातळी निर्धारित करणं, सोपे शब्द, सरळ वाक्यरचना यांचा वापर करून गोष्ट लिहिणं हे जाणीवपूर्वक केलं जातं. सोपे शब्द वापरायचे म्हणून ‘कमल नमन कर’ किंवा ‘बबन घर बघ’ यांसारख्या निरस ओळी देऊनही चालत नाही. मुलांना काय मजा येणार ते वाचायला? म्हणजे ३० ते ७० शब्दांत गोष्ट हवी. शब्दांना लय हवी. उत्सुकता निर्माण होईल अशा विश्वातला विषय हवा. एखादा शब्द मुलाला कळला नाही तर चित्रं बघून त्याचा अंदाज बांधता यायला हवा. नर्मविनोद हवा. आणि हे सगळं साधायचं तर तारेवरची कसरतच.

या सगळ्याचा एकत्र मेळ साधत ‘प्रथम बुक्स’ने मराठीत ३० पुस्तकांचा संच नुकताच तयार केला आहे. माधुरी पुरंदरे आणि संध्या टाकसाळे यांनी या संचाचं संपादन केलं असून, मुलांच्या विश्वातले, त्यांच्या आवडीचे, अनुभवाचे, कुतूहलाचे, मजेचे अनेक विषय त्यात आहेत. माधुरी पुरंदरे यांच्यासह रमा हर्डीकर, सुखदा रहाळकर, मिनी श्रीनिवासन, शिक्षणतज्ज्ञ मंजिरी निंबकर, भाषाशास्त्रज्ञ चिन्मय धारूरकर अशा अनेकांनी यासाठी गोष्टी लिहिल्या असून, राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रकारांनी चित्रं काढली आहेत. ही पुस्तकं ८ आणि १२ पानी असून, सध्या डिजिटल स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहेत. पुढील लिंकवर ती वाचता येतील. https:// storyweaver.org.in/search?query= marathi%20 first प्रत्यक्ष वर्गात वापरण्यासाठी ही पुस्तकं उपयोगी आहेत. त्यामुळे वाचनकौशल्य तर वाढेलच; पण गोष्टीच्या किंवा चित्रांच्या निमित्ताने इतर अनेक विषयांवर संवाद साधून, प्रश्न विचारून आकलन वाढवण्यासाठीही ती वापरता येतील.

Advertisement

वाचनकौशल्याचा अभाव आणि त्यातून होणारं शैक्षणिक नुकसान या गोष्टी आधीही महत्त्वाच्या होत्याच; पण कोविडकाळाने त्याला वेगळंच परिमाण दिलं आहे. हा मुद्दा जागतिक पातळीवरही कसा ऐरणीवरचा ठरतो आहे हे सांगताना ‘स्टोरीविव्हर’च्या वरिष्ठ संचालक पूर्वी शहा यांनी आकडेवारीच दिली. त्या म्हणाल्या, ‘‘कोविडची साथ ऐन भरात असताना जगभरातल्या १६० कोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान झालं. पायाभूत वाचनकौशल्याचा अभाव असणाऱ्या मुलांची संख्या २०२० साली ४६ कोटींपर्यंत पोहोचेल असा अंदाज ‘युनेस्को’ने वर्तवला होता. प्रत्यक्षात मात्र हा आकडा ५८.४ कोटी इतका वर गेला. भारतातील सर्व शाळांमध्ये वाचन-संस्कृती रुजवून २०२५ पर्यंत पायाभूत साक्षरता साध्य करणं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय ध्येय बनलं आहे. हे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी ‘प्रथम बुक्स’ वचनबद्ध असून, त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ‘फाउंडेशनल लिटरसी’ हा कार्यक्रम ‘स्टोरीविव्हर’वर तयार करण्यात आला. हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये तो आहे. वापरायला अतिशय सोपा असलेला हा कार्यक्रम घरी किंवा वर्गात आणि ऑनलाईन, ऑफलाईन अशा कोणत्याही पद्धतीनं उपयोगात आणता येतो. पहिली ते तिसरीतल्या मुलांचं वाचन आणि आकलन सुधारावं यासाठी निर्धारित वाचनपातळीनुसार गोष्टींची पुस्तकं आणि इतर संसाधनं ‘स्टोरीविव्हर’वर वापरासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत.’’

‘प्रथम बुक्स’ ही ना-नफा तत्त्वावर चालणारी, अनेक भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित करणारी संस्था २००४ सालापासून ‘प्रत्येक मुलाच्या हाती पुस्तक’ हे ध्येय समोर ठेवून काम करते आहे. https://prathambooks.org ‘स्टोरीविव्हर’ या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून खुल्या तत्त्वावर आधारित परवान्यामुळे (ओपन सोर्स लायसन्स) आजवर प्रथम बुक्सला पाच कोटी मुलांपर्यंत वाचनाचा आनंद पोहोचवता आला आहे. याच पायाभूत साक्षरता कार्यक्रमात मूळ मराठीत असलेली ही नवी ३० पुस्तकं दाखल होतील. या मराठी पुस्तकांचे इंग्रजी आणि हिंदी अनुवादही तयार होत असून, लवकरच ते ‘स्टोरीविव्हर’वर प्रसिद्ध होतील. ही पुस्तकं वर्गात कशी वापरता येतील, मुलांचं वाचनकौशल्य आणि भाषाविकास वाढविण्यासाठी काय करायला हवं, यासाठी पुण्यात १९ जूनला म्हणजे ‘राष्ट्रीय वाचन दिना’च्या निमित्ताने एक चर्चासत्र आयोजित केले आहे. ते निमंत्रित शिक्षकांसाठी आहे. मजेत शिकण्यासाठी अशा पुस्तकांचा वापर झाला तर उद्दिष्ट गाठता येईलच, पण त्याचबरोबर वाचनाचाही आनंद सर्वांपर्यंत पोहोचेल.

Advertisement

शब्द-चित्रांची भाषा
आपल्याकडे चित्रपुस्तक ही कल्पना तशी नवी आहे. किंबहुना, चित्रवाचन करत करत शब्दवाचनापर्यंत पोहोचणे हीच स्वाभाविक प्रक्रिया असते हे फारसे कुणाला माहीत नसायचे. आता ही परिस्थिती हळूहळू बदलते आहे. ‘प्रथम बुक्स’ने पायाभूत साक्षरता डोळ्यासमोर ठेवून अगदी लहान मुलांसाठी हा मोठा प्रकल्प करायला घेतला. वयोगट जेवढा लहान, तेवढे काम आव्हानात्मक आणि जबाबदारीचे असते. सुरुवात विषयाच्या निवडीपासूनच झाली. निवड वैविध्यपूर्ण असणे आवश्यक होते. काही विषय आम्ही सुचवले, काही लेखकांनी सुचवले. पृष्ठसंख्या आणि शब्दसंख्येची मर्यादा सांभाळत विषयाला कथारूप देणे, वाचताना मुलांना मजा येईल, प्रत्येक पान उलटताना ‘मग काय झालं?’ अशी उत्सुकता वाटेल आणि खूप बोलावेसे वाटेल अशा प्रकारे कथेची मांडणी करणे ही कसरतच होती; पण ती आनंद देणारी होती. पुस्तकांचे लेखक मराठीच आहेत. त्यांच्यापैकी काही स्वत:च चित्रकारही आहेत. पण काही चित्रकार इतर प्रांतांमधले आहेत. त्यांच्याशी संवाद साधत शब्दांच्या अधली, मधली आणि मागली रिकामी जागा भरून काढणारी, शिवाय शब्दांच्या पुढे जाऊन आशयातही भर घालणारी चित्रे करवून घेणे हा अनुभव तर फारच समाधान देणारा होता. एखादा लहानसा शब्द बदलण्याने किंवा वगळण्याने, एखादी रेषा ठळक करण्याने किंवा रंगाची छटा किंचित गडद व फिकी करण्याने किती फरक पडतो हे लेखकांनीही पाहणे महत्त्वाचे आहे हे सर्वाना जाणवले.

‘सर्वाना’ असे मी म्हटले कारण मुलांसाठी गांभीर्यपूर्वक आणि सातत्याने काम करत राहणाऱ्यांचा आमचा एक लहान गट तयार झाला आहे. त्यातील काहींनी या प्रकल्पासाठी लेखन आणि चित्रकारी केली आहे. तीसही पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया आम्ही सुरुवातीपासून एकत्रितपणे पाहिली आणि समजून घेतली. प्रत्येक टप्प्यावर त्याबद्दल चर्चा केली, सूचना केल्या. शिक्षकांनी आणि पालकांनीही शब्द-चित्रभाषा समजून घेऊन मुलांबरोबर पुस्तकांचा आनंद घेतला तर त्यांना वाचनाकडे वळवणे कठीण वाटणार नाही.– माधुरी पुरंदरे (लेखक, संपादक)

Advertisement

मुलांसाठी सुयोग्य पुस्तके कशी निवडाल?
मानसशास्त्र आणि भाषाशिक्षणाच्या अनेक सिद्धांतांनुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या आहे त्या क्षमतेहून थोडा अधिक वरच्या पातळीवरचा मजकूर वाचायला द्यायला हवा. जेव्हा मजकूर थोडय़ा अधिक कठीणपातळीचा, पण त्यांना पेलता येईल असा असतो तेव्हा मुलांच्या वाचनक्षमतेचा नैसर्गिकरीत्या विकास होतो. जर वाचन खूप अवघड गेले तर मुले निराश होतात आणि वाचनापासून दूर जातात. वाचनासाठीचा मजकूर खूप सोपा असेल, तर कुठलेच आव्हान न जाणवल्याने मुले कंटाळून जातात आणि त्यांची वाचनातली रुची संपून जाते. मुलांनी प्रगती करत राहण्यासाठी त्यांना वाचताना योग्य आव्हान वाटत राहील यासाठी जाणीवपूर्वक निवडलेली पुस्तके आणि गोष्टी त्यांना उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची बाब आहे. फार सोपे नाही किंवा फार अवघड नाही असे पुस्तक म्हणजे मुलांसाठी ‘योग्य पुस्तक’ होय.

पुरेसे आव्हानात्मक पुस्तक वाचताना जेव्हा मुलांना शिक्षक मदत करतात, तेव्हा वाचनात अंतर्भूत असलेली कौशल्ये पद्धतशीरपणे आणि क्रमाक्रमाने शिकणे मुलांना शक्य होते. भाषेच्या तासिकेमध्ये मार्गदर्शित वाचन महत्त्वाचे साधन ठरू शकते. मार्गदर्शित वाचनामधली एक महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे मुलांच्या वेगवेगळ्या गटांना ‘योग्य वाचनपातळी’ असलेली पुस्तके पुरवणे. योग्य पातळी असलेल्या पुस्तकवाचनाचा भरपूर सराव आणि शिक्षकांची मदत याच्या बळावरच मुलं अडखळत वाचण्यापासून प्रवाही वाचक होण्याचा टप्पा गाठू शकतात. वाचन सुलभता (अक्षरओळख आणि लिपीची उकल करता येणे) तसेच आकलन सुलभता (अर्थ समजून घेता येणे) या दोन निकषांचा विचार करून प्रथम बुक्सच्या ‘स्टोरीविव्हर’ने उत्तम प्रकारे वाचनपातळ्या निर्धारित केलेले बालसाहित्य निर्माण केले आहे. – अपर्णा दीक्षित (भाषा, अध्यापनशास्त्र तज्ज्ञ, लँग्वेज अँड लर्निग फाऊंडेशन, दिल्ली येथे बहुभाषिक शिक्षण प्रकल्पामध्ये संशोधक म्हणून कार्यरत)

Advertisement

(लेखिका प्रथम बुक्सच्या वरिष्ठ संपादक आहेत.)
[email protected]

Source link

Advertisement