अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे लहान मुलांना पळवून नेणाऱ्या एका आरोपीला टाकळीभान ग्रामस्थांनी पकडून टाकळीभान पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमुळे टाकळीभान परिसरात खळबळ उडाली.
टाकळीभान येथील खळवाडी परिसरातील रामेश्वर शिंदे यांची 7 वर्षाची इयत्ता दुसरीमध्ये शिकणारी मुलगी कांचन रामेश्वर शिंदे ही गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान घराबाहेर खेळत होती. त्यावेळी बाजाठाण येथील अनिल पोपट निकम (वय 23) याने मुलीस पळवण्याचा प्रयत्न केला. या मुलीने आरडाओरड केल्याने या मुलीची आई घराबाहेर आली व भामट्याला पकडले. मात्र हाताला झटका देऊन तो पळून गेला.
या मुलीच्या आधी त्याने स्वरा राकेश येवले या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही मुलगी घरात पळून गेल्याने त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर त्याने रामेश्वर शिंदे यांच्या मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला, तोही प्रयत्न फसला. पोर धरणारा गावात आलेला असून एका मुलीस पळवण्याचा प्रयत्न झाला व या भामट्याचे पेहरावाचे वर्णन सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने लोक सतर्क झाले.
परिसरातील ग्रामस्थांनी या भामट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ग्रामस्थानी अखेर शोध घेऊन अनिल निकम या भामट्याला भोकर परिसरातील जगताप वस्ती परिसरात पकडून चांगलाच चोप दिला. त्यावेळी त्याने त्याचे नाव, गाव सांगितले. या पोरधऱ्याला ग्रामस्थ सचिन नागले, किरण मेहेत्रे, सुनील येवले, गणेश शिंदे, गजानन सावंत, लाला मैड, रमेश पेहरकर, विवेक शिंदे यांनी पकडून पोलासांच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत. आज झालेल्या या घटनेमुळे टाकळीभान येथे मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.