मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे सावटअन्वय सावंत, लोकसत्ता

Advertisement

मुंबई : राज्यासह मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेवर यंदाही अनिश्चिततेचे सावट आहे.

२००४ सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे मोठय़ा जल्लोषात आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील वर्षी करोनामुळे ही मॅरेथॉन स्पर्धा रद्द करणे भाग पडले होते. यंदा मुंबईतील करोनाचा धोका कमी होईल आणि मॅरेथॉनचे नियमितपणे आयोजन करता येईल, अशी संयोजकांना आशा होती. मात्र, करोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू ओमायक्रॉनमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परदेशी नागरिकांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

Advertisement

यंदा जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी (१६ जानेवारी) मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर संयोजकांनी ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही स्पर्धा घेण्याचा त्यांचा मानस असून त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्जदेखील पाठवल्याचे समजते. मात्र, मुंबईतील सध्याची करोनाची स्थिती लक्षात घेता, त्यांना परवानगी मिळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत या स्पर्धेबाबत काय निर्णय घेतले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आफ्रिकन धावपटूंबाबत चर्चा

Advertisement

मॅरेथॉन स्पर्धामध्ये आफ्रिका खंडातील धावपटू मोठय़ा संख्येने सहभागी होतात आणि आफ्रिकेतच ओमायक्रॉनचा उगम झाला. त्यामुळे तेथील धावपटूंना मुंबईत प्रवेश मिळणार का? प्रवेश मिळाल्यास त्यांना विलगीकरणाचे कोणते नियम पाळावे लागणार? त्यांना प्रवेश नाकारला गेल्यास मुंबई मॅरेथॉनची रंगत कायम राहिल का? असे असंख्य प्रश्न सध्या संयोजकांसमोर आहेत. परंतु त्यांच्यासह जगभरातील मॅरेथॉनप्रेमी ही स्पर्धा होण्याबद्दल आशादायी आहेत.

The post मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे सावट appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement