रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या पराभवासह त्यांच्या नावावर एक नकोसा विक्रम झालाय. आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच निराश करणारी झाली. सोमवारी नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या लढतीत पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईचा कोलकाता नाईट रायडर्सने ५२ धावांनी पराभव केला. हंगामातील मुंबईचा हा नववा पराभव ठरला आणि गुणतक्त्यात ते सर्वात अखेरच्या स्थानावर आहेत.
केकेआर विरुद्धच्या पराभवामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झालाय. मुंबईने याआधी कधीच एका हंगामात इतक्या लढती गमावल्या नाहीत. याआधी २००९, २०१४ आणि २०१८ मध्ये मुंबईने प्रत्येकी ८ तर २०१२, २०१६ आणि २०२१मध्ये प्रत्येकी ७ लढती गमावल्या होत्या.
नाणेफेक गमावल्यानंतर कोलकात नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी ४३, अजिंक्य रहाणेने २५ तर रिंकू सिंहने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने ५ तर कुमार कार्तिकेयने २ विकेट घेतल्या. फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईचा डाव फक्त ११३ धावात संपुष्ठात आला. केकेआरविरुद्धची ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची धावसंख्या ठरली. याआधी २०१२ मध्ये मुंबईने १०८ धावा केल्या होत्या.
केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा जलद गोलंदाज जसप्रीत ४ षटकात १० धावा देत ५ विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तर भारतीय गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकची होय. आयपीएलच्या १५व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने फलंदाजांची दाणादाण उडवली.