राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजधानी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय विमान नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. या भेटीत शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडल्याच्या मुद्द्यावर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्याच अनुषंगाने मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती फडणवीसांनी सिंधिया यांच्याकडे केली. महत्त्वाचं म्हणजे सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे.
सिंधिया यांच्या भेटीचा तपशील फडणवीसांनी ट्विटच्या माझ्यमातून दिला आहे. फडणवीस म्हणाले, नवी दिल्ली येथे आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचीही भेट घेतली आणि मुंबईतील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला देण्याची विनंती केली. सध्या मंत्रालय आणि अॅनेक्स इमारत मिळून सुद्धा शासकीय कार्यालयांसाठी जागा अपुरी पडते, त्यामुळे या इमारतीची मागणी करण्यात आली.
“मुख्यमंत्री असताना हा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर आम्ही पुन्हा पत्रव्यवहार केला. सध्या रिझर्व्ह बँक आणि महाराष्ट्र सरकार अशा दोघांनी या जागेची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारला प्राधान्य देण्याची मागणी मान्य केली आहे. आता केंद्र सरकारचे अधिकारी आणि आमचे मुख्य सचिव यासंदर्भात पुढील चर्चा करतील आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मान्यतेने पुढील निर्णय घेण्यात येईल”, असं फडणवीस म्हणाले.