राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यातील शेवटच्या षटकात घडलेले नो बॉल प्रकरण चांगलेच गाजले. अनेकांनी या प्रकरणी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने याने आयपीएलच्या नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली आहे. जयवर्धनेचे म्हणणे आहे की, तंत्रज्ञानाचा चांगला वापर करण्यासाठी व्हिडिओ पंच आणि मैदानी पंचामध्ये चांगले ताळमेळ असावेत. त्यामुळे जर नियमांमध्ये बदल करावे लागले तर आपण त्यासाठी सहमत असल्याचे त्याने म्हटले आहे.
दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यातील शेवटच्या षटकात मैदानी पंचांच्या राजस्थानच्या गोलंदाजाच्या एका फुलटॉस चेंडूला नो बॉल दिले नव्हते. यामुळे विवाद निर्माण झाला होता. या प्रकरणी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतला दंड म्हणून एका सामन्याची फी भरावी लागली होती. तसेच साहाय्यक प्रशिक्षक प्रविण आमरे यांच्यावर एका सामन्यासाठी बंदी लावण्यात आली होती.
जयवर्धनेने आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलताना या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “अशा घटना पुढेही घडू शकतात. आपण यावर लक्ष देण्याची गरज आहे. असा कोणता पर्याय आहे का की, तिसरे पंच या गोष्टींवर नजर ठेवतील आणि मैदानी पंच सांगतील की या चेंडूला तपासले जावे की नाही. हे पाहून दुख होते की, अशा गोष्टींमध्ये सामना थांबवावा लागतो आणि लोक मैदानावर जातात. आमरेने मैदानावर उतरणे खेळासाठी चांगले नव्हते. हे खेळाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध होते,” असे जयवर्धने पुढे म्हणाला.
“नियम सांगतात की, तुम्ही अशा गोष्टी तपासण्यासाठी तिसऱ्या पंचांपर्यंत जाऊ नये. कोणत्या खेळाडू किंवा प्रशिक्षकाने मैदानावर जाणे हा समस्येचा पर्याय नसतो. प्रशिक्षक म्हणून तुम्ही केवळ टाइम आऊटवेळीच मैदानावर जाऊ शकता. मी या घटनेबद्दल माझ्या संघासोबत चर्चा केली आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या आहेत,” असेही जयवर्धनेने म्हटले.
पुढे बोलताना जयवर्धने म्हणाला की, “आम्ही सर्वांनी ही घटना टिव्हीवर पाहिली. अधिकतर खेळाडू एकत्र सामना पाहात होते आणि सामन्यानंतर आम्ही यावर चर्चाही केली. अशा प्रकारच्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत. मला अपेक्षा आहे की, रिषभ पंत आणि प्रविण आमरेला याचा पश्चाताप झाला असावा. मला वाटते की, पंत जो काही म्हटला, ते ओघात म्हटला. आता त्याने यातून पुढे जायला हवे.”