मी, रोहिणी : समारोपाचं थोडंसं..


‘‘आता काम करताना जाणवतं की, मी या क्षेत्रात आले तो काळ किती वेगळा होता! मधल्या काळात इथल्या खूप गोष्टी बदलल्या आणि मलाही त्यानुसार बदलावं लागलं;

Advertisement

रोहिणी हट्टंगडी

‘‘आता काम करताना जाणवतं की, मी या क्षेत्रात आले तो काळ किती वेगळा होता! मधल्या काळात इथल्या खूप गोष्टी बदलल्या आणि मलाही त्यानुसार बदलावं लागलं; पण तरीही जुन्या काळातल्या काही गोष्टी मात्र डोक्यात रुतून बसल्या आहेत. त्यांचा मला फायदाच झाला. आजच्या मुलांसमोरची आव्हानं वेगळी आहेत. त्यांना अनुभवाचे चार शब्द सांगत निरोप घ्यावासा वाटतो.’’ 

Advertisement

बघता बघता हे वर्ष संपत आलं. जानेवारीपासून माझ्या आयुष्यातल्या आठवणी, अनुभव वाचकांसमोर मांडत आले. पहिला लेख लिहीत असताना जरा धाकधूक होती. किती लिहू? काय लिहू? मी जे सांगते आहे त्यात त्यांना रस असेल ना?  माझ्या दृष्टीनं जे मला महत्त्वाचं वाटलं ते ते मी लिहीत गेले. वाचकांना ते बरं वाटतंय हे लक्षात आलं आणि हुरूप आला. मी ‘लेखक’ नाही. एखाद्या विषयावर हुकमी लिहिता येत नाही; पण अनुभव सांगता येतात. माझ्या तरुण सहकलाकारांबरोबर खूपदा गप्पा मारताना नाटक-सिनेमातल्या गोष्टी सांगायची, वर्णनं  करायची. त्यांचा ‘फीडबॅक’ गाठीशी होताच. त्याचंच बोट धरून लिहीत गेले. लिहीत गेले म्हणजे टाइप करत गेले. लिहिण्याची सवय गेली आता. म्हणजे पानंच्या पानं लिहिण्याची; पण टाइप करताना फायदा झाला. खाडाखोड झालेली तिथल्या तिथे गायब! फेअर करायला लागत नाही. जमाना खरंच बदललाय. तंत्रज्ञानानं सर्वच बदललंय.फक्त तंत्रच नाही.. काळच बदललाय.

  गंमत म्हणून सांगते, मी शाळेत असताना कोणाचे पालक शाळेत भेटायला आलेले दिसले, की त्या मुलीबद्दल काही तरी तक्रार असणार, म्हणून भेटायला बोलावलं असणार, असं आम्ही म्हणायचो. पालकसुद्धा पोरं मास्तरांच्या हातात देऊन बिनघोर असायचे. शाळेत हातावर छडय़ा खाल्ल्या, शिक्षासुद्धा झाल्या; पण कधी शिक्षकांबद्दल तक्रार केलेली आठवत नाही. शिक्षकही मुलांना वळण लावण्यासाठीच शिक्षा करायचे. माझा मुलगा शाळेत जायला लागला तेव्हा मीही शाळेत ‘टीचर’ला भेटायला गेले नाही, तर त्यांना मात्र ते ‘ऑड’ वाटलं. तसं मला ‘ओपन हाऊस’च्या वेळी आडून आडून सुचवलं. हे जाऊ दे, अहो, साध्या गणिताच्या पद्धतीही बदलल्या आहेत. वजाबाकी करताना छोटय़ा संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही म्हणून एक हातचा घेऊन वजाबाकी करायची आणि घेतलेला हातचा परत करायचा असं आपलं आम्ही शिकलो (अनेक तरुण वाचकांना ही पद्धत माहीतही नसेल!) आता हातचा परत तर करतच नाहीत, पण त्या संख्येतलाच एक कमी करतात! त्यामुळे मी गमतीत म्हणते, ऋण न फेडण्याची (काहीही परत न करण्याची) मनोवृत्तीच झाली आहे की काय, अशी शंका का बरं येऊ नये?

Advertisement

 आमच्याही क्षेत्रात झालेच आहेत ना बदल. पूर्वी मालिका आठवडय़ातून एकदा असायच्या, त्याबद्दल मीआधीच्या लेखात लिहिलं आहेच; पण जिथे त्या वेळी चार लोकांत काम व्हायचं, तिथे आज त्याचसाठी बारा लोक काम करतात! आणि हा बदल झाला काही वर्षांतच. मी काम करत असलेली ‘कन्यादान’ मालिका बंद झाल्यानंतर दोन-चार वर्षांतच त्याच निर्मात्यांची एक दुसरी मालिका मी केली. चित्रीकरणासाठी मी चार दिवस दिले असताना शेवटच्या दिवशी काम सुरू केलं गेलं. लगेच दुसऱ्या दिवशी मला पहाटेच बाहेरगावी निघायचं होतं. मी तसं सांगितलं होतं; पण रात्री पॅकअपची चिन्हं दिसेनात. म्हणून मी असिस्टंटला म्हटलं, ‘‘अरे, दिग्दर्शकाला सांग ना मला लवकर जायचं आहे. तसं मी सांगितलंय..’’ तर म्हणतो कसा, ‘‘रोहिणीताई, तुमची वेळ झाली की तुम्ही निघा.’’ ‘‘अरे, पण सीनचं काय?’’ ‘‘त्याचं बघून घेतील ते! इथं दिग्दर्शक ‘पॅकअप’ वगैरे नाही सांगत. एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ूसर सांगतो. त्याच्याशी बोला. आम्हाला फक्त ‘हे कलाकार आणि हे सीन्स’ असं सांगितलं जातं आणि आम्ही ते करून देतो. बदललंय सगळं रोहिणीताई!’’ त्या दिवशी मलाही ‘बदलावं’ लागलं! ‘ई.पी.’ला (एक्झिक्युटिव्ह प्रोडय़ूसर) सांगितलं आणि शूट सोडून निघाले. कसंतरीच वाटत होतं; पण माझाही नाइलाज होता. मला वाटलं, एकच सीन झाला आहे, म्हणजे आता माझ्याऐवजी घेणार दुसऱ्या कोणाला तरी! पण आठवडय़ाभरानं फोन आला, ‘‘कल शूट हैं नौ बजे!’’ आता बोला! आपली बाजू बरोबर असली की घाबरायचं कारणच नाही. पण ‘सिस्टीम’ बदलली होती हे मात्र खरं.

    माझ्या उमेदवारीच्या काळात काम मिळण्यासाठी निर्मात्यांना, दिग्दर्शकांना भेटायला हवं, असे सल्ले दिले जायचे; पण मला नेहमी वाटायचं, की माझं काम पाहून निर्माते येतील माझ्याकडे! आणि जर मी कोणाकडे काम मागितलं, तर ते देतील ते मला स्वीकारायला लागेल; अगदी आवडलं नाही तरी. नाही म्हणण्याचा हक्क माझ्याकडे राहणार नाही. वाट बघावी लागली तरी चालेल. थांबेन! इतकंच काय, माझ्याकडे माझे फोटोही नव्हते आणि आता कामासाठी आधीच पोर्टफोलिओ तयार! आधी टॅलेंट की आधी रूप? प्रश्नच पडतो आणि कित्येक वेळा तर असं पाहिलं आहे, की एखाद्या छोटय़ा भूमिकेत एखादा चांगला नट घेतला आणि तो समजा हजार रुपये मागत असेल, तर त्याच भूमिकेसाठी ‘नगास नग’ अशा तत्त्वावर पाचशे रुपयेवाला कामचलाऊ नट निवडतात. मग तो वाईट का काम करेना, खूप ‘टेक्स’ देऊन वेळ का घालवेना, पैसे कमी घेतोय ना.. बस्स! चांगला नट एका टेकमध्ये काम करेल, वेळ वाया जाणार नाही, त्रास कमी असेल, हे लक्षातच घेत नाहीत. कलाकृती चांगली करायची, की आपलं धरपकड काम लोकांच्या समोर ठेवायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल, तर मग ती कलाकृती लोकांना आवडली नाही तर जबाबदारी कोणाची? जयदेव नेहमी एक उदाहरण द्यायचा, ‘‘एक जण शंभर नंबरी सोनं विकतो, एक जण चांदीवर सोन्याचा मुलामा देऊन सोनं जरा कमी दरात विकतो, तर तिसरा पितळ्यावर सोनेरी बेगड लावून सोनं म्हणून आणखीनच स्वस्तात विकतो. ते स्वस्तात मिळतंय म्हणून गेलात तर तुम्हीच खड्डय़ात पडणार ना?’’ काय करायचं हे आपणच ठरवायचं.

Advertisement

   फक्त ‘लुक्स’मुळे काम मिळालेली मंडळी जेव्हा ‘स्टार’सारखी वागतात ना, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. आपल्या मराठीत ते लोण अजून आलं नाहीये. (चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेल, की मी आतापर्यंत हिंदी मालिका ध्यानात ठेवूनच लिहिते आहे.) चार वाक्यं हसून, रडून, रागानं वगैरे बोलली की झाली ‘अ‍ॅक्टिंग’ असं वाटतं! मालिका आपल्यामुळेच चालली आहे असं भूत डोक्यात शिरतं आणि मग नखरे करायला कितीसा वेळ? अर्थात, टाळी एका हातानं वाजत नाहीच. यात निर्मात्यांचाही दोष आहेच. तुम्हाला चान्स देतोय, म्हणून अठरा अठरा तास राबवून घेतलं की कधी तरी बाहेर पडणारच ना? बरं तब्येती बिघडल्या तरी ‘शो मस्ट गो ऑन’च्या नावाखाली सुट्टीही नाही. मग काय करणार? शिकतात नखरे करायला! आता आता आलेल्या मुलामुलींना जेव्हा घडय़ाळ दाखवून ‘नौ बज गये, मैं जा रही हूँ! (किंवा रहा हूँ) असं म्हणत चालू शॉट सोडून जाताना बघते, तेव्हा वाटतं, आपल्याला करता येईल असं? सीन, शॉट अर्धवट टाकून निघणं? मी एकदा एका असिस्टंटला म्हटलंसुद्धा, ‘‘हमें भी ये सीन बीच में छोड कर जाने का हुनर सीख लेना पडेगा! लगता तो बहुत हैं, पर कर नहीं सकते ना! अच्छा नहीं लगता.’’ तो म्हणाला, ‘‘इसीलिये तो आप इस उमर में भी टिकी हुई हैं, काम कर रहीं हैं ना! इनको देखते हैं दो सालमें कहाँ होंगे.’’ हे सगळं ठीक. पण असं का होतं? एका दिवसात अमुक मिनिटांचं शूट व्हायलाच पाहिजे, नाही तर परवडत नाही, असा एक सूर असतो. मग व्यवस्थित शूट करून छान सीन करणारा दिग्दर्शक आणि कसंही करून दिवसाकाठी ठरावीक ‘मिनिटं’ शूट करून देणारा, यात मिनिटंवाला जिंकतो; पण दर्जा? नेहमीच असं दुष्टचक्र असल्याचा ‘फील’ येतो. म्हणूनच काम करायचं, तर चूपचाप करा, नाही तर बाहेर पडा त्यातून, असं वाटतं.

 पण एक मात्र खरं, आपल्याला काय करायचं आहे ते नक्की माहीत असायला हवं; कोणत्याही क्षेत्रात! आणि आजच्या पिढीला ते माहीत आहे. आजची पिढी बदललेली आहे आणि हे आपण स्वीकारायला हवं. मी नेहमी म्हणते, ते इथेही म्हणीन, आपण आपल्या मुलामुलींमध्ये दुजाभाव ठेवत नाही. वेगवेगळे मार्ग जोखायची संधी देतो. मग अजूनही लग्न झाल्यावर तशीच संधी मुलींना का मिळत नाही? थोडा भार आपण उचलून त्यांनाही करू द्यावं ना त्यांच्या मनासारखं! दोन्ही बाजूंनी हे प्रोत्साहन मिळालं तर मुली काय करू शकतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही.  दुसरं मी विद्यार्थ्यांना सांगेन, शिकताना मन लावून शिका. चूक झाली तर ती सुधारून शिकण्याचा हाच काळ असतो. बाहेरच्या जगात गेल्यावर चुकीला माफी मिळत नाही.

Advertisement

 फार उपदेश देत आहे असं वाटतंय ना? पण बोलल्याशिवाय राहवत नाही. खूप खूप विषय आहेत; पण ‘मी रोहिणी..’मध्ये मी माझ्या या क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल लिहायचं ठरवलं होतं. त्याबद्दलचे समज-गैरसमज, धारणा, कल्पना माझ्या अनुभवांच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केला. वाचकांनी याआधी हे ऐकलं असेल नसेल मला माहीत नाही; पण हे सर्व अनुभव वाचकांच्या समोर ठेवण्याची संधी मला ‘लोकसत्ता’नं दिली त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. वाचकांनीही वेळोवेळी ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष फोन करून मतं माझ्यापर्यंत पोहोचवली. कधी कधी चुकाही लक्षात आणून दिल्या; पण त्यामुळे आपण लिहितोय ते पोहोचत आहे हे समाधानही मिळालं.

आता आणखी एक मनातलं! नाटय़गृहं सुरू झाली आहेत. प्रेक्षक प्रतिसादही देत आहेत. तरीही मनोरंजन क्षेत्राला नेहमी शेवटचा क्रमांक दिला जातो हे अजूनही पचनी पडत नाही. कला- मग ती कोणतीही असो, माणसाला प्रगल्भ बनवते, समाजाला सुसंस्कृत बनवते. अन्न, वस्त्र, निवारा या जरी मूलभूत गरजा असल्या, तरी आपण ‘माणूस’ आहोत. सर्व प्राण्यांत तो वेगळा आहे ते या चौथ्या विशेष गुणामुळे. कला माणसाला माणूस बनवते. ती जोपासायला हवी! बस्स..

Advertisement

(सदर समाप्त)

[email protected]  

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement