मी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची  माँ!रोहिणी हट्टंगडी [email protected]
‘‘गेल्या लेखात ‘हिरो की माँ’ छाप भूमिकांबद्दल लिहिलं, पण या भूमिकांमधलीही मला आवडलेली आणि करताना मजा आलेली भूमिका म्हणजे ‘विजय दीनानाथ चौहान’च्या आईची! अमिताभ बच्चन यांची कोणत्याही भूमिके त वावरण्याची सहजता या वेळी अधिक जवळून दिसलीच, पण के वळ नायक-नायिकाच नव्हे, तर चरित्र अभिनेतासुद्धा विशिष्ट कलाकारच हवा, यासाठी पदराला खार सोसणारा निर्माता आणि सहकलाकाराची सुरक्षितता आपल्याइतकीच महत्त्वाची आहे, अशी ठाम भूमिका घेणारा ‘खलनायक’ मी या चित्रपटाच्या निमित्तानं पाहिला..’’  

Advertisement

आईच्या भूमिका- अर्थात तरुण हिरोंच्या ‘माँ’च्या भूमिका करता करता मी कंटाळले होते, त्या एका काळात मी अशा भूमिका नाकारायचा सपाटाच लावला. माझ्या सेक्रेटरीनं मला ‘प्रेमळ’ सल्ला दिला, ‘‘रोहिणीजी, आप ऐसेही करती रहेंगी तो लोग (म्हणजे ‘प्रोडय़ुसर्स’) भूल जाऐंगे आपको!’’ ही इंडस्ट्रीची आणखी एक वाईट सवय! तुम्ही ‘दिसत’ राहिलं पाहिजे. नाही तर विसरले जाणार तुम्ही. मग तुम्हाला ज्या ‘स्लॉट’मध्ये बसवलं आहे, तो भरायला इतर मंडळी टपलेली असतातच! दहा चित्रपट केले की एखादा चांगला चित्रपट वाटय़ाला येतो, असं अनुभवाअंती लक्षात आलं. म्हटलं, करू या. तसं  तर तसं.

अशा दहा चित्रपटांनंतर आलेला एक चित्रपट म्हणजे ‘अग्निपथ’ (१९९०). चित्रपटाच्या कथेसंदर्भात दिग्दर्शकाबरोबर मीटिंग होती. सेक्रेटरीनंच ठरवलेली. दिग्दर्शक मुकुल आनंद. आधीच्या नाकारलेल्या चित्रपटांमध्ये मुकुल आनंद यांचाही एक चित्रपट होता. मला भेटल्यावर हसून म्हणाले,‘‘आपको तो माँका रोल नहीं करना था ना?’’ त्यांच्या खोचकपणाला मीही हसून म्हटलं, ‘‘हाँ! आज भी, रोल सुनूंगी फिर तय करुंगी!’’ असो. त्यांनी कथा, भूमिका सांगितली. आवडली. त्या वेळी साधारण अमिताभचा सिनेमा म्हणजे हिरो, हिरोईन आणि व्हिलन याव्यतिरिक्त कुणाला कामच नसायचं त्या चित्रपटात. पण या कथेत अगदी ऐकतानासुद्धा प्रत्येक पात्र लक्षात राहिलं.

Advertisement

यश जोहर निर्माते होते. चित्रपटात कोण कोण होतं हे काही नव्यानं सांगायला नको. ठरलं. चित्रीकरणाच्या तारखा मिळाल्या. पण पहिल्याच दिवशी प्रॉब्लेम झाला.. यासाठी थोडं मागे जायला लागेल. त्यापूर्वी वर्षभर माझ्या सासूबाई कर्क रोगानं आजारी होत्या. पण काम सोडून घरी बसणं शक्य नव्हतं. मग आलटून पालटून मी आणि जयदेव (जयदेव हट्टंगडी) काम करत होतो. जयदेवनं मुंबईबाहेरचं काम घेतलं होतं आणि मी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’साठीच्या नाटकाच्या दौऱ्यावर होते. मी मुंबईत पोहोचले की तो निघणार, असं ठरलं होतं. तो २०-२५ दिवस बाहेर असणार होता. तो निघाला आणि दुसऱ्याच दिवशी सासूबाईंची तब्येत बिघडली. कुठल्याच औषधांचा परिणाम होत नव्हता. डॉक्टरांनी सांगितलं, की आता फक्त वाट बघणं आपल्या हाती आहे. जयदेव परत यायला निघाला, पण तो येऊनही बघत बसण्यापलीकडे काही करू शकणार नव्हता. अशा परिस्थितीत नर्सिग होमदेखील नकार देतात अ‍ॅडमिट करून घ्यायला. त्यामुळे सासूबाई घरीच होत्या. त्यांच्यासाठी परिचारिका ठेवली होती, पण त्यांना असं सोडून मला ‘अग्निपथ’च्या चित्रीकरणाला जाणं शक्यच नव्हतं. मी तसं कळवलं. म्हटलं, ही भूमिका आपल्या नशिबात नाही असं समजायचं. दुसऱ्या दिवशी स्वत: यश जोहर घरी येऊन गेले. कधी चित्रीकरण करू शकेन या त्यांच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं. दोन दिवसांनी मला सेकट्ररीतर्फे  निरोप आला, ‘‘रोहिणीजीसे कहना हम रुके हैं! वेट कर रहे हैं!’’ आठ दिवसांनी माझ्या सासूबाई गेल्या. त्या गेल्याच्या पाचव्या दिवशी मी चित्रीकरणाला हजर झाले होते.

घरात काही समस्या, आजारपणं असताना काम चालू ठेवणाऱ्यांची काही कमी उदाहरणं नाहीत या क्षेत्रात. ‘शो मस्ट गो ऑन’ हे सर्वाना माहिती आहे. पण या प्रसंगात यशजींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी विसरू शकत नाही. एखादा सेट लावून दहा-बारा दिवस वाट पाहाणं, तेही हिरो किंवा हिरॉईन नाही, तर सहाय्यक पात्रासाठी. सेट असा उभा ठेवणं म्हणजे तितकाच खर्च, शिवाय अख्खं वेळापत्रक हलतं, सगळ्यांकडे तारखांसाठी विनंत्या.. चित्रपटसृष्टीत एखादी गोष्ट पसरायला वेळ नाही लागत. ‘क्यूँ इतना बोझ उठा रहे हैं?’, ‘रिप्लेस कर सकते हैं’ असे सल्ले. या सगळ्याला तोंड द्यायचं आणि नुकसानही सहन करायचं, हे खायचं काम नाही बरं! बऱ्याच  दिवसांनी मी यशजींना याबद्दल विचारलं, तर म्हणाले,‘‘मुझे एक अच्छी फिल्म बनानी हैं रोहिणीजी!’’ असे निर्माते असताना का नाही बनणार चांगला चित्रपट?

Advertisement

नुकसानीच्या बाबतीतला आणखी एक प्रसंग. आमचं ‘अग्निपथ’चं चित्रीकरण गोव्याला चालू होतं आणि गावाचा सेट लावला होता. गावाच्या एका टोकाला खलनायक ‘कांचा चीना’ची हवेली. साफसुथरं गाव, हवेली पण चकाचक. मुकुल आनंदना हेच नको होतं. गावाची स्थिती जेव्हा चांगली आहे, तेव्हा हवेलीची स्थिती वाईट हवी. म्हणजे ‘मास्टर दीनानाथ चौहान’ (म्हणजे चित्रपटातले अमिताभचे- अर्थात ‘विजय’चे वडील) हयात असतात तेव्हा; विजयच्या लहानपणी. आणि त्यानंतर गाव जेव्हा कांचा चीनाच्या हातात जातं, तेव्हा गावात दारूचे गुत्ते, जुगाराचे अड्डे असतील आणि त्या वेळी हवेली मात्र चकाचक हवी. आमचं विजयच्या लहानपणाच्या वेळचं चित्रीकरण व्हायचं होतं. त्यामुळे हवेली रंग उडालेली हवी होती. मग सेटवाले त्या कपडय़ाच्या भिंतींवरचा रंग उडवायला त्यावर लाकडी पट्टय़ांनी बडवत होते. छोटय़ा विजयचं काम करणाऱ्या मंजुनाथनं ते बघून विचारलं, ‘‘ये लोग क्या कर रहे हैं?’’ कोणी उत्तर द्यायच्या आधीच यशजी म्हणाले, ‘‘बेटे, वो मेरी पिटाई कर रहे हैं!’’ खर्चच खर्च. म्हणजे निर्मात्याची पिटाई!

अमितजींबरोबर मी आधी एका चित्रपटात काम केलं होतं- ‘शहेनशहा’मध्ये. त्यामुळे तेवढं दडपण नव्हतं. अर्थात चांगला अभिनेता समोर असेल तर मजाच येते काम करायला. अगदी पहिल्याच प्रसंगापासून व्यक्तिरेखेवर पकड मिळाली. मी- म्हणजे सुहासिनी चौहान वर्गात शिकवत असते आणि विजयला (तिच्या मुलाला) गोळी लागल्याची बातमी येते. वरकरणी चेहऱ्यावर काहीही फरक न दाखवता ती शिकवणं पुढे चालू ठेवते, पण आतून हललेली आहे. आपल्या मुलाचं वागणं, त्याचा व्यवहार तिला पसंत नाही. या चित्रपटात माझा गेटअप तरुण असतानाचा ठरला होता, पण नंतरचा, वयस्कही त्याच पठडीतला ठेवला होता- मध्यमवर्गीय. त्या गेटअपमध्ये एक प्रसंग चित्रीतही झाला. कृष्णन् अय्यर (मिथुन चक्रवर्तीनं साकारलेली भूमिका- शेजारचा फोटो) आपले पैसे मागायला रुग्णालयात जातो, तेव्हा विजयच्या आईशी त्याची भेट होते. अचानक एक दिवस मला फोन आला, मुकुलजींनी तुम्हाला ‘एडिटिंग रूम’मध्ये बोलावलं आहे. मला आश्चर्य वाटलं.तर त्यांनी मला तोच प्रसंग एडिट केलेला दाखवला आणि म्हणाले, की ‘हा जो तुझा गेटअप केला आहे, तो खूप ‘सोफेस्टिकेटेड’ वाटतो आहे. गेटअपमध्ये मला एक ‘कॅरॅक्टर’ हवी आहे. काय करता येईल?’ मग चर्चा करताना असं लक्षात आलं, की सुहासिनी आणि दीनानाथ हे जोडपं स्वातंत्र्य मिळण्याआधीचं असेल तर त्यांनीही इतरांप्रमाणे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला असेल, त्याचा परिणाम खादी वापरण्यात झाला असेल. ठरलं, खादीची साडी, लांब बाह्य़ांचं ब्लाउज आणि गोल चष्मा. गोल चष्मा मला टाळायचा होता. म्हटलं, परत ‘बा’सारखंच वाटेल. पण सर्वाचाच आग्रह दिसला आणि मी गप्प बसले. पुढच्या चित्रीकरणाच्या तारखेला तो गेटअप केला आणि मुकुलजींसमोर उभी राहिले. त्यांनी क्षणभर बघितलं, आपल्या दोन्ही हातांनी माझे व्यवस्थित विंचरून अंबाडा घातलेले केस विस्कटले आणि म्हणाले, ‘‘हाँ! अब ठीक हैं।’’ वेशभूषेमुळे व्यक्तिरेखेला वेगळे पैलू मिळतात आणि अर्धी लढाई आपण जिंकतो. व्यक्तिरेखा विश्वासार्ह होते. विजय दीनानाथ चौहान म्हणून अमितजी खूप मनापासून मेहनत घेत आहेत असं दिसत होतं. त्यांचं चालणं, बोलणं, डोळ्यातलं काजळ- (सुरमा म्हणू या हवं तर).. बोलण्यावरून आठवलं. अमितजींनी आपला आवाज या भूमिकेसाठी बदललेला होता. आवाजात एक प्रकारची खर आणली होती. ‘हस्की’ म्हणतो ना, तसा आवाज लावला होता- अगदी भूमिकेला शोभणारा. म्हटलं व्वा! पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना ‘अमिताभ बच्चन’च्या आवाजाची कमी जाणवत होती, म्हणून त्यांच्या ‘ओरिजिनल’ आवाजात परत डबिंग झालं. एक दिवस चित्रीकरण चालू असताना मी त्यांना सहज म्हटलं, ‘‘आप के साथ मैंने ‘शहेनशाह’ फिल्म की हैं, वहाँ जो आप थे औंर आज आप जो कर रहे हैं, जमीन-आसमान का फर्क दिख रहा हैं!’’ तर म्हणाले, ‘‘रोहिणीजी, वो फन फिल्म थी. वहाँ मनोरंजन करना था. मैं चाहता हूँ यह फिल्म दर्शक कुर्सीपर जरा आगे आके देखें!’’

Advertisement

चित्रपटाच्या प्रकृतीनुसार काम करणारा हा अभिनेता. खरं सांगू, मला अमितजींचे दोन चित्रपट बिलकुल आवडलेले नाहीत. एक ‘जादूगर’ आणि दुसरा ‘तुफान’. हा एवढा मोठा अभिनेता कसे काय असे चित्रपट घेतो आणि करतो? का ‘मेरे अंगने में’सारखी गाणी करतो?..

(हे माझ्याबाबतीत नंतर ‘चालबाज’च्या वेळी लोकांनी म्हटलं असेल!) पण हे समजायला इतकी वर्ष जावी लागली. बऱ्याच वेळी नाइलाज असतो, काही बंधनं (ऑब्लिगेशन्स) असतात, कधी कधी चित्रपटच फसतो.. अनेक कारणं असतात. पण हा अभिनेता (अमिताभ बच्चन) इतक्या वाईट चित्रपटांमध्येही ज्या समर्पण भावनेनं काम करतो, त्या भूमिका इतक्या पटणाऱ्या करतो, त्याला तोड नाही. त्याला सॅल्यूट करायला हवा! कुठलीही भूमिका असो, हातचं राखून नाही करणार. ग्रेट!

Advertisement

‘अग्निपथ’चा शेवटचा प्रसंग जन्मभर लक्षात राहील असा होता. ज्या दिवशी सीन शूट करायचा होता, त्याच्या आदल्या दिवशी मुकुलजी, यशजी, अमितजी, डॅनीजी (डॅनी डँझोंग्पा- अर्थात या चित्रपटातील खलनायक ‘कांचा चीना’), प्रवीण भट (आमचे कॅमेरामन) आणि मी अशी छोटीशी मीटिंग झाली. दुसऱ्या दिवशीचा सीन वाचला, ‘शॉट बाय शॉट’ प्लॅनिंग केलं. बरंच काय काय घडणार होतं त्या प्रसंगात. बॉम्बस्फोट, आग, असं बरंच. शिवाय तो भावनाप्रधान प्रसंग होता. अमितजींनी तो आधीच वाचला होता. ते म्हणाले, ‘‘मी हा सीन परत लिहून आणला आहे.’’ खरंतर त्या सीनमध्ये फक्त तेच बोलतात. ‘या माणसाला गोळ्या लागल्या आहेत. तो मरणाच्या दारात आहे. तो इथं लिहिलंय इतकं सुसंबद्ध नाही बोलणार,’ असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी सीन वाचून दाखवला. मग मुकुलजींनी मला विचारलं, ‘‘आईच्या मांडीवर विजयनं प्राण सोडल्यावर तू काय बोलशील?’’ म्हटलं, ‘‘एवढय़ा भयानक अनुभवातून गेल्यावर ती काही बोलूच शकणार नाही. मूक रुदन असेल तिचं!’’ पण त्यांना एखादं तरी वाक्य हवं होतं, जे मिथुनच्या व्यक्तीरेखेची ‘एन्ट्री’ झाल्यानंतर ती त्याला बोलू शकेल. ‘मेरा बेटा गुंडा नही था’ हे ते वाक्य!

मला त्या सीनबरोबरच बॉम्बस्फोटांचीही उत्सुकता होती. प्रथमच बघणार होते ना! प्लॅस्टिकच्या पिशवीत पेट्रोल भरून त्याला इलेक्ट्रिक करंट देऊन स्फोट करतात. एक लिटर, दोन लिटरचे वगैरे. किती जोरात धमाका होईल, कुठपर्यंत त्याचा जोर असेल, मला काहीच कल्पना नव्हती. सुरुवातीला डॅनीजी मला खेचत आणतात अध्र्या रस्त्यापर्यंत. नंतर स्फोटांना सुरुवात. पहिला स्फोट झाला. मी आणि डॅनीजी पंधरा वीस फुटावर होतो. तिथपर्यंत झळ पोहोचली. मनातल्या मनात म्हटलं, बाप रे.. असे किती असणार आहेत! नंतर डॅनीजींना- म्हणजे कांचा चीनाला मारल्यावर अमितजी मला हाताला धरून आपल्या घराकडे नेतात असा पुढचा सीन. या सीनसाठी अमिताभ आणि डॅनीजींसाठी ‘बॉडी डबल’ (डुप्लिकेट) मंडळी आणली होती. म्हणजे त्यांच्यासारखेच कपडे घालून स्टंटमेन होते. एक शॉट आजूबाजूला स्फोट होतायत आणि डॅनीजी मला पकडून नेतायत असा होता. डॅनीजींचा डुप्लिकेट शॉटमध्ये आणि मी. डॅनीजींच्या हे लक्षात आलं. ते म्हणाले, ‘‘या तुमच्या मते डेंजरस शॉटसाठी माझा डुप्लिकेट आहे, मग रोहिणीजींची का नाही? रोहिणीजींचीसुद्धा डुप्लिकेट शॉट मध्ये वापरा. रोहिणीजी, आईए यहाँ बैठिये.’’ थांबलंच ना शूट! बरं, स्टंटसाठी कोणी मुलगीही आणली नव्हती. एरवी मुलीही स्टंटस् करतात. आता गोव्यात ऐनवेळी कुठून आणायची? मग युनिटमधल्याच एकाला साडी नेसवली आणि केलं उभं! डॅनीजींची ही दिलदारी कायमची लक्षात राहिली.

Advertisement

एकेका चित्रपटातून अनुभव येत होते, शिकत होते, संपन्न होत होते. या भूमिके साठी ‘फिल्मफेअर’चं पारितोषिक मिळालं. त्याचं श्रेय जातं या सगळ्यांना आणि मुख्य म्हणजे माझ्यासाठी दहा दिवस थांबणाऱ्या यशजींना. थँक्यू यशजी!

The post मी, रोहिणी.. : ‘विजय दीनानाथ चौहान’ची  माँ! appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement