मी, रोहिणी.. : अनुभव शिकवणारे..जगवणारे..रोहिणी हट्टंगडी

Advertisement

‘आपल्याला अगदी रोज लोकांचे विविध अनुभव येत असतात. कधी मनात ठरवलेल्या तमाम गोष्टी धुळीला मिळतात आणि काही तरी तिसरंच घडतं, तर कधी जे घडतंय त्याचा त्रास होऊन प्रचंड रागही येतो; पण असे सगळेच अनुभव फु कट जातात का? माझ्याही चित्रपट करिअरमध्ये असे अनेक प्रसंग आले; पण त्या-त्या वेळी अप्रिय वाटलेल्या त्या गोष्टींनीच धडा शिकवला आणि मनाशी एकेक खूणगाठ बांधत गेले.’

आपण ठरवतो एक आणि होतं तिसरंच! आलाय ना अनुभव? कधी आपण ते ‘ईश्वरेच्छा बलियसी’ म्हणून स्वीकारतो आणि कधी ती इच्छा मनात ठेवून पूर्ण व्हायची वाट बघतो. मला व्हायचं होतं डॉक्टर! त्यासाठी रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र असे विषयही निवडले होते. पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला. पुण्याबाहेर पाठवायला तेव्हा माझे वडील तयार नव्हते. त्यामुळे ‘बी.एस्सी.’ झाले. नोकरीच्या शोधात असतानाच नाटय़शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. ती मिळाली आणि राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात (एन.एस.डी.) गेले. त्यानंतर मात्र ठरवलं की मला याच क्षेत्रात काम करायचं आहे.

Advertisement

आपसूक नाटकापासूनच सुरुवात झाली; पण नंतर फक्त रंगभूमीच नाही, तर इतरही माध्यमांतून काम केलं. कधी संधी मिळाली ती घेतली, कधी योगायोग जुळून आला. ‘अ‍ॅम्बिशन्स’ होत्या. (खरं सांगू, ‘महत्त्वाकांक्षा’ फार मोठा शब्द वाटतो मला. जसा ‘सॉरी’ आणि ‘क्षमा करा’मधला आपल्या मनातला फरक!) पण त्याचं ओझं बाळगलं नाही. काम करत राहणं हाच विचार मनात ठेवला. करून तर बघू, रुचलं, जमलं, तर ठीक; नाही तर दिलं सोडून. जमलं नाही तर ‘का नाही जमलं?’ असं स्वत:चं विश्लेषण करायला लागले आणि त्यातूनच हळूहळू मार्ग निघत गेला. स्वत:चं काम मन लावून केलं, तर आपल्याला आनंदही मिळतो आणि समाधानही. आपलं उद्दिष्ट गाठता आलं याचं  समाधान. आणि मनापासून केलेलं काम लक्षातही राहतं. या माणसावर आपण जबाबदारी टाकली की ती व्यवस्थित पार पडेल, असा विश्वास समोरच्याला वाटतो. पुढच्या गोष्टी आपोआप घडत जातात. मग त्या आपल्या इच्छेप्रमाणे वळवून घ्यायचं काम आपलं. ते गौण नाही. नसतंच; पण आधीपासूनच त्याला अवाजवी महत्त्व देणं हेही बरोबर नाही!

माझ्या आजपर्यंतच्या प्रवासात सगळंच मनासारखं झालं असं नाही. काही वेळा हातात आलेलं कामही सुटलं. दोनदा. एक नाटक आणि एक चित्रपट. काम हातून गेलं याचं वाईट वाटलं; पण जास्त वाईट वाटलं ते मला त्याविषयी अंधारात ठेवलं गेलं त्याचं.

Advertisement

  खूप वर्ष झाली त्याला. एक होतकरू दिग्दर्शक मला एका मित्राकरवी निरोप पाठवतो,‘तुम्हाला एक नाटक वाचून दाखवायचं आहे. आवडलं तर त्यात काम कराल का?’ मग फक्त तो मित्र, दिग्दर्शक आणि मी असं एकत्रित वाचन के लं. अतिशय सुंदर नाटक. मला दिग्दर्शक सांगतो, ‘यात स्त्रियांच्या दोन्ही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मुलीची भूमिका करायला मी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला विचारणार आहे. ती हो म्हणाली, तर आईची भूमिका तुम्ही करायची. नाही म्हणाली, तर तुम्ही निवडाल ती!’ मला कोणतीही चालली असती, कारण दोन्ही अप्रतिम होत्या. मी होकार दिला. मी वाट बघत होते आणि अचानक एके दिवशी कळलं, की त्या नाटकाचा मुहूर्त झालाय आणि तालमी सुरू होणार आहेत. ती सुप्रसिद्ध अभिनेत्री तर काम करणार होतीच, पण दुसरी माझ्यापेक्षा ‘सीनिअर’ आणि जास्त प्रसिद्ध अभिनेत्रीही त्यात असणार होती. ती नावं कळल्यावर त्या दिग्दर्शकासाठी नावं जास्त महत्त्वाची होती आणि मुंबईत जम बसवण्यासाठी त्यानं हे केलं असेल, हे माझ्या लक्षात आलं. कारण तेव्हा मीसुद्धा ‘स्ट्रगलिंग’च करत होते; पण आपण कोणाशी तरी बोलून ठेवलंय हेही विसरला तो? नाटक अतिशय सुंदर झालं. सगळ्यांची कामं छान झाली. त्यानंतरही बरेच दिवस मी वाट बघितली, की कधी तरी निरोप मिळेल, कधी तरी बोलेल! पण नाहीच! एका शब्दानं कळवायचं, की ‘सॉरी. असं असं झालं आणि माझे हात बांधले होते!’

  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एका मोठय़ा दिग्दर्शकाच्या बाबतीतही हाच अनुभव आला. मोठा, बिग बजेट चित्रपट होता, सगळे ‘स्टार्स’ होते त्यात. भूमिका ठरली, पैसे ठरले, तारखाही मिळाल्या. शूटिंगची तारीख जवळ आली, पण काहीच हालचाल दिसेना आणि एक दिवस माझी सेक्रेटरी सांगत आली, की मला दिलेला आईचा रोल पूर्वीची एक मोठी हिरॉइन करते आहे. माझ्या सेक्रेटरीनं त्या निर्मात्या-दिग्दर्शकाला विचारलंही. तर उत्तर मिळालं, ‘मैंने मजाक में पूछा उसे और उसने हाँ भरी, तो उसको वो रोल देना पडा! रोहिणीजी को सॉरी बोलना.’ इतका राग आला होता मला! मोठी माणसं ती, पण साधं कळवण्याची तसदीही घेतली नाही. इतकं संवेदनाहीन कुणी असू शकतं? (मनात आलं होतं, कुठे हे आणि कुठे सर रिचर्ड! त्यांनी तर स्क्रीन टेस्टमध्ये निवड झाली नाही, असं स्वत: पत्र लिहून कळवलं इतरांना आणि हे बघा!) नंतर माझ्याच समाधानासाठी मी सेक्रेटरीला बजावलं, की यापुढे त्यांच्याकडे कामासाठी माझं नाव सांगायचं नाही. अर्थात, ना त्यांना काही फरक पडला आणि माझंही काही अडलं नाही; पण त्यांच्याकडे शेवटपर्यंत काम केलं नाही. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना काही गोष्टी पक्कय़ा मनात ठसल्या. तुमची गरज असेल तर तुम्हाला पाताळातूनही शोधून काढलं जातं, नाही तर समोर असूनही तुम्ही दिसत नाही. इथे जशी एका रात्रीत प्रसिद्धी मिळते, तसंच एका रात्रीत होत्याचं नव्हतं होऊ शकतं, तशीच मनाची तयारी ठेवावी लागते. काम नसतानाची बेगमी करून ठेवावी लागते. संयम महत्त्वाचा. काम आलं की भरभरून येणार.. कुठलं घेऊ आणि कुठलं सोडू असं वाटणार. ती निवड हुशारीनं करायची आणि सोडलेल्या कामाबद्दल खंत नाही बाळगायची. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, हे आधी माहीत असेल, ठरवलं असेल, तर सोपं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘कमिटमेंट’- दिलेला शब्द पाळणं. नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी एकाच वेळी चालू असताना ही कसरत यामुळे सोपी झाली. कधी नाटकाच्या दौऱ्यामुळे चित्रपट सोडावा लागला तरी वाईट नाही वाटलं; पण हे माझ्या सेक्रेटरीला समजावून देताना मात्र दोन वर्ष लागली! फिल्ममध्ये जास्त कमाई असूनही ती सोडून नाटकं करायची, हे तिच्या पचनीच पडत नव्हतं! असो! सगळं ठरवूनही चित्रपट सुरूच न होणं, झाला तरी मध्येच बंद पडणं, सगळं व्यवस्थित होऊन चित्रपट तयार होऊनही तो डब्यात जाणं.. अशा अनेक गोष्टी आणि चित्रपट प्रदर्शित झाला, तरी तो चालायला हवा ना! हे आणखी एक!.. सहजच एक आठवलं, आमचे डॉ. श्रीराम लागूंबरोबरचे ‘कस्तुरीमृग’चे प्रयोग चालू होते. तेव्हा डॉक्टर हिंदी चित्रपटात फारच बिझी  झाले होते. त्यांचा ऋषी कपूरबरोबरचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता- ‘रंगीला रतन’. आमच्या कुठल्या तरी एका दौऱ्यावर, एका गावात तो चित्रपट लागला होता. आमचा प्रयोग रात्री असायचा. त्यामुळे आम्ही दिवसभर मोकळे. मग ठरलं, की दुपारच्या शोला जायचं. फार काही ग्रेट नव्हता चित्रपट; पण आम्ही डॉक्टरांना बघायला गेलो होतो. चित्रपट सुरू झाला. पहिल्याच प्रसंगात त्यांचा समुद्रकिनारी खून होतो आणि त्यांची ‘लाश’ पाण्यावर तरंगते आहे ते त्यांचा मुलगा बघतो- तो ऋषी कपूर! आणि टायटल्स चालू! नंतर पूर्ण चित्रपटात अगदी एखाद्या ‘फ्लॅशबॅक’च्या सीनमध्ये असतील. बाकी ती तरंगणारी लाश परत परत हिरोला दिसत राहते! तो चित्रपट बघणाऱ्या आमच्या उत्साहावर पाणीच. परत येताना कोणी तरी गमतीनं म्हणालं, ‘बघा, डॉक्टरांचा ‘टायटल रोल’ होता की नाही!’ डॉक्टरांच्या कानावर हे गेलं असणारच; पण न रागावता, न चिडता कर्मयोग्यासारखं काम करणं त्यांना माहिती. आपण नक्की काय करतोय हे माहीत असल्यानंतर असा शांतपणा येतो का? तिथे चित्रपटात पैसा कमवायचा आणि इथे आपल्याला हवं तसं रंगभूमीवर नाटक करायचं, हे त्यांचं म्हणणं मला आवडलंच! आणखी एका ‘पोंगा पंडित’ या चित्रपटात बिंदू या अभिनेत्रीबरोबर त्यांचं काम होतं. तिचं आणि निर्मात्याचं भांडण झालं. त्यांनी तिचा रोल कापला आणि त्याबरोबर डॉक्टर लागूंच्याही रोलला कात्री लागली. व्यावसायिक हिंदी चित्रपटांकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या? तिथे अळवावरच्या पाण्यासारखं राहायचं. डॉक्टरांसारख्या अभिनेत्याबरोबर हे असं होऊ शकतं, हे इंडस्ट्रीमध्ये काम सुरू करण्याआधीच मी बघत होते. तयारी होत होती; पण स्वत: अनुभवलं तरच शहाणपण येतं.

Advertisement

या फिल्मवाल्यांची ‘टर्मिनॉलॉजी’ (म्हणजे वापरायचे शब्द) काही वेगळीच असते. एक चित्रपट ‘साइन’ केला होता. कुमार गौरव, रती अग्निहोत्री हे हिरो-हिरॉइन. कुमार गौरवचे आई-वडील म्हणून संजीव कुमार आणि मी. मी जाम आनंदात होते, संजीव कुमारबरोबर काम करायला मिळणार म्हणून. सगळं ठरलं, आता तारखांची वाट बघत होते. माझं दुसरं एक काम निघालं म्हणून मी त्या व्यक्तीला फोन केला. तर त्यांनी म्हटलं, ‘‘हम ये फिल्म नहीं कर रहे. अभी मीटिंग हुई!’’ मी विचारलं, ‘‘क्यूँ? क्या हुआ?’’ तर म्हणाले, ‘‘वो.. जी.. वो कुमार गौरव बैठ गया ना.’’ मी विचार करत राहिले, की म्हणजे काय? मग कळलं, कुमार गौरवचा पहिला चित्रपट तुफान चालला, पण नंतरचे तीन-चार चित्रपट फ्लॉप झाले. त्याचं ‘मार्केट’ खाली गेलं. त्याचा परिणाम म्हणून त्याला घेऊन आखणी केलेल्या सगळ्या फिल्म्स बंद. तो ‘बैठ गया’ तर उठायची संधीही दिली नाही त्याला! हिरो-हिरॉइनचं आयुष्यसुद्धा फार सोपं नसतं. आहे त्या जागेवर टिकून राहणं मोठं जिकिरीचं काम. टिकून राहण्याचे प्रत्येकाचे प्रयत्न वेगवेगळे. कोणी भारंभार चित्रपट घेतात, तर कोणी मोजके च. एक वेळ अशी होती, की अभिनेता गोविंदा इतका ‘डिमांड’मध्ये होता, की तो शिफ्टमध्ये नाही, तर तासांवर काम करायचा. सेटवर उशिरा पोहोचायचा. चित्रीकरण थांबलेलं असायचं. या त्याच्या वागणुकीनं निर्माते-दिग्दर्शक हैराण असायचे. आता कोणता चित्रपट ते आठवत नाही, (आणि आठवूनही उपयोग नाही, कारण तो चित्रपट पूर्णच झाला नाही.) तर त्याच्या चित्रीकरणात एके दिवशी सगळ्या कलाकारांचा मिळून एक सीन होता. आम्ही सगळे कलाकार तयार, त्याची वाट बघत. वाट बघणाऱ्यांत कोण?  तर शम्मी कपूर, हेमा मालिनी! ४ वाजता येणार, म्हणून सांगून तो आला ७ वाजता. तयार होऊन त्यानं सेटवर पाऊल टाकलं आणि दिग्दर्शक जोरात म्हणाला, ‘पॅकअप’! सेटवरून जाताना तो सर्वाना kIt’s pack up! sorry to keep you waiting’ असं म्हणत निघून गेला. आम्ही एकमेकांचे चेहरे बघत राहिलो, त्या दिग्दर्शकाच्या धाडसाचं मनातल्या मनात कौतुक करत! फिल्म डब्यात गेली हे सांगायला नकोच. हा धाडसी दिग्दर्शक होता शशिलाल नायर.

 असतात अशा छोटय़ा छोटय़ा घटना. त्यातून काय शिकायचं, घ्यायचं, किती आणि काय धरून ठेवायचं आणि किती आणि काय सोडून द्यायचं, ते आपण ठरवायचं. चांगले, वाईट अनुभव एक धडा घेऊन सोडून दिले. आता काय फरक पडणार त्याचं ओझं बाळगून? कोणाचं तरी बघून त्या मार्गानं जाण्यापेक्षा, त्यांना आलेले अनुभव लक्षात ठेवून, आपला मार्ग आपणच निवडावा; पण हे कळायलाही मी वयाची सत्तरी गाठली, त्याचं  काय?.. बघा बुवा! hattangadyrohini@gmail.com

Advertisement

The post मी, रोहिणी.. : अनुभव शिकवणारे..जगवणारे.. appeared first on Loksatta.Source link

Advertisement