नागपूर29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आपल्याला आजही जून्या काळची गाणी ऐकायला चांगली वाटतात. माझ्या कानात 1900 गाणी रूंजी घालतात. कारण तेव्हा गाणे सहज आणि सोपे होते. आताचे गाणे गुंतागुंतीचे आणि अवघड झाले आहे. तशातच मायक्रोफोनमुळे गाणे खूप बदलले आहे असे स्पष्ट बोल ख्यातनाम शास्त्रीय गायीका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी येथे ऐकवले. षष्टब्दीपूर्तीनिमित्त आरती अंकलीकर-टिकेकर यांची प्रकट मुलाखत वृषाली देशपांडे आणि साधना शिलेदार यांनी घेतली. या मुलाखतीत अंकलीकर यांनी आपल्या गान प्रवासाचे विविध टप्पे उलगडले. सिव्हिल लाईन येथील टॅमरिड सभागृहात आयोजत कार्यक्रमात तत्पूर्वी आरती अंकलीकर-टिकेकर यांचा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पूर्वीची गाणी आजही ऐकायला चांगली वाटतात. तेव्हा निकोप शुद्ध लगाव होता. विशेष म्हणजे मायक्रोफोन नव्हते. आता मायक्रोफोनमुळे गाणे खूप बदलले आहे. मायक्रोफोन खूप सुक्ष्म आवाजही ऐकू येतात. हे सर्व लक्षात ठेवून गावे लागते असे अंकलीकर यांनी सांगितले. गाण्यात प्रयोग म्हणून काही गोष्टी करणे आणि तेच ते करीत राहाणे यात खूप फरक आहे. म्हणून मी माझे पारंपरिक गाणे गात राहाते. आणि तेच मला आवडते असे अंकलीकर म्हणाल्या. शास्त्रीयसोबतच उपशास्त्रीय, सुगम संगीत आणि चित्रपटासाठीही मी गाणी गायले. कारण मला कोणतीहे गाणे कधी दुय्यम वाटले नाही. मी कधीही जाणीवपूर्वक गाणे गात नाही. कारण त्यात सहजता राहात नाही. जाणिवेशिवाय गायलेले गाणे सहज व प्रवाही होऊन जाते. नवीन गायकांनी आपल्या आवाजात आपल्या शैलीतच गावे असा सल्लाही अंकलीकर यांनी दिला.
तत्पूर्वी सत्कार कार्यक्रमात बोलताना महेश एलकुंचवार यांनी गाणारी माणसे जिथे पोहोचतात तिथे लेखकांना कधीही पोहोचता येत नाही असे सांगितले. संगीत ही परिपूर्ण कला आहे. ती अज्ञात, शाश्वत आणि चिरंतनाची जाणिव करून देते. गायकाचा आंतरिक प्रवास साठी नंतरच सुरू होतो असे एलकुंचवार यांनी सांगितले. यावेळी पंडित उल्हास कशाळकर, पंडित सुरेश तळवलकर यांनी मनोगत व्यक्त केले.