जळगाव41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लाठ्या काठ्या अंगावर घ्या, जेलमध्ये जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा. मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीसमोर आडवे व्हा. रस्त्यावर उतरुन कामे करा, तरच लोक तुम्हाला साथ देतील, असा अजब सल्ला माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांनी युवा काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला आहे. ते जळगाव येथे बोलत होते.
जळगावमध्ये युवक काँग्रेसच्या संवाद मेळाव्याचो आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी बोलताना कुणाल राऊत यांनी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीवर हल्ला चढवला. राज्यात काँग्रेस पक्षाची जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे त्याला आपणच जबाबदार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
नेमके काय म्हणाले राऊत?
यावेळी पुढे बोलताना कुणाल राऊत म्हणाले, लोकांमध्ये जा, लोकांची कामे करा. कामे केली तरच लोक तुमच्या मागे येतील. लोकांच्या कामाला प्राधान्य द्या. रेल्वे गाड्या थांबवायच्या असतील तर त्या थांबवा, मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवा, तिच्यासमोर आडवे व्हा. लाठ्या काठ्या अंगावर घ्या, तुमचे हात तुटो, पाय तुटो, जेल जा, वेळ पडलीच तर भाजपचे कार्यालय फोडा, रस्त्यावर उतरुन कामे करा, तर लोक तुम्हाला साथ देतील. तुम्ही हिरो झाल्याशिवाय लोक तुमच्या मागे येणार नाहीत.
आक्रमक व्हा
काँगेस पक्षाच्या मागे लोक नाहीत असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला कारण आपणच आपल्या कामात कमी पडलो आहोत. लोकांच्या कामासाठी आपल्याला आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. जसे आतापर्यंत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी आंदोलने केली आहेत. दिल्लीत जाऊनसुद्धा रेल्वे रोको आंदोलन केले आहे. तसेच आक्रमक महाराष्ट्रातही युवा कार्यकर्त्यांनी व्हायला हवे. असे राऊत म्हणाले.
कोण आहे कुणाल राऊत?
कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. संकल्प या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.