डॉ. शुभांगी पारकर
विवाह झाला याचा अर्थ परस्परांमध्ये प्रामाणिकपणा असल्याची खात्री मिळाली का? वैवाहिक नातं केवळ प्रेमावर नव्हे, तर विश्वासावर उभं राहतं. त्यालाच तडा गेला तर एका जोडीदाराच्या मनातली आपल्या सहचराविषयीची प्रतिमा कायमची डागाळू शकते. इतकंच नव्हे, तर त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानालाही जबर धक्का पोहोचतो. काही नात्यांत याचे फार विचित्र परिणाम कुटुंबांना भोगावे लागतात.. तो विश्वास‘घात’ जिव्हारी लागतो.. कसा ते सांगणारा भाग पहिला..
यशस्वी विवाहाची रहस्यं काय असतात हा सगळय़ा लग्न झालेल्या जोडप्यांना पडलेला प्रश्न असतो. आपल्यापेक्षा दुसरं जोडपं जास्त आनंदी आहे याची जवळजवळ सगळय़ांना नंतर नंतर खात्री पटत जाते.
हल्ली लग्नाच्या निमंत्रणपत्रिकांवर सुंदर संदेश छापलेले आढळतात. ‘विवाह हे दोन जीवांचं, दोघांच्या प्रीतीचं सुंदर बंधन आहे. आम्ही आमची प्रेमकहाणी प्रियजनांच्या साक्षीनं मूर्त स्वरूपात उतरवत आहोत, तेव्हा या आनंदी प्रसंगी आपण आपल्या प्रियजनांसोबत येऊन आमचा विवाह सोहळा सर्वाच्या आशीर्वादानं संपन्न करावा.’ ‘ऋणानुबंध अखंड राहो’ असं म्हणून हा विवाह सोहळा श्री गणेशाच्या कृपेनं, तुळजामातेच्या आशीर्वादानं, दत्त कृपेनं, ग्रामदेवतेच्या किंवा कुलदैवताच्या आशीर्वादानं सजत असतो. अनेक धार्मिक विधी तो संसार सुखानं व्हावा यासाठी केले जातात. नातेवाईकांचे आणि मित्रमंडळाचे शुभाशीर्वाद, शुभेच्छा घेण्यासाठी जोडपी आतुर असतात. लग्नानंतरची उभयतांची वाट नवी असते, स्वप्न नवं असतं, बंध नवे असतात.
नवजोडप्यासाठी लग्न सोहळा जरी एका दिवसाचा समारंभ असला तरी त्यांच्यासाठी ती ‘पॉइंट ऑफ नो रिटर्न’वरची झेप आहे. इतक्या लोकांच्या मेळाव्यात आणि हर्षोन्मादात केलेला विवाह प्रत्यक्षात मात्र एक अतिशय वैयक्तिक आणि नाजूक घटना आहे. त्यात अनेक गोष्टींचा आणि भावनांचा विधायक समतोल अपेक्षित आहे. प्रत्येकाला परिपूर्ण जोडीदार शोधायचा प्रयत्न करायचा तर ती अशक्यप्राय गोष्ट आहे. वैवाहिक जीवनात वादविवाद होत असतात. त्याचं एक कारण असं आहे, की या नातेसंबंधात तुम्हाला नको वाटणाऱ्या अनेक तत्त्वांशी, मतांशी आणि गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं. ते जर एखाद्या जोडप्याला जमलं नाही, तर मग त्या विवाहाचा टिकाऊपणा कठीणच आहे.
अनिल हा पदवीधर, नोकरी करणारा. त्याचा विवाह जवळजवळ १५ वर्षांपूर्वी गौरीशी थाटामाटात झाला होता. गौरी ही अनिलच्या वडिलांच्या बालमित्राची मुलगी. दोघांच्या कुटुंबासाठी हा सोहळा खूप मोलाचा होता. अनेक वर्षांच्या निर्मळ मैत्रीचं या विवाहगाठीमुळे आनंदी सोयरीकीत रूपांतर झालं होतं. सगळेजण मनसोक्त आनंदात डुंबत होते. या लग्नात हेतुपूर्वक रुसवेफुगवे दिसलेच नाहीत. अनिल आणि गौरी त्याच्या वडिलांच्या मुंबईतल्या घरात स्थिरावले, तर त्याचे आईवडील गोव्यात अलीकडेच बांधलेल्या त्यांच्या प्रशस्त घरात आपल्या व्याह्यांचे सख्खे शेजारी होऊन राहू लागले. अनिल-गौरीचा संसारही छान सुरू झाला. दोघंही उत्तम स्वभावाचे, जुळवून घेणारे. प्रेमाच्या रसिल्या रुसव्या-फुगव्यांव्यतिरिक्त काही खटकणारे वाद त्यांच्यात होत नव्हते. अनिलनं आपल्या आयुष्यात उन्नती करावी, असं त्याच्या आईवडिलांचं आणि सासूसासऱ्यांचं म्हणणं पडलं. त्यानुसार त्यानं ‘एम.कॉम.’ केलं. त्यामुळे बढतीही मिळाली. पुढे नोकरी सांभाळून ‘एम.बी.ए.’ करायचं त्यानं ठरवलं. तोपर्यंत त्यांना दोन मुलंही झाली होती. दोघांचे आईवडील अधूनमधून येऊन त्यांच्याबरोबर राहात होते, त्यामुळे गौरीला आधार होता. संसाराच्या सौख्यानं ती पुरी सुखावली होती. ‘प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला’ अशी तिची तृप्त मन:स्थिती होती. ठरल्याप्रमाणे अनिलचं ‘एम.बी.ए.’ सुरू झालं. ऑफिसच्या वेळेनंतर त्याचे क्लासेस असत, त्यामुळे पूर्वी सहा-सात वाजता येणारा तो आता दहाच्या दरम्यान घरी येऊ लागला होता. अर्थात याची सवय गौरीला करून घ्यावी लागणार होतीच. तिनं घर सांभाळायची भूमिका निभावायची जबाबदारी अगदी आवडीनं आपल्या अंगावर घेतली होती. फक्त आता संसारातला करमणुकीचा, हिंडण्या-फिरण्याचा वेळ काही दिवसांसाठी कमी झाला होता. दोन्ही मुलं शाळेत जाऊ लागल्यानंही तसा बदल घडणारच होता. दिवस कसे भराभरा चालले होते. अनिलचा अभ्यासाचा व्याप वाढायला लागला. शनिवार-रविवार तो कॉलेजमध्ये वाचनालयात जाऊन बसू लागला. काही दिवसांनी का कुणास ठाऊक, पण गौरीला हे खटकायला लागलं. त्याला सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ कुटुंबासाठी देता येऊ शकतो, पण तो देत नाहीये, अशी शंका तिला येऊ लागली. अलीकडे टापटीप आणि ‘स्टाइल’मध्ये राहण्याची त्याची गरजही तिला वाढलेली वाटली. तिनं त्याला ‘‘हल्ली तू तरुण राहण्याचा फार प्रयत्न करतो आहेस हं! तुझी हिरोगिरी जास्तच वाढली आहे!’’ असे टोमणेही मारले. त्यानंही सहज हसून म्हटलं, ‘‘अगं कॉलेजात बरीच तरुण मुलं आहेत, त्यांचा प्रभाव माझ्यावर पडलेला दिसतो आहे.’’ पण गौरीचं अंतर्मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. एक पत्नी म्हणून तिला काही वेगळेच संकेत मिळत होते. गौरी एक प्रगल्भ पत्नी होती, पण संवेदनशीलही होती. प्रेमाच्या बळावर अनेक स्त्रिया आपल्या नवऱ्याची नसन् नस ओळखत असतात. त्यामुळे त्यांच्यात होणारे सूक्ष्म बदलही त्या जोखू शकतात. गौरीला आपल्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असावेत असा दाट संशय यायला लागला होता. काही दिवस तिनं त्याला तसं प्रत्यक्षात जाणवू दिलं नाही, पण ती जागरूक राहिली. तिला त्याच्या कार्यालयातली सगळी मंडळी माहीत होती. बऱ्याचदा कुणाच्या लग्नात किंवा वाढदिवसाच्या पार्टीत अनिलनं तिला नेलं होते. पण अलीकडे तो काही वेगळय़ाच विश्वात वावरत होता, त्यामुळे त्याच्या ‘एम.बी.ए.’च्या क्लासमध्ये काहीतरी नक्की चाललं आहे, असा तिला संशय येऊ लागला. ‘हिरोगिरी’ वाढण्याबरोबरच अनिल हल्ली आपल्या-आपल्यातच रमलेला असायचा, एकांतात मोबाइलवर संदेश पाठवणं, ‘कामाचं आहे’ असं सांगून कुणाशी तरी हळू आवाजात बोलणं सुरू असे. अशा वेळी गौरी समोर आली, तर ‘‘बघ, हल्ली उगाच घरी असताना लोक कामाबद्दल फोन करतात. कसं कळत नाही त्यांना?’’ अशी काहीबाही तीच तीच वाक्यं तो फेकायचा. गौरीच्या ते काही पचनी पडत नव्हतं. तिला त्यात प्रामाणिकपणा किंवा अस्सलपणा भासत नव्हता. तिच्याशी एकांतात असताना त्याच्यात पूर्वीचा आवेग किंवा अधीरता नव्हती. तो उदासीनच वाटायचा. अनिल-गौरीच्या नात्यातले सूर आता काही जुळत नव्हते आणि ‘गीत ये न ते जुळूनी भंगल्या सुरांतुनी’ अशी अवस्था त्यांच्या नात्याची झाली होती.
वैवाहिक समस्या अनेक असतात, पण अविश्वासूपणा किंवा फसवणूक यामुळे विवाहाचा पायाच डळमळतो आणि विध्वंस होतो. गौरीनं याबद्दल आपल्या कुटुंबाला काहीच माहिती दिली नाही, पण अनिलकडे मात्र हा विषय तिनं काढलाच. त्याच्यात झालेले बदल त्याच्या आयुष्यात कोणीतरी नव्यानं आल्यामुळेच आहेत, हे तिनं त्याला खंबीरपणे सांगितलं. एकदा तर तिला त्याच्याकडेच पुरावा सापडला, तो म्हणजे त्याच्या शर्टाच्या बाहीवर लिपस्टिकचा डाग तिला दिसला. आता तिनं त्याला बोलतं करायचं ठरवलं. त्याआधी मुलांना सुट्टी असल्यानं त्यांना आजी-आजोबांकडे गोव्याला पाठवून दिलं. त्या दोघांमध्ये अलीकडे आलेला शारीरिक आणि मानसिक दुरावा, अनिलच्या स्वभावात पूर्वी कधी न दिसलेला तटस्थपणा, या सगळय़ाचा गौरीनं गंभीरपणे आढावा घेतला. ‘‘ती जी कुणी आहे तिला सोडून दे, आपण आपला सोन्यासारखा संसार पुन्हा मजबूत करू,’’ अशी विनंती गौरीनं केली. त्यानंही तसं तिला बिनबोभाट वचन दिलं. पण त्यानं आपल्याला फसवलं, आपला विश्वासघात केला, ही धग तिच्या मनात राहिलीच. पूर्वी जशी ती त्याच्यासमोर मोकळेपणानं कुठलाही किंतू न ठेवता वागत-बोलत होती तसं तिला आता जमेना. ती तिच्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत होती. हळूहळू तिला इतकं तर कळलं होतं, की ‘ती’ मुलगी तरुण होती आणि आपल्या शैक्षणिक समस्यांबाबत तिनं अनिलला अनेक वेळा विचारलं होतं. नंतर त्यांची चांगलीच मैत्री झाली होती, त्या मैत्रीत खूप मोकळेपणा होता. हे कळल्यावर गौरी बिथरली. दुसरं कोणीतरी आपल्यापेक्षा तरुण आहे, सुंदर आहे, आधुनिक ‘स्टाइल’चं आहे, म्हणून आपले वैवाहिक संबंध पतीनं असे धिक्कारायचे असतात का? हे तिच्या निष्ठेला पटण्यासारखं नव्हतं. कोणालाच पटणारं नव्हतं. जे विवाहसंबंध टिकून राहतात ते सुदृढ असतातच असं नाही. कित्येक वेळा धार्मिक परंपरा, सामाजिक शिकवण किंवा कुटुंबाच्या समाधानासाठी ही दांपत्यं एकत्र राहात असतात. विवाहसंस्था ही आयुष्याला स्थैर्य देण्यासाठी तरी खूप गरजेची वाटते लोकांना. दुसरं कोणी चांगलं दिसतं, तरुण आहे, म्हणून एखाद्यानं विवाहबाह्य संबंधांत प्रवेश करावा का, हा मुळात एक गहन प्रश्न आहे. विश्वासघात झालेल्या जोडीदाराला गौरीसारखाच त्या संबंधाच्या प्रत्येक क्षणाचा तपशील जाणून घ्यायचा असतो. त्यांच्यासाठी पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध हे त्यांचं संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झाल्यासारखं असतं. त्या व्यक्तीच्या आत्मिक सुरक्षिततेची हानी झालेली असते. मनातली तिच्या जोडीदाराची परिपूर्ण प्रतिमा डागाळली जाते. आपलं आयुष्यभराचं जपलेलं अनन्य स्वप्न हरवलं की काय, असं तिला वाटत राहतं. गौरीनं मुलं गोव्यात आजी-आजोबांकडे असताना एका रविवारी, नवरा झोपेत असताना सकाळी त्याचा चहा-नाश्ता बनवून ठेवला आणि सरळ बाल्कनीतून खाली उडी मारली. खऱ्या अर्थानं अनिलसाठी, त्यांच्या कुटुंबांसाठी तो एक विध्वंसक क्षण होता. आधी कोणालाच कळलं नाही, की तिनं असं का केलं. कारण गौरीनं ना आपल्या आईवडिलांना, ना सासूसासऱ्यांना याची पूर्वकल्पना दिली होती. त्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी अनिलनं वस्तुस्थितीची कल्पना सगळय़ांना दिली. सगळयांची मनं हेलावली होती, पण त्यांचा रागही अनावर झाला होता. अनिलचं तोंड पाहू नये, असं त्याच्या आईवडिलांना वाटत होतं. ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी त्यांची स्थिती झाली होती. ती दोघंही दीनवाणी बापुडी झाली होती. त्यांनी आपल्या सुंदर मैत्रीचा सन्मान राखत तिला एका अमूल्य नात्याचं मूर्त रूप दिलं होतं, पण आज आपण एखादा अक्षम्य गुन्हा केला आहे, आपल्या मित्राला कायमसाठी दुखावलं आहे, ही बोच त्यांच्या मनात सलत होती. गौरीच्या या दु:खातून आपण बाहेर येणार कसं? कसं जाईल आपलं म्हातारपण? या अपराधी भावनेच्या अंधाऱ्या गुहेत ते सापडले. आशेचा किरण दिसत नव्हता. या दोघा मित्रांनी दरवर्षी एखाद्या धार्मिक यात्रेला सपत्नीक जायचं ठरवलं होतं. वृद्धत्वातले क्षण प्रसन्नतेनं, खेळीमेळीनं जगायचं त्यांनी ठरवलं होतं.. पण घात झाला होता..
pshubhangi@gmail.com