मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : चक्रव्यूह | Mage rahilelyanchya katha vyatha author dr shubhangi parkar Labyrinth Worldwide country boys girls suicides Proof ysh 95– डॉ. शुभांगी पारकर

Advertisement

जगभर आणि देशातही किशोरवयीन मुलामुलींच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं असताना त्या घटनांमधले काही समान दुवे लक्षात घेणं आवश्यक आहे. यातल्या अनेक आत्महत्यांमध्ये अभ्यास, गुणसंपादन आणि सर्वोत्तम करिअर घडवण्यासाठीची चढाओढ यांचा ताण हे मोठं कारण दिसून येतं. शिक्षण क्षेत्रातली वाढती स्पर्धा आणि आपल्या मुलांनी यश मिळवावं हा आई-वडिलांचा त्यांच्या जागी योग्यच वाटणारा आग्रह, यात विद्यार्थी गुदमरतो आहे. विद्यार्थ्यांची घुसमट उलगडणारा या विषयाचा हा पहिला भाग..

आज जगभर किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसून येत आहेत. प्रत्येक तरुणाच्या आत्महत्येचा गंभीर परिणाम त्याच्या मागे उरणाऱ्या अंदाजे सहा माणसांवर तरी होतच असतो. त्या तरुण व्यक्तींचा आत्मघात व त्यामुळे बसलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळे त्यांच्या कुटुंबात अत्यंत भावुक आणि तीव्र भावना निर्माण होतात. त्या दीर्घकाळ राहतात आणि अधिक समस्याप्रधान असतात. कारण आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूत त्या तरुणानं स्वत:ला कसं मारलं, या कृतीवर त्याच्या मृत्यूच्या घटनेपेक्षा लोकांचं लक्ष अधिक केंद्रित झालेलं असतं. त्या मृत्यूच्या प्रसंगातून त्याचे वा तिचे जिवलग वा दूरचे नातेवाईक नक्की काय अर्थ काढतात आणि दु:खी नातेवाईकांचं भावनिक जग त्या घटनेला सहन करण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी किती बळकट आहे वा विकल आहे, यावर पुढे होणारी सामाजिक गुंतागुंत अवलंबून असते. शिवाय या नातलगांचे मृत व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध किती सुदृढ वा बिघडलेले आहेत, यावर ते या दु:खी परिस्थितीतून कसे बाहेर येतील हे ठरत असतं. अर्थात सर्वात महत्त्वाचं ठरतं ते त्या तरुण व्यक्तींची आत्महत्येची पार्श्वभूमी समजून घेणं. तरुण पिढीत आत्महत्येशी निगडित बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समान असलेल्या सर्रास दिसतात. त्यातली काही निवडक उदाहरणं पाहिली तर ते लक्षात येईल. काही वर्षांपूर्वी १७ वर्षांचा समीर गुजरातमध्ये एका कालव्यात मृत सापडला होता. त्यापूर्वी काही दिवस तो हरवला असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. समीर एका सुशिक्षित कुटुंबातला मुलगा होता. त्याचे वडील मध्य प्रदेशात बँकेत व्यवस्थापक होते आणि आई शिक्षिका होती. समीर आणि मिहिर हे दोघं भाऊ. त्यांच्यात समीर मोठा. समीरचे आई-बाबा त्यांच्या पिढीतली पहिली उच्चशिक्षित मंडळींची पिढी. त्यामुळे त्यांचाही मानस त्यांच्या दोन्ही मुलांनी उच्चशिक्षित व्हावं, ‘सी.ए.’ वा ‘एम.बी.ए.’ करावं आणि आयुष्यात आपलं करिअर समृद्ध करावं, असा होता. यासाठी त्या दोघांनी मुलांना शिक्षणाच्या दिशेनं मार्गदर्शन करायचं निश्चित केलं होतं. आईसुद्धा ‘बी.ए.-बी.एड.’ झालेली आणि मुलांना शैक्षणिक संस्कार देण्याची जबाबदारी तिनं आपल्या खांद्यावर घेतली होती. मुलांना जे जे जरुरीचं आहे, ते सगळं आपण पुरवायचं असं ठरवून आई-वडील दोघंही खूप कष्टप्रद जीवन जगत होते. प्रसंगी आपल्या आवडीनिवडींना आणि मौजमजेला निर्बंध घालत होते. मुलांनी विद्येच्या वाटेवर मार्गक्रमण करताना त्यांना काही कमी पडू नये आणि त्यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी दोघंही वचनबद्ध होते. समीर आणि मिहिरला अगदी लहानपणापासून त्यांनी कडक शिस्त लावली होती. बालपणीचे पहिले काही दिवस वगळता मुलांना आनंदानं आणि मुक्तपणे बालपण आणि पौगंडावस्था जगता आली नव्हती. या कुटुंबासाठी घरात प्राथमिक आणि सर्वात केंद्रस्थानी गोष्टी होत्या- अभ्यास, शाळा, परीक्षा आणि कोचिंग क्लास. यातून जर काही अतिरिक्त वेळ मिळाला, तर मग बाकीच्या इतर मौजमजेच्या गोष्टी. समीर आणि मिहिर जेव्हा आपल्या शेजारीपाजारी असलेल्या मुलांचं मुक्त, खेळीमेळीनं भरलेलं आयुष्य पाहात असत वा आपल्या मामेभावंडांना, चुलतभावंडांना मिळत असलेलं सहज स्वातंत्र्य आणि अनेकविध मुभा पाहात असत, तेव्हा खूप हिरमुसले होत. बालपणातले रम्य सुवर्णक्षण पुन्हा आयुष्यात मिळत नसतात. सुखवस्तू कुटुंबात आयुष्यातला सगळय़ात महत्त्वाचा समृद्ध मोसम असतो ते बालपण. ते जितकं दीर्घकाळ राहील, तितकंच त्या हंगामातल्या आनंदी स्मृतींनी ते खुलत जातं आणि प्रौढ आयुष्याला सुरक्षितपणा आणि स्थैर्य देऊन जातं. समीर आणि मिहिरचं आयुष्य मात्र आकसलं गेलं होतं. त्यांच्या भविष्याला यशाची झालर लागावी म्हणून त्यांना योग्य मार्गावर नेण्याचा त्यांच्या पालकांचा इरादा जरी नेक असला, तरी ज्या पद्धतीनं ते तो कार्यान्वित करत होते, त्यामुळे मुलांचं मन गुदमरत होतं आणि नैतिक खच्चीकरण होत होतं, याची त्यांना जाणीव नव्हती. मुलांना ते साध्या साध्या गोष्टीही उपभोगायला देत नव्हते. इतर मित्रमंडळींबरोबर त्यांनी किती वेळ घालवायचा यालाही मर्यादा होती. सहली, हिंडणं-फिरणं तर अजिबात बंद झालेलं. घरातला टीव्ही गावातल्या मावशीकडे कधीच पाठवला गेला होता. घरातली बॅडिमटन रॅकेट कधी तरी रविवारी वापरात यायची. मिहिरला कधी कधी काही खेळांच्या स्पर्धात भाग घेता येई वा एखाद्या मित्राच्या घरी जाण्याची मुभा दिली जात असे. समीरचा दिनक्रम खूपच जाचक होता. त्यानं केव्हा उठायचं, कधी जेवायचं, शाळेची वेळ, क्लासची वेळ, हे सगळं आखून दिलेलं होतं. तसं नाही झालं आणि समीरचं घडय़ाळ बिघडलं, तर घरात जवळजवळ भूकंप घडत असे. त्याला मित्रमंडळींशी गप्पाही मारता येत नव्हत्या,  ना चुलत-मावस भावंडांबरोबर मजा करता येत होती. समीर बारावीत होता आणि त्याच्यावर हे सगळे निर्बंध नववीपासून लागले होते.

Advertisement

 समीरची बारावीची परीक्षा संपली. आता त्याला, तो मित्रांबरोबर बाहेर जाऊ शकतो, असं आईनं सांगितलं; पण सात-आठ दिवस तो स्वत:च घराबाहेर पडत नव्हता. त्याचे मित्रांबरोबरचे भावनिक लागेबांधे सैलावले होते. मिहिर आता दहावीत गेला असल्यानं समीरसाठी असणारे सगळे नीतिनियम आता त्याच्यावर लागू झाले होते. त्यामुळे समीरला मिहिरबरोबरही मोकळं होऊन आनंद अनुभवता येत नव्हता. ‘‘आता तुझी बारावीची परीक्षा संपली, म्हणून तू मिहिरला त्रास देऊ नकोस. खेळाबिळाच्या गोष्टी त्याच्याबरोबर करायच्या नाहीत. त्याला त्याचा अभ्यास गंभीरपणे करू दे,’’असा सक्त इशारा वडिलांनी समीरला दिला होता. त्यामुळे समीर परीक्षा संपली तरी त्याच्या दैनंदिन जाचक बंधनांच्या सापळय़ातून मनानं तरी मुक्त झाला नव्हता. पिंजऱ्यात दीर्घकाळ अडकलेल्या पक्ष्याला पिंजरा उघडताच चटकन उडता येत नाही, कारण त्याच्या मनाचे पंख उघडतच नाहीत. तसा समीरचा जीव किती तरी वर्ष गुदमरलेला होता. आनंदानं मोकळा श्वास कसा घ्यायचा हे समीरला कळत नव्हतं. त्याचा कंटाळवाणा आणि सुस्तावलेला एकंदरीत अवतार पाहून, मिहिरवर त्यामुळे नकारात्मक प्रभाव पडेल, असं समीरच्या संवेदनशील आई-वडिलांना वाटलं. ते टाळण्यासाठी आणि समीरलाही मोकळं वाटण्यासाठी शेवटी समीरच्या आई-वडिलांनी त्याला सुट्टीत अहमदाबादला पाठवून दिलं. तिथे त्याच्या मामाचा खूप मोठा परिवार होता आणि मुख्य म्हणजे त्याच्या वयाची बरीच मुलं होती. तो जवळजवळ तीन वर्षांनी आला, म्हणून सगळय़ांनी त्याचं हर्षभरित स्वागत केलं. रोज ती मुलं सायकलवर स्वार होऊन इकडेतिकडे फिरत असत, वेगवेगळे खेळ खेळत असत. समीरला सायकल येत होती, म्हणून त्यानंही त्यांच्याबरोबर सायकलवरून ते जिथे जातील तिथे फेऱ्या मारायला सुरुवात केली. तो त्यांच्या बरोबरीनं अनेक गोष्टींत भाग घेत होता खरा, पण मोकळा होत नव्हता. इतर मुलं चांगलीच मस्ती-मजा करत होती. समीर सगळय़ांमध्ये सगळय़ा गोष्टी करत होता, तरीही विझलेला आणि बावरलेला. दहाएक दिवसांनी नेहमीसारखी सगळी मुलं सायकलवर स्वार होऊन फिरायला गेली. अचानक काही वेळानं त्याच्या इतर भावंडांच्या लक्षात आलं, की समीर सायकलवरून त्यांच्याबरोबर आला होता खरा, पण आता तो कुठे दिसत नव्हता. त्यांनी लगेच तिथेच शोधाशोध केली, पण तो बराच काळ सापडला नव्हता. शेवटी काळजीने त्याच्या मामानं पोलिसांत तक्रार केली. त्याची सायकल दुसऱ्या दिवशी मामाच्या घरापासून जवळ असलेल्या शॉपिंग मॉलच्या आवारात सापडली आणि तीन दिवसांनी त्याचा मृतदेह. सगळी मुलं ज्या कालव्याजवळ गेल्या दहा दिवसांत दोन-तीन वेळा गेली होती, त्या कालव्यातच सापडला.

या घटनेनंतर प्रचंड हलकल्लोळ माजला. सगळेच सुन्न झाले. मामा-मामीला अतोनात दु:ख तर झालंच, पण तो आपल्या घरात असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला, यामुळे खूप अवघड आणि अपराधी वाटलं. समीरचे आई-वडीलसुद्धा मामाकडे पोहोचले. प्रचंड हादरलेले आणि दु:खानं ग्रस्त झालेले होते ते. असं कसं समीरनं केलं? परीक्षा तर संपली होती आणि त्याला पेपरही चांगले गेले होते. समीरच्या ‘मम्मी-पप्पां’नी त्याची परीक्षा चांगली जावी आणि त्याला उत्तम गुण मिळावेत यासाठी व्यवस्थित खबरदारी घेतली होती. त्या दोघांच्या मते समीर खूप सालस आणि आज्ञाधारक मुलगा होता. खूप अभ्यासूही होता. त्यानं कधीच कुठल्याही गोष्टीची उगाचच मागणी केली नाही. इतकंच नव्हे, तर त्याला काही त्रास होतो आहे का वा कसली अडीअडचण आहे का, याचीही तक्रार त्यानं कधी केली नाही. आपल्या अभ्यासात तो सदैव मग्न असायचा. किती शांत प्रवृत्तीचा मुलगा होता तो. आपल्या मुलाच्या आयुष्यात यशाची उत्तुंग शिखरं पाहणाऱ्या अनेक पालकांची ही अशी दीन अवस्था झालेली आपण हल्ली अवतीभोवती सतत पाहात असतो.

Advertisement

 ही एक घटना, मात्र अशा अनेक घटना आजूबाजूला घडत आहेत. शारीरिकदृष्टय़ा निरोगी असलेली आपली युवा पिढी त्यांचं जीवन अशा दारुण रीतीनं संपवत आहे, ही वस्तुस्थिती त्यांच्या नातेवाईकांनाच नाही, तर साऱ्या देशाला हादरवणारी आहे. समीरनं त्याच्या आई-वडिलांनी कथितरीत्या मजबूत केलेल्या शैक्षणिक दबावामुळे आणि उच्च महत्त्वाकांक्षेच्या स्वप्नांमुळे आपलं जीवन संपवलं होतं. त्याच्या आई-वडिलांना कळत नव्हतं, की आपलं नक्की काय चुकलं? कुठे चुकलं?

आज भारतासारख्या विकसनशील देशात सद्य शिक्षणप्रणाली आर्थिकदृष्टय़ा महागडी आणि स्पर्धात्मक भावनेच्या चक्रव्यूहात अडकलेली आहे. मुलांचा विकास आणि भविष्य हे उच्च शिक्षणाशिवाय घडणं शक्यच नाही, याची जाणीव ज्या मुलांना आणि पालकांना आहे, त्यांना सहजी दैनिक समाधान मिळत नाही. अस्वस्थ असतात ही मंडळी. भरीस भर म्हणजे केवळ शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर पुढच्या शैक्षणिक विकासाची आणि करिअरची स्वप्नं मुलांना पाहता येत नाहीत. पालकही खूप कातावलेले आणि दबावात असतात. आज  शिक्षण क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आहे. सर्वोत्तम संस्थांमधून प्रवेश मिळवायचा म्हटलं, तरी अलौकिक ज्ञान आणि टोकाची स्पर्धात्मक प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक आहे. बहुतेक शैक्षणिक प्रवाहांसाठी ‘कट ऑफ’ टक्केवारी ९० च्या मर्यादेत आहे. तिथे जवळपास पोहोचायचं म्हटलं तरी विद्यार्थी, पालक, शाळा आणि शिक्षक या सगळय़ांकडून अतोनात परिश्रमाची मागणी आहे. किती तरी चुकीची शैक्षणिक धोरणं राजकारणी राबवत असल्यानं गळेकापू चढाओढ आहे. आज या युवा पिढीच्या दुर्दैवी आत्महत्या आपण पाहताना नक्की कोणाकोणाला दोष देणार आहोत? शेवटी हा एक अन्याय्य चक्रव्यूहच आहे. तो भेदायचा तरी कसा?

Advertisement

pshubhangi@gmail.com

Source link

Advertisement