मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : बधिर करणाऱ्या विचारवेदनाडॉ. शुभांगी पारकर

Advertisement

डॉ. शुभांगी पारकर मानसोपचारतज्ज्ञ असून आत्महत्या हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय होता.  मानवाधिकार विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. मुंबईतील ‘जीएसएमसी’ वैद्यकीय महाविद्यालय व ‘केईएम’ रुग्णालयात त्यांनी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले आहे. वैद्यकीय शिक्षणतज्ञ हीदेखील त्यांची आणखी एक ओळख. विविध मानसिक समस्यांबद्दल व विशेषत: आत्महत्येच्या प्रश्नाबद्दल त्या सातत्याने जनजागृती करत आहेत. मानसोपचार क्षेत्रातील अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. विविध वैद्यकीय संशोधनपत्रिकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून मराठीतही त्यांनी विपुल लेखन केले आहे.

आत्महत्या हा मृत्यूचा एक मार्ग आहे, मात्र तो स्वत:ला स्वत:साठी निवडावा लागतो. अपरिहार्यता असेल किंवा ठरवून घेतलेला निर्णय, पण त्याचा परिणाम एकच, मृत्यू. मात्र हा मृत्यू अनेक प्रश्नांना जन्म घालणारा असतो. ‘का केलं त्यानं—तिनं असं?’ हा त्यांच्या आप्तस्वकीयांना सर्वात जास्त छळणारा प्रश्न. एका आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब कोलमडून पडतं. अनेकदा तर आत्महत्येशी थेट संबंधित नसतानाही हे कुटुंबीय स्वत:ला दोष देत जगत राहतात. म्हणूनच आत्महत्या टाळायला हव्यात. आत्महत्या हा प्रश्न सुटण्याचा मार्ग नाहीच. म्हणूनच हे सदर. आत्महत्या झालेल्या घरातल्या  मागे राहिलेल्यांसाठी आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या किंवा तसा विचार केलेल्यांसाठीही. नकारात्मक विचारांवर मात करत, समस्यांवर स्वार होत आयुष्याला भिडायचं असतं, हे सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ानं.

Advertisement

आत्महत्या ही जितकी मानवी शोकांतिका आहे, तितकीच ती अनाकलनीय, गूढही आहे. ज्या कारणांसाठी काही जण आत्महत्या करतात, त्याच कारणाला शह देत अनेक जण आपलं जगणं सुस करतात. आयुष्यानं विचारलेल्या प्रश्नांना स्वत:च उत्तर होतात. एखादी व्यक्ती आत्महत्या का करते, याची जैविक, वैद्यकीय आणि मानसिक कारणं अनेक आहेत. एखाद्याचा नैसर्गिक मृत्यू होणं ही त्याच्या सुहृदांसाठी अत्यंत दु:खद घटना असतेच; परंतु एखाद्यानं आत्महत्या करून जीवन संपवलं असेल तर त्यामुळे होणारं दु:ख त्याच्या कुटुंबासाठी तीव्र आणि दीर्घकालीन असतं. आत्महत्या करणारी व्यक्ती निघून जाते, मात्र तिच्या मागे राहिलेल्यांमध्ये कुटुंबीय तर असतातच, आप्तेष्ट असतात, मित्रमंडळी, शेजारपाजारचे, ओळखीचे, स्नेही, असे अनेक जण असतात. ज्यांना त्या व्यक्तीच्या आत्महत्येचं दु:ख वाटू शकतं. कित्येक कुटुंबीयांसाठी तर ती आयुष्यभर छळणारी, अश्वत्थाम्यासारखी भळभळणारी जखम असते. परंतु हेही मान्य करायला हवं, की आत्महत्येबद्दल समाजमन तसं गढुळलेलं असतं. चित्रपट अभिनेता सुशांत राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली, कित्येकांना त्याच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती वाटली, दया वाटली. अनेकांच्या मनात अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची क्रूर काळी छाया या कुटुंबावर पडली असणारच. आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबावर ती पडतेच पडते. कुटुंबीयांकडे त्या आत्महत्येची उत्तरं असतातच असं नाही आणि मग ते कुटुंब किंवा जवळची मित्रमंडळी एकटी पडत जातात, मनानं खचतात. त्यांचं भावविश्व अनेकदा उध्वस्त होतं. माता, पिता, भ्राता, भगिनी, पती वा पत्नी अशा अनेक नात्यांनी ही मंडळी या आत्महत्येच्या काळ्या गुहेत अडकली जातात. आपलं काय चुकलं, कुठे चुकलं, आपण काय करायला हवं होतं, आपण असे कसे अनभिज्ञ राहिलो, यांसारख्या अनेक विचारांच्या वेदनेत ही मंडळी मनानं बधिर होत जातात. आत्महत्येमागचं एखादं कारण जरी कुटुंबीयांना समजलं, तरी त्यांना हे कळत नाही, की ज्या कारणासाठी आपल्या प्रिय व्यक्तीनं आत्महत्या केली, मग तो प्रेमभंग असो वा व्यवसायातील अपयश असो, त्या कारणांसह, त्या अनुभवांसह इतर लाखो मंडळी व्यवस्थित जगत असतात, जगत आहेत. मग आपल्याच बाबतीत हे असं का घडलं? कित्येकांना तर आपल्याला त्यानं/तिनं का विश्वासात घेतलं नाही? आपल्यावर त्यांचा विश्वास का नव्हता? आपण तर किती मनापासून प्रेम केलं त्यांच्यावर! कुठे आपण कमी पडलो? असमर्थ ठरलो? याची बोच घेऊन अनेक नातेवाईक आयुष्य कंठतात. अशी कुटुंबं पाहिली की पाहणाऱ्याचं मनही हेलावतं. मागे राहिलेली काही सुज्ञ मंडळी जीवनपथावर स्थिरावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतातही, पण जगण्याची ती लज्जत पुन्हा येत नाही. त्यांचं जीवन पूर्वीसारखं खेळीमेळीचं राहत नाही. या दुर्दैवी घटनेत आपला तसा काहीच दोष नव्हता, हे बऱ्याच मंडळींना माहीत असतं; पण त्यांचा घायाळ भावनांशी संघर्ष काही केल्या संपत नाही. कित्येक निरागस आणि निरपराधी नातलगांच्या चेहऱ्यावर वरकरणी हसू भासतं खरं; पण डोळ्यांतील वेदनेचे भाव काही बदलत नाहीत. मनाला व्यथित करणाऱ्या शोकांतिकेचं काय करायचं? त्या स्मशानदु:खाला तिलांजली कशी आणि कुठे द्यायची, हा प्रश्न कित्येक प्रियजनांना भेडसावत राहतो. अनेकदा प्रार्थनास्थळी जाऊन सगळ्या प्रकारचे शांती-सोपस्कार केले जातात. त्यानं मन:शांती मिळेल असा आशावाद असतोच त्यामागे, मात्र या कडवट स्मृतीत डुंबायचं की किनारा सुरक्षितपणे गाठायचा आणि तिथे विसावयाचं, हा ज्याच्या त्याच्या स्वीकारण्याचा प्रश्न आहे. अशा वेळी अनेकदा या कुटुंबीयांनाच सावरायची वेळ येते. तेव्हा त्यांनीही जवळच्यांकडे मदतीची हाक मारायलाच हवी, कारण या तणावामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. विविध मानसिक विकार होऊ शकतात. त्यासाठीच हे सदर. आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्यांसाठी आणि आत्महत्या केलेल्यांच्या जवळच्यांसाठीही. एकंदरीत कुटुंब हा एक असा घटक आहे, की जो आत्महत्येच्या बाबतीत द्विदिशात्मक आहे.

आत्महत्या करण्यानं प्रश्न सुटत नाहीतच. त्यामुळे त्या मार्गावर जायला नकोच; पण त्या वाटेवर जाणारे कमी नाहीत. जगात दरवर्षी आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण एचआयव्ही, मलेरिया, स्तनांचा कर्करोग, युद्ध वा मनुष्यहत्या या मृत्यूंच्या कारणांपेक्षा अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) २०२१ च्या अहवालावर नजर टाकल्यास असं दिसून येतं, की प्रतिवर्षी ८ लाखांपेक्षा अधिक लोक आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडत असतात. आत्महत्या एक माणूस करतो, मात्र त्यामागे आत्महत्येचा प्रयत्न करणारी जवळजवळ ८ ते २५ माणसं आढळतात. १०० मृत्यूंमागे जगातला एक मृत्यू आत्महत्येमुळे झालेला आहे. प्रत्येक ४० सेकंदांमध्ये जगात एक आत्महत्या घडते. ही आकडेवारी भयभीत करणारी आहे. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसं आत्महत्या करतात; पण १५ ते २९ या वयोगटातल्या लोकांच्या आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चौथ्या क्रमांकावर आहे. आत्महत्या फक्त उच्च उत्पन्न गटात होतात हा समज चुकीचा आहे. खरं तर जगातील आत्महत्येच्या कारणानं होणारे ७७ टक्के मृत्यू हे कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये झालेले आढळतात. गेल्या ५० वर्षांत जागतिक आत्महत्यांबरोबर भारतातही आत्महत्येचं प्रमाण वेगानं वाढलं आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून आत्महत्या ही बिकट समस्या म्हणून आजमितीला ओळखली जाते. विकसनशील देशांच्या तुलनेत विकसित देशांमध्ये, जिथे मानसिक आरोग्यसेवा अधिक प्रगत आणि विपुल आहेत, तिथली आकडेवारी दर्शवते की मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या लोकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण अधिक आहे. भारतासाठी ही माहिती चिंता निर्माण करणारी आहे. कारण भारतासह अनेक विकसनशील देशांत मानसिक आजारांना पोषक अशी आरोग्यसेवा आणि मनोचिकित्सक सध्या तरी खूपच कमी प्रमाणात आहेत. आत्महत्या या निर्वाणीच्या क्षणी भावनाविवशतेनं होतात. पेचप्रसंग आला की काहींना त्याला सामोरं जाता येत नाही. तो न सुटणारा गुंता वाटायला लागतो. यामध्ये आर्थिक विवंचना, नात्यांमधील टोकाचे तणाव, दुर्धर आणि अस आजार, यांचा समावेश आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (NCRB) अहवालानुसार २०२० या वर्षी भारतात १.५३ लाख लोकांचे मृत्यू आत्महत्येनं झाले, तर करोनामुळे त्याच काळात १.४९ लाख मृत्यू झाले. याचाच अर्थ भारतात करोनापेक्षा आत्महत्येनं झालेले मृत्यू जास्त होते. एनसीआरबी अहवालानुसार या आत्महत्यांमागे अनेक कारणं आहेत. त्यात कौटुंबिक समस्या या जवळजवळ एकतृतीयांश प्रमाणात आहेत. त्यामागोमाग आजार आणि व्यसनाधीनतेनंतर वैवाहिक समस्या ही कारणं आहेत. एकंदरीत वैवाहिक संघर्षही लक्षात घेता कौटुंबिक संघर्ष हे आत्महत्येमागचं प्रमुख कारण भारतात दिसून येतं. आत्महत्या रोखण्यासाठी कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे हे समजून घेणं जसं आवश्यक आहे, तसंच एकदा आत्महत्या घडल्यावर त्या कुटुंबाचं काय होतं? त्यांना किती यातना भोगाव्या लागतात? याचा संवेदनशीलतेनं विचार होणंही गरजेचं आहे.

Advertisement

सध्याच्या काळात बालक-पालक वा पालक-तरुण संघर्ष हा मानसिक समस्यांचा केंद्रबिंदू मानला जातो. वेगानं वाढत असलेल्या व्यसनाधीनतेतही या घटकाचा प्रामुख्यानं विचार केला जातो. तरुण, उमलत्या वयात भावनिक परिपक्वता कमी असते. मनोसामाजिक घटनांचा तारतम्य बाळगून विचार करण्याकडे कल कमी असतो. कुटुंबीयसुद्धा या वयातील मुलांच्या अपरिपक्व वागणुकीनं, बेजबाबदार वृत्तीनं हैराण झालेले असतात. अशा वेळी हमरीतुमरीवर येणाऱ्या कुटुंबाचा आणि तरुण मुलांचा मानसिक समतोल बिघडतो. याचा विपर्यास तरुणांच्या आत्महत्यांमध्ये दिसतो.

कौटुंबिक घटक आत्महत्येशी जोडलेले आहेत याबद्दल मानसशास्त्रात आणि मनोविकृतीशास्त्रात वाद नाही. संशोधनाप्रमाणे एखाद्या कुटुंबात आत्महत्येची पार्श्वभूमी असेल तर त्या पिढीमध्ये एक प्रकारची जैविक संवेदनशीलता दिसून येते. शास्त्रांच्या अनेक प्रकारच्या शोधात सातत्यानं असं दिसून आलं आहे, की एखाद्या कुटुंबात पिढय़ानपिढय़ा आत्महत्या होत राहतात आणि तो आत्महत्येचा धोका त्याच्या पुढच्या पिढीत अधिक प्रमाणात वाढत जातो. गेली काही वर्ष चालणाऱ्या आतापर्यंतच्या संशोधनातून असं सिद्धही झालं आहे, की पालकांची आत्महत्या ही त्यांच्या मुलांच्या आत्महत्येचं पूर्वचिन्ह किंवा संकेत असू शकतो. पौगंडावस्थेतील किंवा तरुण असलेल्या मानसिक रुग्णांमध्ये अशी माहिती डॉक्टर या नात्यानं आम्हाला मिळाली, तर आम्ही कुटुंबाला दक्ष राहण्याच्या सूचना देतो. अर्थात जैविक विकलतेपलीकडेही तरुणांमधील आत्महत्येच्या संबंधात कौटुंबिक बेबनाव आणि त्यांच्या नात्यातील गुणवत्ताही महत्त्वाची असते. अनेक कुटुंबं अनेक कारणांनी आणि परिणामांनी आत्महत्येशी जोडली गेली आहेत.

Advertisement

आत्महत्येच्या एका बिंदूभोवती हे सगळे धागे गुंतलेले आहेत. एक एक धागा आपली एक व्यथा आणि कथा उलगडत जातो. त्यात बुद्धी आणि भावना ऊन-पावसाचा गहन खेळ खेळत असतात. आपल्या या वर्षीच्या लेखांच्या मालिकेत यातील काही खेळ उलगडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. काही उत्तरं आपण शोधणार आहोत. काही प्रश्न नव्यानं उभे राहतील. त्यांना समर्थपणे पेलायचा प्रयत्न करणार आहोत.

या अव्यक्त विषयावर आपण उघडउघड संवाद करणार आहोत. तुम्हीही त्यात सामील व्हा आणि मोकळ्या मनानं व्यक्त व्हा.

Advertisement

[email protected]

The post मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : बधिर करणाऱ्या विचारवेदना appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement