अमरावती43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दर्यापूर येथून केटरिंगच्या कामावरून परत येत असलेल्या एका महिलेला मारहाण करून लुटमार करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या एका सहकाऱ्यालाही मारहाण करून त्यांच्याजवळीलही रोकड लुटण्यात आली. ही धक्कादायक घटना वलगाव ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव मार्गावर बुधवार, १५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली . सचिन मिलिंद उगले (३०) व अनिरुद्ध शेषराव उगले (३५) दोघेही रा. वलगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित ४५ वर्षीय महिला ही एका सहकारी पुरुषासोबत केटरिंगच्या कामासाठी दर्यापूर येथे गेली होती.
काम आटोपल्यावर रात्री ती सहकाऱ्यासोबत ऑटोने परत येत होती. मार्गात खारतळेगाव-वलगाव मार्गावरील नागबाबा मंदिराजवळ अचानक ऑटो बंद पडला. त्यामुळे ऑटोमधील अन्य प्रवासी तेथून निघून गेले. तर पीडित महिला व सहकारी पुरुष हे दोघे सोबत असलेला डबा घेऊन जेवण करण्यासाठी नागबाबा मंदिर परिसरात गेले. त्यांचे जेवण आटोपल्यावर सचिन व अनिरुद्ध तेथे आले. येथे काय करत आहात, अशी विचारणा त्यांनी केली. तुमची शुटिंग करून प्रसारित करतो, असे म्हणून अनिरुद्धने महिलेसोबत असलेल्या सहकारी पुरुषाला मारहाण केली.
त्यानंतर त्याने सदर पुरुषाला तेथून थोडे लांब नेत त्याच्याजवळील १ हजार रुपये हिसकाविले. तर सचिनने सदर महिलेचे लैंगिक शोषण करून त्यांच्याजवळील ३ हजार रुपये लुटले. सदर प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी या दोघांनी महिलेसोबत सहकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघेही तेथून पळून गेले. या प्रकरणी पीडित महिलेने वलगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन व अनिरुद्ध यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.