नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
फोटो – शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, एसीबी
अवघ्या ६२ दिवसांत लाचखोरीचे तब्बल ४९ सापळे यशस्वी करून ७० लाचखाेरांना अटक करण्यात राज्यातील एसीबीच्या सहाही विभागात नाशिक पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी शर्मिष्ठा वालावलकर यांच्या रूपाने पहिल्यांदाच महिलेकडे आली असून त्यांच्यासोबत तब्बल १७ अधिकारी, कर्मचारीही महिलाच आहेत. एसीबी विभागात महिलाराज आल्यानंतर दिवसाआड कारावाई होत असून लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. भ्रष्टाचारावर अंकुश आणण्यासाठी शासनाच्याच गृहविभागाच्या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. सुरुवातीला साइडब्रॅच म्हणून समजल्या जाणारा हा विभाग आता आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत आला आहे. या विभागाकडून वर्षभरात वेगवेगळ्या कार्यालयात वर्ग एकपासून ते वर्ग चारपर्यंतच्या कर्मचाऱ्यांवर साधरणपणे १०० ते १२० सापळे यशस्वी केले जात होते. मात्र, यंदा याच विभागाकडून वर्षाच्या सुरुवातीलाच अवघ्या ६२ दिवसांत तब्बल ४९ सापळे यशस्वी करण्यात यश आले. अधीक्षका वालावलकर यांनी पदभार स्वीकारल्यपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नाशिकसह धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यात पथकाकडून कारवाईचा धडाकाच लावल्याचे दिसून येत आहे. ६२ दिवसांच्या कालावधीत शासकीय सुट्यांचे १० दिवस साेडले तर दर दिवसाला एका लाचखाेराला पकडले जात आहे.
कामगिरीत यांचा समावेश एसीबीच्या या कामगिरीत अधीक्षक वालावलकर यांच्या साेबतीला उपअधीक्षक म्हणून वैशाली माधव पाटील, वरिष्ठ निरीक्षक साधना भाेये-बेलगावकर, निरीक्षक साधना भगवंत इंगळे, निरीक्षक मीरा वसंतराव आदमाने, निरीक्षक गायत्री मधुकर जाधव, धुळ्याच्या निरीक्षक माधवी वाघ, नंदुरबारच्या निरीक्षक नेत्रा जाधव या सात अधिकारी व वरिष्ठ श्रेणी लिपिक वनिता महाजन, गायत्री कुलथे, जयश्री शिंदे, निम्न लघुलेखक वर्षा बागले, शीतल सूर्यवंशी, ज्याेती शार्दूल, क्षितिजा रेड्डी आदी १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महिलांचे याेगदान विशेष ^एसीबीच्या कार्यालयात कार्यरत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सांघिक यशामुळेच सर्वाधिक कारवाई या विभागात झाली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे माझ्यासह एकूण १५ महिला विभागात कार्यरत असल्याने त्यांचे याेगदानही महत्त्वाचे आहे. – शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, एसीबी