नाशिक3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सहकारी महिला ग्रामसेवकाला ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असलेल्या 4 ग्रामसेवकांनी जातीवाचक शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित 4 ग्रामसेवकांच्या विरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिन्यापुर्वी पंचायत समिती कार्यालयात हा प्रकार घडला होता. पोलिसांकडून या तक्रारीची चौकशी करत अखेर शनिवार दि.14 रोजी संशयित ग्रामसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित ग्रामसेवक महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शासनाकडून दर वर्षी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरीता अदिवासी ग्रामसेवक महिलांनी अर्ज केला होता. यास ग्रामसेवकांचा छुपा विरोध होता. ग्रामसेवक संघटनेकडून पुरस्कार देण्यासाठी लाॅबिंग केली जात असल्याने संशयित ग्रामसेवक सुनिल शांताराम चौधरी, सुनिल निकम, धुडकू पाटील यांनी हा पुरस्कारासाठी करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यासाठी पीडित ग्रामसेवक महिलेवर दबाव टाकला. ग्रामसेवक कार्यालयात झालेल्या मिटिंग मध्ये संशयितांनी महिला ग्रामसेवकाला जीतीवाचक शिविगाळ केली.
याविरोधात जिल्हा परिषद, विशाखा समिती आणि पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र संबधितांवर कारवाई करण्यात आली नव्हती पिडीत अदिवासी ग्रामसेवक महिलांनी अदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेकडे दाद मागीतली. संघटनेकडून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता. याची पोलिस प्रशासनाने दखल घेत संशयित ग्रामसेवकांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना तपास करत आहे.
संशयित ग्रामसेवकांवर कारवाई होत नसल्याने संघटनेचे देवा वटाणे, दिलीप गांगुर्डे, शशिकांत मोरे, अशोक गोतरणे, वाळू गुंबाडे, यांनी पोलिस आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्याकारी अधिकारी, यांची भेट घेत अदिवासी महिलेला न्याय मिळावा याकरीता निवेदन दिले होते. संबधितांवर गुन्हे दाखल झाले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता.